ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.273
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७३
मेरूपरतें एक व्योम आहे । तेथे एकु पाहे तेज:पुंजू ॥ तेज नव्हे तेज:पुंजू नव्हे । शितळ नव्हे शांतही नव्हे ॥ बाप रखुमादेविवरू विठ्ठलही नव्हे । नव्हे तो होये चतुर्देहेंवीण ॥
अर्थ:-
स्वर्ग, मृत्यू, पातळ हे मेरू पर्वताच्या आधारावर आहेत त्याच्याही पलीकडे एक व्योम म्हणजे चिदाकाश आहे. त्या चिदाकाशात तेजःपुज असा कोणी एक आहे. खरा विचार केला तर ते तेजही नाही व तेजःपुंज ही नाही. शितळ ही नाही व शांतही नाही कारण तो परमात्मा सर्व धर्म विवर्जित आहे.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते स्थूल सूक्ष्मादि चारी देहांहून विलक्षण असे आहेत. असे माऊली सांगतात.
