
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३६८
ऐसा योगीराज देखित अवचट । उन्मनी लंपट रात्रंदिवस ॥१॥ सत्रावीची शिव टाकुनी राहिला । पाहण्यातीत झाला सर्वा ठायीं ॥२॥ असिपदी आनंद प्रियरूप जाण । ध्यानांचे कारण जेथे नाहीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसा योगीराणा । तयाचिया चरणा प्रणिपात ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यासाच्या योगाने स्वरूप स्थिती ज्याला प्राप्त झाली आहे. असा पुरूष अवचित नजरेस पडला तर उन्मनी दशा लंपटच होऊन रात्रंदिवस त्याला सोडीत नाही. अशा पुरूषांना पुन्हा सत्रावीचे अमृतपान करावे लागत नाही. कारण अदृश्य जे ब्रह्मतत्त्व त्यांत तो तद्रूप झालेला असतो. ‘तत्त्वमसि’ यातील असि पदाच्या बोधाने त्याला अस्ति, भाति, प्रियरूपत्व म्हणून पुन्हा ध्यानाची जरूरी नसते.अशा सिद्ध योग्याला माझे दंडवत असो.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.