
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४६
सुखाची आवडी घे कां रे गोविंदी । चित्त हें आनंदी ठेऊनियां ॥१॥ मनाची मोहर लावा की रे नामी । मनोरथ कामी गुंतूं नका ॥२॥ अकळित काळ जंव आहे दूरी । तंव तूं श्रीहरि चिंत वेगीं ॥३॥ देहाचा दीपक जंव आहे देहीं । तंव तो निवडुन घेई निके ॥४॥ निवृत्ती सोपान ज्ञानदेव म्हणे । श्रीगुरू ही खुण बुझेतीना ॥५॥
अर्थ:-
तुम्हाला सुखाची इच्छा असेल तर परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेऊन गोविंदाचे नामस्मरण करा.आपले मनोरथ पूर्ण करून घेण्याची खटपट करता मनाचा ओढा भगवन्नामोच्चाराकडे वळवा. न कळत छापा घालणारा काळ जो पर्यंत दूर आहे तो पर्यंत हरीचे चिंतन करा. जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत त्या अव्यक्त परमात्म्याची ओळख करून घ्या.मला व सोपानदेवांना श्रीगुरू निवृत्तीरायांनी सांगितलेली खूण आम्ही विसरलो नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.