ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.965

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९६५

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके वासुदेव अभंग ९६५

बाबा ममतानिशी अहंकार दाट । रामनामें वासुदेवीं वाट । गुरूकृपें वोळलें वैकुंठ । तेणें वासुदेवो दिसे प्रगट गा ॥१॥ वासुदेवा हरि वासुदेवा । रामकृष्ण हरि वासुदेवा ॥धृ॥ आला पुंडलिक भक्तराज । तेणें केशव वोळला सहज । दिधलें विठ्ठलमंत्र बीज । तेणें जालें सर्व काज गा ॥२॥ रामकृष्ण वासुदेवें वैष्णव गाताती आघवें । दिंडी टाळ प्रेमभावें । वासुदेवीं मन सामावें गा ॥३॥ शांती क्षमा दया पुरीं । वासुदेवो घरोघरीं । आनंदें वोसंडेल अंबरीं । प्रेमें डुलें त्रिपुरारी गा ॥४॥ वासुदेवी ज्ञेय ज्ञान । ध्यानी मनी नारायण । वासुदेवो परिपूर्ण । कैसें क्षरलेंसे चैतन्य गा ॥५॥ वासुदेवीं वाहूनि टाळी । पातकें गेली अंतराळीं । वासुदेवो वनमाळी । कीर्तन करूं ब्रह्ममेळी गा ॥६॥ ज्ञानदेवा वासुदेवी । प्रीति पान्हा उजळी दिवी । टाळ चिपळी धरूनि जिवीं । ध्यान मुद्रा महादेवी गा ॥७॥

अर्थ:-

व्यवहारात ममता आणि अहंकार होच कोणी एक निविड अंधकाराची रात्र आहे. त्या रात्रीतून पार पडून वासुदेवाला प्राप्त करून घेण्याची वाट रामनामाचे स्मरण आहे. ती वाट दाखविणारे श्रीगुरूच आहेत त्यामुळे वासुदेव. जो भगवान श्रीकृष्ण तो स्पष्टपणे दिसतो. म्हणून तुम्ही वासुदेव हरि रामकृष्ण या नावांचा जयघोष करा या भूतलावर पंढरी क्षेत्रामध्ये प्रथम पुंडलिकराय आले. त्याच्याकरिता भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून येथे आले. त्यांनी आपल्या विठ्ठल नामाचा मंत्र दिला. त्या मंत्राच्या योगाने पुंडलिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. त्याच सांप्रदायाचे अनुकरण करून हातात टाळ वीणा घेऊन प्रेमाने सर्व वैष्णव गातात त्यामुळे त्यांचे मन सहजच वासुदेवात समाविष्ठ होते.शांती क्षमा दया या सर्व वैष्णवांना पूर्ण प्राप्त होऊन घरोघर आनंद ओसंडून येतो. ते प्रेम पाहून त्रिपुरारी भगवान शंकर कैलासांत प्रेमाने डोलू लागतो. भगवत् भक्ताचे ठिकाणी ज्ञेय ज्ञान ध्यान व मन ही सर्व नारायण स्वरूपच झालेली असतात. तसेच एक परिपूर्ण वासुदेवच सर्वत्र विस्तारलेला आहे. अशा तऱ्हेचे ज्या भगवत् भक्ताचे भजन असते. वासुदेव नावाच्या गजरात टाळी वाजविली असता सर्व पातके आकाशांत नाहीसी झाली. वनमाळी जो भगवान वासुदेव त्याचे ब्रह्मानंदात कीर्तन करावे असाच त्यांचा छंद असतो. श्रीगुरू निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांची एवढीच प्रार्थना आहे की माझे अंतकरणांत वासुदेवाच्या भजनाविषयी प्रीतीचा पान्हा सर्व दिवस प्रज्वलीत करावा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading