आस्वाद सुभाषितांचा भाग ६७*
ब्राह्मणो भोजनप्रियः।
(वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या ‘आस्वाद सुभाषितांचा भाग १’ या पुस्तकातून सादर)
अलंकारप्रियो विष्णुजलधाराप्रियो शिवः ।
नमस्कारप्रियो भानुब्राह्मणो भोजनप्रियः ॥
ही उक्ती फार प्रसिद्ध आहे. पेशवाईत ब्राह्मणांनी भोजन करून राज्य घालविले असे विनोदाने म्हटले जाते. दुसऱ्या बाजीरावांच्या काळात भोजनाचा अतिरेक झाला, हे सत्य आहे. या सुभाषितात कोणाला काय प्रिय आहे हे सांगितले आहे. विष्णुला अलंकार, शंकराला जलधारा प्रिय, सूर्याला नमस्कार प्रिय व ब्राह्मणाला भोजन प्रिय असते. भगवान विष्णुच्या अंगावर अनेक अलंकार असतात. पायात वाक्या, नुपूर, कमरेला मेखला, त्यावर अधोमुख क्षुद्रघंटिका, गळ्यात अलंकार, वैजयंतीमाला ती पाच रंगाच्या फुलांची व पाच रंगाच्या रत्नांची असते. कौस्तुभमणी, तुळशीहार, वनमाला, कानात मकराकार कुंडले, मस्तकावर तेजस्वी मुकुट, दंडावर बाजूबंद, दहा हातात दहा वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या, मनगटावर कंकण असे अनेक अलंकार ज्यांना प्रिय आहेत, असे भगवान विष्णु आहेत.
भगवान शंकराला जलधारा प्रिय आहेत. आपल्या देशात शंकराची जेथे जेथे स्थाने आहेत. तेथे तेथे जलप्रवाह, नद्या, झरे वगैरे जलस्थाने आहेत. महादेवाच्या कोणत्याही मंदिरात जा, पिंडीवर संतत जलधारांचा अभिषेक सतत चालू असतो. ती जलधारा कमी पडते म्हणून की काय शंकराने आपल्या मस्तकावर गंगाच धारण केली आहे. म्हणूनच शंकराला जलधारा प्रिय आहे.
सूर्याला लोक नमस्कार करतात. सूर्याचे तेज दाहक उग्र असते त्यामुळे त्याला दुरून नमस्काराशिवाय काही उपाय आपण करू शकत नाही. सूर्योदयाला किमान बारा सूर्यनमस्कार आरोग्यासाठी घालावेत असे शास्त्र सांगते. त्रिकाल स्नान करून सूर्याला अर्घ्य दिले जाते, गायत्री मंत्र सुद्धा सूर्याला नमस्कारच आहे. सूर्याला नमस्कार प्रिय असतो म्हणून तर आपण सूर्यनमस्कार घालतो. अर्घ्य देतो, गायत्री मंत्र म्हणतो.
ब्राह्मणाला भोजन प्रिय असते. कदाचित ब्राह्मण ईश्वराच्या मुखापासून निर्माण झाल्यामुळे त्यांना सतत तोंडात काही तरी खायला लागत असावे. पूर्वी दुर्वास ऋषी फार खादाड म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जठराग्नि फार पेटलेला असायचा. खायला नसले की, ते संतापून शाप देत असत. पांडव द्वैतवनात असताना दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आले व जेवण मागू लागले. श्रीकृष्णाने हे संकट निवारले
पेशवाईत दुसरा बाजीराव खाण्याचा फार शौकीन होता. तो सोन्याच्या ताटात अनेक पक्वांनाचा समाचार घेई पेशवाईत खाणारे ब्राह्मण खूप प्रसिद्ध होते. जिवाजीपंत खासगीवाले जिलबीची ताटेच्या ताटे फस्त करीत. ते जसे खात होते तशी त्यांची ताकदही प्रचंड होती. चेष्टा करणाऱ्या लोकांना त्यांनी ताकद दाखविली. चांदीच्या पेल्याचा हातात मुटका केला
जेवणाराला भोजन इतके प्रिय असते की विचारू नका. कपाळ जितके घट्ट लागते तितके पोट ताठर होईपर्यंत जेवणारे ब्राह्मण पूर्वी होते. त्यातून जर परान्न मिळाले तर अधिक आनंद, परान्नं पुष्टीवर्धनम्, परान्न पुष्टता वाढविणारे आहे असे त्यांचे मत असते. या जन्मात परान्न मिळाले तर घे खाऊन,
परान्नं दुर्लभं लोके प्राणा: जन्मनि जन्मनि ॥
प्राण प्रत्येक जन्मात मिळतो त्याची पर्वा करू नका. परान्न याच जन्मात मिळेल. पुढच्या जन्मात परान्न मिळेल याचा भरवसा काय? एका दरिद्री ब्राह्मणाला देव प्रसन्न झाला व वर माग म्हणाला त्याने धन न मागता उत्कृष्ट भोजन दे म्हणून वर मागितला.
