ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.224

👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२४
असे ते न दिसे । दिसे ते नाही होत । तयापरी दिसेंदिस जुगे जाती पारंपार ॥ ऐसें जाणत जाणत । तुझे चित्त को भ्रमित । अझुन न राहसी निवांत । तरी भले नव्हे ॥ सांडी माया मोह द्वंद दुराशा । ज्यालागी शिणसी ते तुजसी उदासा ॥ स्वप्नींचे धन ते धनची नव्हे । मृगजळींचे जळ ते जळची नव्हे ॥ अभ्रीची छाया ते छायाची नव्हे । तैसे विषय सुख सुख नव्हे रया ॥ स्पर्षे मातंग दीप्ती पतंग । नादे मृग, घ्राणे भुंग, रसने मीन । या पांचांहि विषयी, पांचही मारिले सेखीं । निर्धारुनी पाहांता पाचही तुजपासीं । तुज केवीं निकें होईल रया ॥ कापुराचिये मसी । मेघ माखिन म्हणसी । कापूर कां वाया जाळितोसी क्षण एका । तेथे कापूर ना मसी । उफका सिण कोठे पाहसी रया ॥ उपजतांचि देह मृत्यूच्या तोंडी । मी माझे म्हणता न लाजसी रया । शरण जाई त्या निवृत्ती तो तारील संसृति । बापरखुमादेविवर विठ्ठलाचिये भक्ति रया ॥
अर्थ:-
ब्रह्म हे आहे पण दिसत नाही. व जे दिसते म्हणजे प्रपंच दिसतो. परंतु तो सिद्ध होत नाही. अशा संसाराचा विचार करिता ही अनेक दिवसांची परंपरा चाललेली आहे.तरी हे असे असता तुझ्या चित्ताचा भ्रम नष्ट होऊन अजून तू निवांत राहात नाहीस हे चांगले नाही. याकरिता मायेपासून उत्पन्न झालेल्या, मोह उत्पन्न करणाया अनात्मद्वैत पदार्थातील दुराशा टाकून दे. ज्याच्याकरता तू नित्य परिश्रम करतोस त्याचा वियोग होऊन ते तुला उदासीन करतील. स्वप्नातील धन धन नाही, मृगजळात पाणी नाही. आभाळाची छाया ही छाया नाही.तसे विषयाचे सुख हे सुख नाही. विषयामुळे काय हानी होते ते पहा स्पर्शामुळे हत्ती माततो, रुपामुळे पतंग मरतो,नादामुळे मृग पकडला जातो. वासामुळे भुंगा फसतो.व रसनेमुळे मासा गळात फसतो.असे पांच विषय पाच पध्दतीने मारतात. तसे पाहिले तर हे पांच ही तुझ्याजवळ आहेत त्यामुळे तुझे कसे भले होईल.चांगल्या कापराला काजळी नाही. व तरी ही कापूर जाळुन त्याची काजळी धरुन आकाशाला काजळी फासण्याचा का उपराटा प्रयत्न करुन का उगाच शिणतो. उपजताच देह काळाच्या तोंडी पडतो तरी ही मी माझे म्हणताना लाजत नाहीस. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाची भक्ती केलीस व श्रीगुरु निवृत्तीस शरण गेलास तर जन्ममरणाच्या फेऱ्यात पडणार नाहीस असे माऊली सांगतात.
