ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.394
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३९४
नवा आंत ओवरी औटपीठा जवळी । शून्यातीत काळी सुकुमार ॥१॥ अंगुष्ठ पूर्वार्ध मसुरामात्र दीर्घ । उन्मनीचा मार्ग तेच ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे पूर्वार्धातील गीर । सर्व हे साचार विश्व दिसे ॥३॥
अर्थ:-
भुवयीच्या आतील बाजुस पश्चिम भागाकडे असलेल्या भागात दोन दल असलेल्या भागास योगीलोक अविनाशी ओवरी म्हणतात. त्या ठिकाणी शरीरामध्ये औटपीठा जवळ एक शून्याच्याही पलीकडे असे सूक्ष्म स्थळ आहे. त्याचा आकार मसुरीएवढा आहे. त्याठिकाणी प्राण स्थीर केला म्हणजे पुढे उन्मनी अवस्था प्राप्त होते. अशी वृत्तीची स्थिरता केल्यानंतर सर्व जगाचा लय होऊन एक बिंदुमात्र दिसतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
