ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.330

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३०

तुज जाणावया जाय देवा । तंव आठवे इंद्रियांचा हेवा । मनें करुनियां ठेवा । स्थान एक निर्मिले ॥ मग इंद्रिये भजती मना । अल्प जाली पैं वासना । स्वरुप देखावया नयना । मन नयन एकरुपें ॥ तुझे ध्यान आवडे कान्हा । रुप न्याहाळी नयना । निजी निरंतर वासना । कृष्ण ध्यानीं तत्पर ॥ ऐसें तुझे रुप चोखडें । मने निवडिलें पैं कोडें । जे योगियां न संपड़ें । ध्यान रुपी रया ॥ या रूपाचा सोहळा देई । हेंचि मागतुसे पाहीं । आणिक नमगे गा कांहीं । तुजवांचोनी स्वामीया ॥ जरी स्वार्थं करु कल्पनेचा । तरी हाचि विस्तारु प्रपंचाचा । काय यासी वर्णू वाचा । तूं दीनाचा स्वामी होसी ॥ नको हा संसार व्यर्थ । भक्ति ज्ञान वैराग्य परमार्थ । हाचि देई मनी स्वार्थ । नलगे अर्थ मायेचा ॥ माझ्या मनें ध्यान केलें । रुपी रुप हिरोनी घेतले । थितं मीपणाहिं नेले । मज आपले म्हणावे ॥ गोवी विज्ञान पदविये । ज्ञानाग्नी दावी मांडवीये । दृश्य द्रष्टा सर्वज्ञ सोये । अवघा होये दातारा ॥ विश्व हें तूचि क्षरलासी । आत्मा जगदाकांरे होसी । सवेंचि क्षरले मोडिसी । तदां शेखीं एकत्व ॥ बापरखुमादेविवर ध्यान । वृत्तीसी साधलें पूर्ण । ज्ञानदेव म्हणे निधान । विठ्ठलीं मन स्थिरावलें ॥

अर्थ:-

हे देवा तुला जाणावयाला जावे तर इंद्रिये प्रतिबंध करतात. विषयाकडे ओढून नेतात. म्हणून मनाला आवरुन एकांतात एक स्थान निश्चित केले, असे केल्यावर इंद्रिय आणि वासना ही मनांच्या स्वाधीन झाली. त्यामुळे परमात्म स्वरुप पाहण्याला एक मनच डोळा झाले हे कान्होबा तुझे रुप पाहिल्या बरोबर तुझे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झाली. त्यामुळे मनाची वासना निरंतर कृष्णध्यानपर झाली. योग्यालाही जे ध्यानात सापडत नाही असे ते तुझे सुंदर रूप मनाने, कौतुकाने निवडले.आता एवढेच म्हणणे आहे की, या रुपाच्या सुखाचा सोहळा नित्य दे. याशिवाय दुसरे कांही मागत नाही.या सुखाचा परित्याग करुन काल्पनिक स्वार्थ करु म्हटले तर. तोच प्रपंचाचा विस्तार होय. त्याचे वर्णन वाचेने काय करावयाचे हे कृष्णा तू दीनावर दया करणारा आहेस. म्हणून प्रार्थना एवढीच की. हा मिथ्या संसार मला नको. मला जर काही हवे असेल तर परमात्म्याची भक्ति, परमात्मस्वरुपाचे यथार्थज्ञान, त्याचे साधन तीव्र वैराग्य त्याने प्राप्त होणारा परमार्थ ह्यातच स्वार्थ आहे. असे माझे मनी नित्य असावेत हा मायेचा व्यर्थ क्षुद्र अर्थ मला नको. माझ्या मनाने ध्यान केले माझे रुप परमात्मरुपांत ऐक्य पावले व्यर्थ असलेला मीपणा गेला. असे करुन हे कृष्णा, तू मला हा माझा आहे असे म्हण दृढअपरोक्ष ज्ञानाचे पदवीत माझे चित्ताचे ऐक्य कर, ज्ञानरुप अग्नीच्या प्रकाशांचा मांडव मला दाखव. दृश्य, द्रष्टा. सर्वज्ञत्वादि सर्व मी होईल अशी सोय कर. हे विश्व तूंच बनला आहेस. व स्वेच्छेने वाटेल तेव्हां तूंच मोडून टाकून शेवटी एकत्वाने राहतोस. त्याचे ठिकाणी माझे मन म्हणजे. श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी वृत्तीला पूर्ण ध्यान साधले. म्हणूनच रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल स्वरुपाच्या ठिकाणी ते स्थिरावले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading