ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.253

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५३

वायुने वळावे धूमें मिळावें अभ्रे पाणिये गळावें । आकाश पोकळ म्हणोनी क्षोभा जाऊ नये । निज चेईलया केऊते पळावे रया ॥ निराळ निराळ सहज ते निराळ ते क्षीर चातका दुभें । एक धरुनि येरे सकळीक वावो मी काय काय तेथे न लभे रया ॥ स्तन ना वाहे जयाचिये माये ते बाळक केंहीं न धाये रे रे । दृष्टी ओळणे तेचि क्षीर जालें कासवीचे गोत्र पाहें रे रे ॥ केळी पोकळ म्हणोनि सांडिशील झणे तंव फळवरी निवांत राहें रें रें । नाहीं नाहीं म्हणोनि थरारिसी झणें नाहीं ते तेथेंचि पाहीं रे रे ॥ रत्नाचिया आशा घात जाला तया राजहंसा झणे भुलों नको ते सारे रे । द्रोणाचेनि नांवे मातिये सळ चढे होई त्या कोळिया ऐसा रे रे ॥ बापरखुमादेविवरु हृदयींचा जागता सांडुनी अनुसुखाची कायसी चाड । सिध्दचि सांडुनी अनेआन जल्पसी तरी सहजचि पडियेंसी द्वाड रया ॥

अर्थ:-
वायुचा धुमाशी संयोग झाला की आभाळातुन पर्जन्य वर्षाव होतो.पण हे सर्व आकाशातच घडते पण सामान्य नजरेत आकाश तर पोकळ आहे.म्हणुन आकाश शब्दाची रचना ग्रंथांनी परमात्म्यासाठी केली आशा आकाशाच्या व्यापकपणा पासुन कोण पळुन जाऊ शकतो? असे ते व्यापक ब्रह्म निराळे आहे व तेच चकोराचे ही अमृत होते थेंबुटे होऊन. असा विचार करुन पाहिले त्या परमात्म्यापासुन काय प्राप्त होणार नाही. स्तन नसणाऱ्या कासवीने तिच्या पोरांना कसे बरे तृप्त करावे. तीने त्यांना पाहिले तरी ते त्यांच्यासाठी अमृतच आहे. केळीचे झाड पोकळ म्हणुन सोडलेस तर त्याची फळे कशी बरे खाता येतील. म्हणुन तो परमात्मा दिसत नसला तरी तरी त्याचे चिंतन केलेस तर तुला ज्ञानदृष्टी लाभेल.पाण्यात पडलेल्या ताऱ्यांच्या प्रतिबिंबावर चोच मारणाऱ्या राजहंसाला काय रत्नाचा चारा मिळेल तेथे त्याचा घातच होईल. एकलव्याने मातीच्या पुतळाचे द्रोणाचार्य बनवुन त्यांना गुरु मानले तर तो श्रेष्ट धनुर्धर झाला. तसाच गुरुवाक्यावर भरवसां ठेव. माझे पिता व रखुमाईचे पती ते सर्वांच्या हृदयात स्थानापन्न आहेत.त्यांना सोडुन तुला इतर सांसारिक सुखाची आठवण व्हावी हा द्वाडपणा सोडुन दे नाहितर मोठ्या दुःखात तु पडशील असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading