👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६२
योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
अर्थ:-
योग, यज्ञ, विधीविधान ह्या मार्गाने त्याची प्राप्ती होणार नाही. ह्या उपाध्या उगाच लाऊन घेऊन दंभ का माजवतोस? भावाविणे देव दुर्लभ आहे व अनुभव समजण्यास गुरुकृपा हवी. गतआयुष्यातील पुण्यामुळे भक्तीची संधी मिळाली आहे तेंव्हा त्याचे तप केले नाहिस तर देव कसा प्राप्त होईल? तसेच गुरुकृपेचे गुज गुरुनी सांगितल्या शिवाय हित कसे ते कोण सांगणार? साधुसंगतीने हित होते त्यामुळे साधु़संगतीशिवाय तरणोपाय नाही असे दृष्टांत आहेत असे माऊली सांगतात.
