ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.756

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५६

दीपप्रकाश दीपी सामावला कळिके सामावली ज्योती । ज्योती सामावोनी बिंब हरपलें तैसी जाली स्वयें स्थिति । संचित प्रारब्ध दग्ध पटन्यायें हे दृश्यभ्रांति । देहो जावो अथवा राहो फिटला संदेहो मृतिकेचि कायसी खंती रया ॥१॥ रूप पाहोनियां दर्पण ठेलें शेखीं अभास दृष्टी राहिला । न पाहतां मुख जाणे तो आपण तैसा अनुभव जाला रया ॥२॥ या प्रपंचाचें कवच सांडुनी बाहेरी अविद्या दृश्य संहारी । पदी पद ग्रासुनी ठेलें जें बुडोनि राहिले अंतरीं । चैतन्याचे मुसे हेलावत दिसे जेवीं तरंगुसागरीं । कूर्माचिये परी आंगचि आवरी तो स्थिर जाला चंद्र करी रया ॥३॥ तेथे जाणणें निमाले बोलणे खुंटले जेवीं जीवनी जीवन मिळालें । दश दिशा भरूनी दाटलें की सुख सुखासी भेटो आलें । ज्ञानदेव म्हणे आम्हां जितांचि मरणें । की कोटी कोटी जिणे ऐसें निवृत्तीने केले रया ॥४॥

अर्थ:-

दीपाचा प्रकाश जसा दीपांत सामावतो किंवा दीपज्योती कळिकेत सामावते. प्रतिबिंबाचा बिंबात लोप झाल्यावर ज्या प्रमाणे बिंब हा धर्म लय पावतो त्या प्रमाणे माझी स्थिति झाली आहे. संचितातून भोगास निघालेला प्रारब्धरूप पट जळून गेला तरी तो आकाराने जसाचा तसा दिसतो. त्यातील सत्व मात्र जळून जाते.त्याप्रमाणे प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळे भ्रांतिरूप दृश्याची प्रतिती येते. (दृश्यांतर्गत) स्वतःचा देह जावो अथवा राहो. त्या देहरूप मृतिकेच्या नाशाची खंती करावी काय.रूप पाहून आरसा बाजुला केला तर काही वेळ प्रतिबिंब पाहिल्याचा आभास जसा डोळ्यांत राहतो. त्याप्रमाणे प्रारब्ध असेपर्यंत हा दृश्य भाग दिसणारच वस्तुतः आरशांत मुख नसतांना आरशाशी दृष्टीचा संबंध होऊन आरशाच्या पासून ती दृष्टी परत फिरून आपल्या मुखालाच पाहते. तसाच माझे स्वरूपाविषयी मला अनुभव झाला. प्रपंचाचे कवच टाकल्यामुळे अविद्या कार्य दृश्याचा नाश होतो. आणि आत्मपद ब्रह्मपदाशी एकरूप होते. यानंतर दिसणारे दृश्य ते समुद्रावरील तरंगाच्या हेलकाव्या प्रमाणे दिसत आहे. कासव ज्याप्रमाणे स्वेच्छेने आपले अवयव आवरतो. त्याप्रमाणे सर्व वासनांना आवरून बोधरूपी चंद्रकिरणाने तो स्थिर होतो. अशा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाची गोष्टच नाहीशी झाली.अर्थात बोलणेही संपले ही स्थिति पाण्यांत पाणी मिळून एकरूप होते तशी झाली. आतां ते स्वरूप परिछिन्न भाव टाकून दशदिशेला व्यापले असे म्हणावे. किंवा आत्मसुख परमात्मसुखाला भेटावयास आले असे म्हणावे. अशी स्थिति झाली असतां. आम्हाला जीवंत असतांनाच शरीरभावाने मरण प्राप्त झाले आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टिने अनंत कल्पकोटी जीवित प्राप्त झाले. अशी स्थिति श्रीगुरूनिवृत्तिरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading