ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 804

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०४

मंगळमूर्ति तूं की मनाचिया लावण्यवाणा । वेधी वेधक तूं सहजगुणा । सगुण निर्गुण न कळे तुझें विंदान । कैसे आपचि पर दाटुन रिगसी । तेथें नवलाव वणू काय कोणा रया ॥१॥ वर्णितां तुझे गुण मना मौन्य पडे । कळिकाळ बापुडे काय करील आम्हां ॥२॥ ध्यानमूर्ति तुझी मनें अळंकारली मनामाझारी संचरली । संचरतां इंद्रियें समानपदीं तुजवीण न दिसे आन बोली । तेथें भिन्नाभिन्नपणी कोणा पाहों दातारा दिठी सुखाचेनी सुखें स्थिरावली रया ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठलें की आनंदाचे ओळले ठेले । वोतप्रोत सधन नावेक नुरे कांहींएक केलें । तुझें तुज गाऱ्हाणें किती देऊं दातारा बोलवितां नव्हे भलें रया ॥४॥

अर्थ:-
हे श्रीहरि कृष्णा तुझी मूर्ति मंगलरूप आहे. तुझ्या मुखावरील लावण्यरूप बाणाने माझ्या मनाचा वेध केला आहे. म्हणजे मला तुझा वेध लागला आहे. सहज स्वरूपस्थितिने त्यारूपाचा बोधकही तूंच आहेस. तुझ्या स्वरूपाचा निर्धार करू गेले तर तूं सगुण आहेस की निर्गुण आहेस याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून तूं असा आहेस किंवा तसा आहेस असा काहीच निश्चय करता येत नाही. तुम्ही स्वतः सृष्टिनिर्माण करून त्यामध्ये प्रवेश करता या तुमच्या कृतिचे कोणी वर्णन करावे. तुझे गुण वर्णन करू गेले असता मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तटस्थ होते. त्याठिकाणी बिचारा गरीब काळ आम्हाला काय करणार आहे? अशी तुझी मूर्ति मनांत ध्यान केले असता त्या मनांत तुझा आपोआप प्रवेश होतो. तसा प्रवेश झाला म्हणजे मन तर भगवंतरूप होतेच पण इंद्रियांची स्थिति तशीच होते. मग त्या इंद्रियांना व मनाला तुझ्यावांचून दुसरे काही दिसत नाही. म्हणून बोलताही येत नाही. अशा ऐक्यस्थितित मनाचा उपरम झाला असता त्याठिकाणी भिन्नभावाने कोणास पाहात बसू? कारण तुझ्या स्वरूपसुखामध्ये मनाची दृष्टि स्थिर झालेली असते. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हे आनंदरूपाने मनांत येऊन राहिल्यामुळे ओतप्रोत घनानंद मूर्तिशिवाय यत्किंचित सुद्धा करण्याला काही शिल्लक राहात नाही, हे तुझ्या स्वरूपाचे वर्णन हे च श्रीहरि तुझ्यापुढे किती करू? तेंव्हा तुझ्या स्वरूपाविषयी काही एक न बोलता मौन धरून राहावे हेच चांगले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading