👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४२
सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरिकिर्तन । दया क्षमा समाधान । संतजन साधिती ॥ निजधर्म हा चोखडा । नाम उच्चारू घडघडां । भुक्तिमुक्तिचा संवगडा । हा भवसिंधु तारक ॥ लावण्य मान्यता विद्यावंत । सखे स्वजन पुत्र कलत्र । विषय भोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणावरती ॥ जें जें देखणे सकळ । तें हें स्वप्नीचें मृगजळ । म्हणोनि चिंती चरणकमळ । रखुमादेविवर विठ्ठलाचें ॥
अर्थ:-
धर्माच्या सर्व कारणांच्या पुर्ततेसाठी हरिकीर्तन दया क्षमा व समाधान आवश्यक असते व तेच संतजन साधत असतात. भवसिंधु तारक, भुक्ती व मुक्तीचा संवगडी असलेला निजधर्म हा घडघडा नाम उच्चारामुळे साध्य होतो. विद्वानातील अहंकार, शरिर सौंदर्य, सखे, स्वजन, मुले पत्नी हे विषयभोगची प्रतिके आहेत.व ते देहासहित मरणाच्या भोवऱ्यात टाकणारे आहे. जे जे जड सुंदर दिसते ते एक मृगजळासारखे भासमान आहे म्हणुन माझे पिता व रखुमाईचे पती यांचे चरणकमळांचे चिंतन कर असे माऊली सांगतात.