👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके टिपरी अभंग ८५४
भवाब्धिसागरी मांडिली टिपरी परी अनुहात वाजे गजरू वो ॥ ताळक छंदें उमटती पद वरी टिपरें टिपरीं गाजे वो ॥१॥ टिपरिया घाईं गोपाळ भाई घुळुघुळु पाई नादु वाजे वो ॥२॥ ताळकछंदें वेगु आल्हादें टिपरीनादें वाजती वो । सांडुनी ओहं धरिलें सोहं तयासी टिपरे साधली वो ॥३॥ औट हात भूमिका नीट तालछंदें टिपरी धरी वो । विरुळा जाणे एथींचे खुणे टिपरें वाजे शिरीं वो ॥ एकटसंगें टिपरे वेगें ध्वनी गगनी गाजे वो । बापरखुमादेविवर टिपरी गाजती घाई जाली टिपरीयाजोगी वो ॥४॥
अर्थ:-
देहतादात्म्य सोडण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे, म्हणून या नरददेहास भवाब्धिसागर असे म्हटलेले आहे. ह्या मनुष्यरुपी देहांत भगवत् भजनरुपी टिपरीचा खेळ मांडलेला असून, कानांत बोटे घातली असताना आतल्या आंत जो आवाज ऐकू येतो तो रात्रंदिवस सतत चालू असल्यामुळे त्यांना अनुहात ध्वनी असे म्हणतात. त्या अनुहात ध्वनीच्या ठिकाणी ‘सोऽहं’ अशी भावना करुन भगवत् भक्त भगवंताचे ध्यान करीत. तिच्या तालछंदामध्ये टिपरीवर टिपरी वाजवितात. टिपरीच्या आवाजांच्या गर्दीत गोपाळ भगवन्नामाच्या उच्चारांत नाचूं लागले असता त्यांच्या पायांतील घुंगराचा घुळुघुळु असा आवाज ‘निघतो. त्या तालछंदाच्या आनंदात टिपरीचा नाद वाजतो. त्या भजनानंदांत त्याचा ‘अहं’ असा देहाभिमान जाऊन ज्याने ‘सोऽहं’ असा नाद धरला त्यालाच टिपरी खेळणे साधते म्हणतात. साडेतीन हातांच्या शरीरांत वर सांगितल्याप्रमाणे तालांत टिपरी हातात धरा. या पारमार्थिक टिपरीची खूण जाणणारा विरळा.अशा एकमेकाच्या टिपरीच्या आवाजाने चिदाकाशांत ध्वनी घुमून राहिला आहे. टिपरीचा योग्य नांद जाणणाऱ्यात या टिपरीच्या खेळाची घाई झाली आहे. भगवत् भक्त आनंदी असून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्यांना या टिपरीच्या खेळांत घेऊन आनंदाने खेळ खेळत असतात. असे माऊली सांगतात.