👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८८
अनुपम्य तेजें धवळलें ब्रह्मांड । विश्वरूपी अखंड तदाकार ॥१॥ रसी रस मुरे प्रेमाचे स्फुंदन । एकरूपीं धन हरि माझा ॥२॥ नाद आणि ज्योती परिपूर्ण आम्हां । परेसी महात्मा उजेडला ॥३॥ जाला अरूणोदयो उजळलें सूर्यतेज । त्याहुनी सतेज तेज आलें ॥४॥ हरपल्या रश्मी देहभाव हरि । ऋद्धिसिद्धि कामारी जाल्या कैंशा ॥५॥ निवृत्ति उपदेश ज्ञानियां लाधला । तत्त्वी तत्त्व बोधला ज्ञानदेव ॥६॥
अर्थ:-
परमात्म्याच्या अगाध तेजाने सर्व ब्रह्मांड शुद्ध झाले आहे. सर्व जगांत एक परमात्माच भरला आहे. अशी तदाकार रूपाने अखंड प्रतिती आली. आनंदरस व प्रेमाचे स्फुंदन ही दोन्ही परमात्मप्रेमात ऐक्य पावल्यामुळे तो एक श्रीहरिच एक रुपाने त्रैलोक्यात व्यापला आहे. अशी प्रतिती आली अशी स्थिती झाली असता बाकीच्या गोष्टीची काय कथा. परिपूर्ण नाद आणि ज्योती हा परा म्हणजे ज्ञान त्यासह वर्तमान माझ्या अंतःकरणात शिरती झाली. सूर्योदय झाला असता सूर्याच्या तेजाने विश्व उजळले जाते.त्या सूर्यतेजाहूनही अधिक सतेज परमात्मतत्त्व आहे. या परमात्म तेजामुळे सर्व वृत्ती हरपून गेल्या आणि रिद्धीसिद्धी या दासी मला निवृत्तीरायांनी उपदेश केल्यामुळे झाल्या व परमात्मतत्त्वाचा बोध झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.