ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.334

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३४

भेटी जाली धुरेसी । पालुटू जाला या जीवासी । लोहो लागले परिसेसीं । ते सुवर्ण जालें ॥ ऐसा गुणागुणाचा दाता । तो विश्व व्यापिलें रे अनंता । काय पाहतोसी आतां । विमानी वाट पाहातुसे ॥१॥ तरी मी गुंतलो दातारा । येऊनिया संसारा ॥धृ॥ नट घेऊनियां अंवगणीं । करु नेणे संपादणी । एकत्र झाले लवण पाणी । ते मिळोनि गेलें ॥ ऐसा बहुतां गुणांचा दाता । तो विश्व व्यापिलें रे अनंता । काय बा पाहातोसी आतां । आपुल्या सारिखें करी बापा ॥२॥ चंद्र चकोरां नावडे । सेखीं होणार तेंचि घडे । वृथा वेंचितासी खडे । परीस म्हणोनि ठेविसी ॥ आतां असो हा डांगोरा ॥ शरण रिघें रखुमादेविवरा । अरे अरे विठोजी दातारा । नवजे घरा आणिकांच्या ॥३॥

अर्थ:-

ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला असता त्याचे सोने होते त्याप्रमाणे परमात्मस्वरुपाची भेट झाली असता जीवाच्या स्वरुपांचा परमात्म स्वरुपांत पालट होतो. म्हणजे जीव परमात्मरुप होतो. गुणागुणाचा दाता जो परमात्मा तो तू सर्व व्यापून राहिला आहेस आणि मी तर या संसारात येऊन गुंतून पडलो आहे. मला यातून बाहेर काढण्यास उशीर का करतोस? विमानातून येऊन तू मला काढशील अशी मी तुझी सारखी वाट पाहात आहे. एखाद्याने नटाचा वेष घ्यावा. परंतु त्याला सोंगाची संपादणी करता येऊ नये अशी माझी स्थिती झाली आहे. तथापि तुं जीवावर अनंत उपकार करणारा आणि विश्वव्यापक असल्यामुळे, पाणी मीठ जसे एक होऊन जातात. त्याप्रमाणे तू मला एकरूप करण्यांत कशाची वाट पाहात आहेस. आपल्या सारखे मला लवकर करुन टाक.चकोराला चंद्र काय आवडत नाही. पण चंद्रोदय होई पावेतो तो काय करणार? केव्हां तरी चंद्रोदय होऊन त्याला आनंद होणारच. त्याप्रमाणे भक्तांना तुझी प्राप्ती होणारच पण भेटी देण्याला वेळ लावून त्या भक्तांना तुझ्या भेटीचे वेड विनाकारण लावित आहेस म्हणजे परीस म्हणून त्यांच्यापुढे खडे ठेवीत आहेस. तेंव्हा या सर्व भानगडी बाजूला राहू द्या. रखुमादेवीपती,तुला आम्ही शरण आलो आहोत. हे दातारा, आम्हां भक्तांवर दया कर आणि आमची चित्तवृत्ति दुसरीकडे जाऊ देऊ नकोस अशी तुला आमची प्रार्थना आहे. असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading