ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.939

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९३९

आठवितां नुपरे मोविता न मोववे । सांगतां न सांगवे गुण त्याचे ॥१॥ परतलिया दृष्टि काळा देखिला जगजेठी । वेणिभागी पृष्ठीं कैसा दिसतु असे ॥धृ॥ त्या गुणाच्या संगें कैसें अद्वैत जालें । मन म्हणोनी काळेपण बहु झालें गे माय ॥२॥ पुरेपुरे बुद्धि निमाली वेदवाणी । आतां केवीं वर्णुं चक्रपाणी बहु काळे गे माय ॥३॥ द्वादश मंडळे वोवाळुनी आलिये । तंव तंव काळें देखिलें रूपडे त्याचें ॥४॥ अनुमाना नये अनुमाना नये । परतल्या श्रुति चोजवेना ॥५॥ मनें बुडी दिधली दाहीं हारपली । चोवीस मावळली अगाध पंथीं ॥६॥ प्रीतीचें पांघरूण काळे घोंगडें । रखुमादेविवरें विठ्ठलें मज केलें उघडे ॥७॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपाचे वर्णन काय करावे? चिंतन करता त्या चिंतनांत तो आवरत नाही. त्याचे माप करावयाला गेले तर होत नाही. त्याच्या गुणाचे वर्णन करता येत नाही. त्यामुळे बहिर्मुख असलेली दृष्टि अंतर्मुख करून तो कृष्णवर्णाचा जगजेठी श्रीकृष्ण परमात्मा पाहिला. तो पहा वेणी असलेला, पाठीकडच्या बाजूनी कसा दिसतो तो.त्याच्या गुणांच्या चिंतनानेच कसे अद्वैत प्राप्त होते तें पहा,.त्यामुळे माझे मन आता परमात्मरूप झाले. ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धि आणि वेद लय पावतात अशा चक्रपाणी श्रीकृष्णाचे वर्णन कसे करू? द्वादश मंडले म्हणजे बारासूर्य यांच्या तेजापेक्षा जास्त तेजस्वी असणारे श्रीकृष्णाचे रूपडे मी पाहिले. त्याच्या स्वरूपाची प्राप्ती अनुमानाने होत नाही. कारण साक्षात् श्रुतिनाही तो कळत नाही. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी किती मोठेपणा आहे म्हणून सांगावे. त्याच्या ठिकाणी मनाने बुडी दिली. दहा इंद्रिये हरपली. सांख्याने कल्पना केल्याप्रमाणे चोवीस तत्त्वेही मावळून गेली म्हणजे त्याच्या स्वरूपांत सर्व त्रैलोक्याचा लोप झाला. असा परमात्मा भक्तांच्या संतोषाकरिता काळे वर्णाचे घोंगडे पांघरून घेऊन. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठलानी मला देहभावापासून उघडे केले म्हणजे ब्रह्मरूप केलें.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading