👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५०३
पौर्णिमेच्या दिनीं चंद्र अकळी जाहला । आमावास्ये ठेला पूर्ण कळी ॥१॥ देखिलें गे माय विचित्र विलक्षण । जाहलें स्वप्न भान जागृतीशी ॥२॥ मातेचिये पोटीं पिता जो जन्मला । नवलाव जाहला काय सांगो ॥३॥ मश्यकें ओलांडिला स्वये मेरूगिरी । दहनाच्या पाठारीं पीक जाहलें ॥४॥ चंचूच्या सांडशे पक्षी घेते पाणी । सिंधुशी गिळुनी बैसिन्नला । बापरखुमादेविवर विठ्ठलचि जाणे । परब्रह्म अनुभवणें परब्रह्म ॥५॥
अर्थ:-
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कळाहीन झाला व अमावस्येस तो कलापूर्ण झाला हे म्हणणे जसे विलक्षण व विपरीत आहे. तसेच लोकांना सत्यत्वानी दिसणारी ही जागृती मला आत्मदृष्टीने स्वप्न समान विचित्र, विलक्षण दिसते.अहो काय नवलाईची गोष्ट की माझ्या बापाने माझ्याच आईच्या पोटी जन्म घ्यावा किंवा यःकश्चित मशकाने एवढा मोठा मेरू पर्वत ओलांडून जावा किंवा अग्नीने खाक झालेल्या पठारावर उत्तम पीक यावे. किंवा तहान शमविण्याकरिता चोचींने चार थेंब पाणी घेण्याचेच ज्या पक्षांचे सामर्थ्य त्याने समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकावे, ह्या सर्व गोष्टी विचित्र आहेत. त्याचप्रमाणे माया निर्मित जगत पसारा सत्य भासणे विचित्र आहे. आपण स्वतः माझे पिता व रखुमाईचे पती ह्यांच्या सारखे विठ्ठलरुप झाल्या शिवाय विठ्ठलाचे दर्शन होणार नाही. किंवा परब्रह्मानुभव, परब्रह्म झाल्याशिवाय मिळणार नाही. असे माऊली सांगतात.