👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२४
एक मुखं नेणती । नाम हरीचें न घेती । मुखें भलतेंचि जल्पती । तें पावती अध:पंथा ॥ नामेंवीण सुटका नाही । ऐसी वेदशास्त्री ग्वाही । जो वेद मस्तकीं पाही । ब्रह्मयाने वंदिला ॥ नित्य नामाची माळा । जिव्हे घे तूं गळाळा । तो नर कर्मावेगळा । ऐसे बोलती पुराणे ॥ नयनीं श्रवणीं हरी । आणिक काम न करी । तो साधु भक्त निर्धारीं । हरिचा आवडता ॥ ज्ञानदेवी पाहिलें । हरिनाम साधुनी घेतलें । तें समाधीस केलें । पुष्पशयनीं आसन ॥
अर्थ:-
नामाचा महिमा न जाणल्याने मुर्ख नाम घेत नाहीत. जे तोंडाने भलतेच बोलतात त्यांचे अधःपतन निश्चित आहे. ह्या नामाविण सुटका नाही ह्याची वेदशास्त्र ग्वाही देतात.ब्रह्मदेवाने त्यामुळे वेदांचे महत्व ओळखुन मस्तकी धरले. हे जिव्हे तु नित्य नामाची गुळणी घे. असे करणारा तो नर कर्मावेगळा ठरतो असे पुराण सांगतात.ज्या डोळ्यासमोर व मुखात सतत हरि असतो दुसऱ्या कामात मन नसते तो साधु भक्त निर्धाराने हरिचा आवडता होतो.मी हरिनाम साधल्याने पुष्पासनाचे आसन घालुन मला समाधीस्त केले असे माऊली सांगतात.