👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५८
नयनाचे शेजारी दशवे द्वार बापा । एक मार्ग सोपा बोलतसे ॥ आधारीं पवन अपान विराजे । आंगुळे चार साजे तयां ठायीं ॥ मणीपूर चक्र नाभिस्थान कमळ । सहा अंगुळांचा खेळ असे तेथें ॥ वायुचक्र अनुहात हृदय असे एक । प्राणाशी नि:शंक जेथे नेईं ॥ अग्नीचक्र ध्रुवांग शोभते प्रकाशत्व । प्राणासी उलथावे तयावरीं ॥ सहस्र दळीं ब्रह्मरंध्र शोभतसे निळे । प्रकाशाचे उमाळे जेथे असती ॥ ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम । या अभंगी निःसीम अर्थ जाला ॥
अर्थ:-
दोन्ही डोळ्यांच्या वरच्या बाजूस सहस्त्रदळ कमळामध्ये शरीराच्या नव द्वाराहून भिन्न दाहावेचे द्वार आहे. त्या ठिकाणी प्राणाची स्थिती कशी असावी. याचा सोपा मार्ग सांगतात. आधार चक्राचे ठिकाणी अपान वायु आहे. त्याच्या चार बोटांवर नाभिस्थानाचे ठिकाणी मणीपूर चक्र आहे. तेथे वायु कोंडावा पुढेच सहा अंगुळावर वायुचक्र आहे. त्याठिकाणी अनुहात ध्वनी होतो. तेथपर्यंत प्राणवायु न्यावा.पुढे सहस्त्रदळाचे कमळात एक निळे ब्रह्मरंध्र आहे. तेथे प्रकाशाचे उमाळे दिसतात असे ते तेजोमय अग्नीचक्र आहे. तेथे प्राणवायु न्यावा. अशी ही प्राणायामाची प्रक्रिया माऊली ज्ञानदेव सांगतात.
