👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९१
शांती दिसे कोहं पर दिसे सोहं । क्षमा हे कोहं कारूण्य सदा ॥१॥ स्नेहाची दिवाळी फेडूनी काजळी । या दिपें वोवाळी जीवशिवीं ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान दृश्य द्रष्टा दर्शन । रूपी रूपस्थिति अंकुरलीसे ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल साच । मी माझे आहाच वायांवीण ॥४॥
अर्थ:-
सर्व सामान्य जीवांना ‘कोहं’ म्हणजे मी कोण आहे. हे कळत नसते. अशा जीवांच्या अपराधाची क्षमा करून कारूण्याने सदैव असणाऱ्या श्रीगुरूनी पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारा जो परमात्मा तोच तू आहेस असा उपदेश केला असता जीवाच्या ठिकाणी मीच परमात्मा आहे. असा बोध उत्पन्न होऊन सर्वत्र शांति दिसु लागते. प्रपंचाची काजळी फेडून स्नेहाची म्हणजे आनंदाची दिवाळी होते. अशा बोधरूपी दिव्याने जीवशिवांची आरती करावी. त्या स्वरूपांच्या ठिकाणी ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, दृश्य, द्रष्टा, दर्शन ह्या त्रिपुटी त्या परमात्मस्वरूपांवरच आहेत.माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच एक सत्य आहे. या शिवाय मी माझे इत्यादी दिसणारा प्रपंच मिथ्या आहे. असे माऊली सांगतात