
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५६१
वर्ण ना व्यक्ति अमुप निजतेज । संतांचे ते गूज आत्मरुप ॥१॥ मुक्ताचा सागर भरिंत दाहि दिशा । पाही जीवदशा बुडुनि जाय ॥२॥ ते खूण दाविली माझिया नयनीं । चिदरत्नाची खाणी उघडली ॥३॥ निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव लाधला । सुखिया हो झाला तेणें सुखें ॥४॥
अर्थ:-
आत्मस्वरुपाला वर्ण नाही, रुप नाही पण ते अत्यंत तेजोरुप आहे ही संतांची गुह्य गोष्ट होय. ज्याच्या प्राप्तीने जीवदशा नाहीशी होऊन सर्व दिशा मुक्त पुरुषाच्या बोधाने भरुन जातात. व जीवदशा नाहीशी होते.ते आत्मस्वरुप मला दाखवून ज्ञानमय रत्नांची खाण मला उघडून दिली. हे स्वरुप मला निवृत्तीरायांच्या कृपेने प्राप्त झाले व मी त्या योगाने पूर्ण सुखी झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.