सुभाषित
आस्वाद सुभाषितांचा भाग १३८
(वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या ‘आस्वाद सुभाषितांचा भाग २ या पुस्तकातून सादर)
विषादपि अमृतं ग्राह्यम्
अर्थ
विषादपि अमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
नीचादपि उत्तमा विद्याऽमेध्यादपि कांचनम् ।।
विषातून सुद्धा अमृत घ्यावे. लहान मुलाकडून सुद्धा सुभाषित घ्यावे. नीचाकडून सुद्धा उत्तम विद्या घ्यावी. वाईट पदार्थातून सुद्धा सोने घ्यावे.
विष हे माणसाचा घात करणारे आहे. पण काही काही विषारी वनस्पतीमध्ये औषधी गुण असतात. आज प्राण वाचविणारी अनेक औषधे ही विषारी असतात. औषधाच्या बाटलीवर ‘विषारी, सावधान’ असे लिहिलेले असते, म्हणून विषात जर प्राण वाचविण्याचा गुण असेल तर ते अमृत समजून घ्यावे.
लहान मुले काही वेळा अतिशय सुरेख, अर्थपूर्ण व समर्पक बोलतात. ते लहानाने सांगितले म्हणून त्याज्य नाही. य. गो. जोशी यांच्या कथेतील चिमुकली मुलगी आपल्या आजीला म्हणते, “आजी, दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जास्त जपावे लागते.” म्हणजे मुलीपेक्षा मुलीच्या मुलीला म्हणजे नातीला अधिक सांभाळावे लागते. लहान मुलीच्या तोंडातून आलेले काय सुंदर सुभाषित आहे. भक्त प्रल्हाद, ध्रुव, सनत्कुमार, नचिकेत हे सारे बाल आहेत. त्यांची अनेक सुभाषिते पुराणात प्रसिद्ध आहेत. आपल्या घरी सुद्धा आपल्याला नेहमी असा अनुभव येतो की लहान मुलगा किंवा मुलगी एखाद्या वेळी असा सुविचार बोलून जाते, की प्रौढांनी सुद्धा चकित व्हावे. केवळ लहान मुलाने सुविचार सांगितला यासाठी त्या पोराला काय कळते म्हणून अव्हेरू नये ते सुभाषित असेल तर स्वीकारावे.
नीच माणसाकडून सुद्धा उत्तम विद्या घ्यावी. इथे नीच शब्दाचा वाईट अर्थ नाही. आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचा माणूस एवढाच त्याचा अर्थ आहे. उपनिषदामध्ये जानश्रुति नावाचा एक क्षत्रिय राजा आहे तो ब्रह्मविद्या शिकण्यासाठी रैक्व नावाच्या शूद्र गाडीवाल्याकडे गेला. बृहस्पतीचा पुत्र कच संजीवनी विद्या घेण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे शिकण्यास गेला. गुरु शुक्राचार्य श्रेष्ठ ऋषी, तपस्वी होते. तरी दैत्यांच्या संगतीने त्यांना गौणत्व प्राप्त झाले होते. लहूजी वस्ताद हे मांग जातीचे पैलवान होते पण त्यांच्याकडे तलवार, भाला, दानपट्टा ही विद्या असल्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय जातीचे तरुण सुद्धा त्यांच्याकडे शिकण्यास जात. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके त्यांच्याकडे शिकले. उत्तम विद्या ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडून विद्या घेण्यास काहीही कमीपणा नाही.
वाईट वस्तूत पडलेले सोने घ्यावे. उकिरड्यावर पडलेले सोने अमंगळ नाही. कुठेही असले तरी सोने मौल्यवान आहे.
या सुभाषितामध्ये दोन पाठभेद आहेत. तेही चांगले आहेत. ‘अमित्रादपि सद्वृत्तम्’ शत्रूपासून सुद्धा चांगला आचार घ्यावा. ‘स्त्रीरत्नं दुष्कुलादपि’ वाईट कुळातील स्त्री रत्न असेल तर पत्नी म्हणून स्वीकारावी. वाईटातून सुद्धा चांगले घ्यावे हा मौलिक विचार या सुभाषिताने सांगितला आहे.
©️ हृषीकेश वासुदेव उत्पात
राधानारायण
पश्चिमद्वार
पंढरपूर
9822259282
वै भागवताचार्य वा ना उत्पात यांची पुस्तके
आस्वाद सुभाषितांचा भाग 1,2,3
रुक्मिणी स्वयंवर
सावरकर एक धगधगते यज्ञकुंड
कलंक मतीचा झडो
संत नामदेवांचे पसायदान
मातृमहिमा
संत तुकारामांचे पसायदान
गंगा गौरव
सावरकर आक्षेप व खंडन.