ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.994

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळण अभंग ९९४

तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा । माझें मन लागो तुझ्या पायीं हो करीं कृपा । तूं सांवळे सुंदरी हो करी कृपा । लावण्य मनोहरी हो करी कृपा । निजभक्तां करूणा करीं हो करीं कृपा ॥१॥ पंढरपुरी राहिली । डोळां पाहिली । संते देखिली । वरूनी विठाई वरूनी विठाई । सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा । उजळ कुळदीपा । बोध करी सोपा । येउनी लवलाही येउनी लवलाही ॥धृ॥ तुझा देव्हारा मांडिला हो करीं कृपा । चौक आसनीं कळस ठेविला हो करीं कृपा । प्रेम चांदवा वर दिधला हो करीं कृपा । ज्ञान गादी दिली बैसावया हो करीं कृपा । वरी बैसविली आदी माया हो करीं कृपा । काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकार । त्यांचे बळ फार । सर्वसुख देई सर्व सुख देई ॥२॥ शुक सनकादिक गोंधळी हो करीं कृपा । नाचताती प्रेमकल्लोळी हो करीं कृपा । उदो उदो शब्द आरोळी हो करीं कृपा । पुढे पुंडलीक दिवटा हो करीं कृपा । त्याने मार्ग दाविला निटा हो करीं कृपा । आई दाविली मूळपीठा हो करीं कृपा । बापरखुमादेविवरू । सुख सागरू । त्याला नमस्कारू । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥

अर्थ:-
हे विटेवर उभी असलेल्या सखे, विठाबाई मजवर कृपा कर माझे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी असू दे. मेघकांतीप्रमाणे शामवर्ण सुंदर, तेजस्वी, मनाला आल्हाद देणारे असे तुझे रूप आहे. हे देवी जो मी तुझा भक्त त्या मजवर तूं कृपा कर.तूं पंढरपूरास राहिलेली आहेस तुला तेथें संतांनी व मीही पाहिले. तेंव्हा कुलोद्धार करणाऱ्या सच्चिदानंद अंबाबाई तूं लवकर येऊन मला सोप्या रितीने बोध कर. देव्हारा मांडून व त्यावर चौकोनी आसन घालून त्यावर कलश ठेविला आहे व वरच्या बाजूस प्रेमाचा चांदवा दिला आहे. तुला बसण्यांकरितां ज्ञानरूपी गादी घातली आहे व त्यावर आदिशक्ति तुला बसविले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार वगैरे फार बलवान झाले आहेत. तरी त्यांचा नाश करून मला सुखी कर. शुक सनक, सनंदन, सनत्कुमार, नारद वगैरे तुझ्या नामाचा गजर करणारे गोंधळी होऊन उदो उदो शब्दाचे आरोळी देऊन तुझ्यापुढे आनंदाने नाचतात. त्यांनी तुझी थोरवी गायिली पुंडलिकाने ज्ञानदिवटी हाती घेऊन देवीचे मूळपीठ जे पंढरपूर ते दाखवून सोपा असा भक्तिमार्ग प्रगट केला. म्हणून सर्वसुख देणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच केवळ सुखाचा सागर असून त्यांना मी नमस्कार करून सर्वसुख मला प्राप्त करून दे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading