ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.289

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८९

मनाची सृष्टी स्वप्न वर्तवी दृष्टी । अळंकारलें उठी गंधर्वनगर ॥ तेथिचिये राणिवेसाठीं । कां भ्रमु धरितोसीं पोटीं । जेथे पाहता पाहणे नुठी । तोचि होई । । म्हणोनी देखणीया जवळीके । कीं दृष्टिवीण सुके । तैसें स्वानुभवें स्वानुभव मावळे । ज्याच्या ठायी ॥ ते अवस्थेवीण दृष्टी । गोचर होई वेगी । देखणेचि दृष्टी । विठ्ठल रया ॥१॥ तुझे तूंचि विंदान जाणोनि पाहीं । आपेंआपवीण विचारू नाहीं ॥२॥ म्हणोनी एकमेक मज आठवे । आठवेची विसरोनि फावे । पैं देहद्वयभाव विरोनी जाय । तेथे पदत्रयांची मांडणी । की तत्त्वत्रयाची वाणी । या पांचांते जेथ न फावे । । कर्मेंद्रिया ज्ञानेसी । ज्ञानेंद्रिये जो नेमेसी । तंव ते विस्मो करूनी पाहे । । सुख स्वानुभवा दुःख प्रकाशलें । ते सुख केवीं फावे । याचिया गुणागुण न गुंतिजे । हृदयी सुखावोनि तेंचि तू राहे रया ॥३॥ मग आंगे शेजबाज । कीं हे बाह्येद्रियांचे उपभोग । मानिसी साच जरी सोंग । स्वप्नींचे असे ऐसे जाणतां । निदसुरा होसी दातारा । या स्वप्निच्या वोरबारा बापा । वोथरसी कांपा । । म्हणोनी बाप रखुमादेविवरू विठ्ठलु । उघडे डोळांचि निधान । देखिजे तंव मार्ग सोपा । म्हणोनि जेथिच्या तेथे पाहतां यावीण नाहीं दुजें । वायां खटपट करिसी बापा रया ॥४॥

अर्थ:-

स्वप्न आणि गंधर्वनगर हे मनकल्पित खोटे असते. त्याप्रमाणे जागृत व्यवहाराचे ऐश्वर्यही खोटे आहे. त्याच्या प्राप्तीकरिता भ्रमित होवु नकोस ज्ञाता व ज्ञान ज्या ठिकाणी उठत नाही अशा परमात्मप्राप्तिकरिता खटपट कर, विचाराचे दृष्टीने व्यवहारिक दृष्टी नष्ट होऊन स्वानुभव ज्याचे ठिकाणी मावळतो ते स्वरूप स्वानुभवाचे आपले ठिकाणी तूंच हो. ती दृष्टी म्हणजे अवस्था दृश्यावाचून परमात्मा श्रीविठूरूपच आहे. तू आपल्या आत्मस्वरूपाच्या छंदानी आत्मविचाराशिवाय दुसरा विचारच नाही. असे जाणून आत्मस्वरूपाकडे पाहा. असे पाहू लागलास म्हणजे पाहण्याचा विषय परमात्मा आणि त्यास पाहणारा मी एक अशी प्रथम काही वेळ निदिध्यासनाची स्थिती असते. पाठीमागून तो आठवही विसरून आपोआप परमात्मरूप प्राप्त होते. पण त्याठिकाणी स्थूल, सूक्ष्म देहद्वय विरून जाऊन तेथे तत्त्वमसि या तीन पदाची एकता किंवा जीव, ईश, आणि परमात्मा हे तीन व पूर्वीचे देहद्वय मिळून पांच संख्या होते व त्या पाच संख्येचा परमात्मस्वरूपाचे ठिकाणी नियमीत असलेली ज्ञानकर्मेद्रिये यांचा संभवही नसतो. असा स्वानुभवाचा मोठा विस्मय आहे. सुखरूप परमात्माच स्वानुभवाने प्राप्त झाल्यानंतर दुःखच सुख कसे होते या विवंचनेत तू न पडता त्या सुखात राहा. एक बाज त्याजवर बिछाना व त्याच्यावर आपले अंग अशा तहेचे बाह्यंद्रियांचे उत्तम भोग जर सत्य मानशील तर आत्मस्वरूप ज्ञानशून्य असा झोपी गेल्यासारखा होशील. स्वप्नातल्या व्यवहारावर विश्वासून का राहतोस. तो भ्रम टाकून देऊन आत्मस्वरूप डोळे उघडून अनंत सुखाचा ठेवा, माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल त्यांना डोळे भरून पाहा.म्हणजे तुला आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा होईल. याकरिता जागच्या जागीच म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी परमात्मस्वरूप पाहवे. हेच मुख्य कर्तव्य आहे. याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून दुस-या फुकट खटपटी कां करतोस?असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading