ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.248
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४८
हे पृथ्वी तुझे लंकेसी आधारू रे रावणा ते तो अपराधे बाधकेवीण आणिली । नेणो किजी वानरपद्ये देखतांची रविशशीगिळिले रया ॥ विरोध न कीजे विरोध न किजे पाडु न पाहाता मागे करिसी ते नव्हे रे रावणा । प्राणुचि पारखा जाला रे गव्हारा जिणें केवीं सिद्धि जाईल रे रया ॥ दो भूतांचि दशा जाणोनि रे रावणा तयाचा आगम सागरी रिगाला । तयाच्या गडे गड मेळउनी सापें डाव शिळीं बांधला ॥ हनुमंत वायुचेनि मिसें तो आधींची पाईकी करी । तयाचेनि रोखें ही रतली पंचभूते उभा राहासी काशावरी रे रावणा ॥ आकाश तेंचि अवकाश भीतरीं आत्माराम आवेशला तुजवरी । तया म्हणोनी बाणजाळ घातलें येरें कवळी वरच्या वरी रे रावणा ॥ आतां तुज देहो कैंचा रे रावणा आत्मा तोचि राम जालारे । बापरखुमादेविवर विठ्ठले ना झुंजता ते काये केलें रे रया ॥
अर्थ:-
अरे, रावणा जी पृथ्वी म्हणजे सीतादेवी तुझ्या लंकेला आधार आहे, तिला तं अपराधावाचून का आणलीस ! तुला कल्पना नाही. इतकी वानर पद्म आली आहेत पाहा. त्या वानरपद्यातील मारूती नावाच्या एका वानराने जन्माला आल्याबरोबर सूर्य पाहिला की लागलीच त्याला गिळून टाकले.मग चंद्राची काय कथा. याकरिता रामाशी विरोध करू नकोस तू आपली योग्यता न पाहता रामाच्या पश्चात तिला चोरून आणलीस हे बरे नव्हे रे रावणा ! मुर्खा, तुझा प्राणच तुला पारखा होऊन जाईल. मग तुझे जीवित कसे टिकेल याची शंका आहे रे रावणा.अरे रावणा, पुढे सांगितलेल्या दोन भूतांची काय दशा झाली ती पाहा. अरे त्या रामचंद्राचे सैन्याचे आगमन सागराजवळ झाल्याबरोबर त्यांनी दगड जमा करून तत्काळ त्या दगडाचा पूल बांधला रे. याप्रमाणे एक जलतत्त्वाची व्यवस्था झाल्यावर, वायु तत्त्वाची
देवता मारूती हा आधीच रामाचा सेवक बनला आहे. त्या वायूच्या आधीन बाकीच्या भूतांना त्याच्या समोर उभे तरी राहता येईल का?अवकाश व्यापून राहिलेल्या आत्मारामाच्या अवेशापुढे तू मारलेले बाण त्याला कसे लागतील ते वरच्यावर नष्ट होतील. हे रावणा तुझ्या देहातील चैतन्य स्वरुप आत्मा रामच आहे. तेव्हा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यानी तुझी काय अवस्था केलीत ते तू बघ. असे माऊली सांगतात.
