ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 812

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१२

तुझिया गुणासाठी लागलों भजनपाठीं । तुझीं सगुण गोठी हृदयीं वसे । मी म्हणें तें जीवन कीं निर्गुण चैतन्यघन । व्याप्य व्यापक स्थान दुजें नाहीं । विश्वाकारें जगडंबरला जो श्रुति नेति नेति म्हणोनी ठेला । हेंची भावें विचारी भलें । परी दृष्टि सगुण हृदयींचि । हे खूण परी न विसंबे तुझिया पायां रया ॥१॥ तूं एकुची एकला बाहिजु भीतरीं । कोणा द्वैतपरी सांगों बापा ॥धृ॥ म्हणोनी परापर स्थूळसूक्ष्म विचार । तो तुझा सगुणची आधार मज वाटे । म्हणोनीं तें तुझी बुंथी हेची उरो आम्हां स्थिती । कीं द्वैताद्वैत भ्रांती न लगे मना ॥२॥ ते तुझेनी सुखें पडिपाडे आणि हें मनची स्वयें उजाडे । जेथे थोडें बहु न निवडे ऐसें जालें । तेथें आपुलिये अंगा विसर पडो ठेलें । शेखीं सोंगची दुणावलें रया ॥३॥ या मनाची भ्रांती फेडावया तो तुझा सगुणभाव मज गोड लागे । पाहातें पहाणियामाजीं स्वयेंची विस्तारलासी की देखणेंची तेणें होऊनी अंगे । त्रिपुटी सहित शून्याशून्य निमालें ॐकार मार्गही हे नचले । रखुमादेविवरु विठ्ठलें उदारें । सुख भोगिजे येणे अंगे रया ॥४॥

अर्थ:-

तुझ्या सगुणगुणाला भुलून तुझ्या प्राप्तीकरता भजनाच्या पाठीसी लागलो. त्यामुळे तुझ्या सगुण स्वरुपाच्या कथा सारख्या अंतःकरणांत राहतात. मी म्हणतो, निर्गुण चैतन्य हेच सगुण बनून सर्व जीवांचे जीवन आहे. त्या निर्गुण चैतन्याला व्याप्यव्यापकभाव उत्पन्न होण्याला दुसरे स्थानच नाही. ज्या श्रुति नेति नेति म्हणून थकल्या तोच विश्वाच्या आकाराने विस्तारला आहे. त्याचा मुख्यभक्तिने विचार करणे चांगले असले तरी अंतःकरणांत जी सगुण मूर्ति आहे. त्या सगुण मूर्तिच्या पायाचे चिंतन करण्यांत कधीही विसर पडू देणार नाही. एक अद्वितीय स्वरुप आंत बाहेर तूंच एक आहेस द्वैताचा प्रकार कोणाला सांगावा म्हणून तो त्या निर्गुण स्वरुपाविषयी पर अपर स्थूल सूक्ष्म इत्यादि विचार असला तरी मला मात्र सगुण स्वरुपाविषयीच आदर वाटतो. म्हणून ते तुझें सगुणरूप आमच्या समाधान स्थितीला शिल्लक उरो म्हणजे झाले. याशिवाय द्वैताद्वैत विचारांची भ्रांति माझ्या मनाला नको. त्या तुझ्या सगुण स्वरुपासारखे मोठे सुख मला दुसरे आवडत नाही. त्या निर्गुणस्वरुपाच्या ठिकाणी हे स्वतः मनच उदासीन होते. ज्याठिकाणी थोडे फार असे काही निवडता येईनासे होते. असा विचार केला म्हणजे हे तुझे सगुण सोंगच मनाला फार आवडले. या मनाची भ्रांती फेडण्याकरिता तुझ्या सगुण स्वरुपाच्या ठिकाणी भाव ठेवणे मला बरे वाटते. ह्या दृश्यदृष्ट्यादि भावामध्ये स्वतः तूं आपल्या स्वरुपाने विस्तार पावून सर्व जग आपल्या अंगाने तूंच झाला आहेस. ज्ञाता ज्ञान ज्ञेयादि त्रिपुटीसहवर्तमान शून्याशून्य ओंकार इत्यादि मार्ग त्यास्वरुपाच्या ठिकाणी करू शकत नाही.रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे उदारसुख याच विचाराच्या अंगाने भोगीत राहणे बरे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading