👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२७
निरंतर ध्याता हरि । सर्व कर्माची बोहरी । दोष जाती दिगंतरी । रामकृष्ण उच्चारणीं ॥ जप तीर्थ हेंचि नाम । जपव्रता हेंचि नेम । ऐसे धरोनियां प्रेम । तोचि भक्त तरल ॥ जीव शिव एक करी । शांति क्षमा जरी धरी । त्यापाशीं नित्य श्रीहरि । प्रत्यक्ष आपण उभा असे ॥ ज्ञानदेव म्हणे नित्य । त्यांचे वचन तेंचि सत्य । त्यांचे वचन सर्व कृत्य । सिद्धी पावेल सर्वथा ॥
अर्थ:-
रामकृष्णनामाचे निरंतर ध्यान केले तर सर्व कर्मांचा नाश होतो व दोष दिंगतरी जातात. जप हेच तीर्थ व जप हेच व्रत हे प्रेमाने मानले तर तो भक्त तरुन जातो. जीवसेवा हे हीच शिवपूजा आहे मानतो, शांती व क्षमा ह्यांचा अंगिकार करतो, त्याच्या जवळ प्रत्यक्ष श्रीहरि उभा राहतो. जो ह्या मार्गाचा नित्य अवलंब करेल त्याचे वचन हे सत्य होते व त्याचे वचन हे पूर्ण होते त्याला सर्वसिध्दी प्राप्त होतात असे माऊली सांगतात.