👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१५
व्योमाचा पाऊल शिरेंवीण पांगुरलें । मस्तकेंवीण तुरंबिले सुमन वो ॥१॥ सुखाचें सुख निजसुख नव्हे । नव्हे तें होय म्यां गिळिलें गे माये ॥२॥ नेणोनी शहाणे झाले चौघेजण । अठरांसी खुण बाणली माये ॥३॥ रखुमादेविवरु जीवनींजीवनु । त्याहुन माझें मनु परतें देवा ॥४॥
अर्थ:-
आपल्याला ब्रह्मानुभव आला तो प्रकार असा झाला की डोक्यावांचून आकाशाचा पदर पांघरला. घ्राणावांचून फुलांचा वास घेतला. ज्या सुखाच्या ठिकाणी सुख म्हणणेपणाही नाही. असे सुख मी गिळून टाकले. त्या परमात्म तत्त्वाला चारी वेदांनी विषय करून न जाणता वेद शहाणे झाले याची खुण अठरा पुराणांना उत्तम समजली आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे जीवन असलेला तो सोपाधिक असल्यामुळे त्याचे जे निरूपाधिक स्वरूप त्याठिकाणी माझे मन स्थिर झाले. असे माऊली सांगतात.