ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.470
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४७०
माझे जिवींची आवडी । पंढरपूरा नेईन गुढी ॥१॥ पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥ जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रूप आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ॥४॥
अर्थ:-
माऊली म्हणतात, माझ्या मनात पंढरपूरास हातात पताका घेऊन वारीला जावे अशी फार आवड आहे. त्याचे कारण माझे मन त्या पंढरीरायाचे गुण वर्णन ऐकून रंगून गेले आहे. त्यामुळे माझ्या मनाला पंढरीरायाच्या भेटीचा ध्यास लागला आहे. ज्याच्या ध्यासामुळे मी जागृतित आहे किंवा स्वप्नात की झोपेत आहे याची आठवण मला राहिली नाही. ज्याच्या रूपाकडे पाहिल्यावर आनंद हृदयांत साठवतो. असा ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल समचरण ठेऊन उभे आहेत. व आपल्या समचरण ठेवण्यामध्ये सगुण व निर्गुण ही दोन्ही ही रुपे एकआहेत. अशी तो आपली खूण दाखवित आहे.असे माऊली सांगतात.
