👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
जेथुनीया परापश्यंती वोवरा अभंग क्र.१४१
जेथुनीया परापश्यंती वोवरा । मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥
तें रूप सुंदर नाम तें श्रीधर । जेणें चराचर रचियेलें ॥
वेदाचें जन्मस्थान वेदरूपें आपण । तो हा नारायण नंदाघरी ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ । गोपिकांचें हित करि माझा ॥
अर्थ: परा, पश्यंती, मध्यम, वैखरी हे वाणीचे सर्व प्रकार परमात्माचे वर्णन करु शकत नाहीत व शेवटी आपल्या हद्दीतील ओवरीत निवांत पडुन राहतात. तो नितांत सुंदर अ़सलेला श्रीधर ह्या चराचराचा निर्माता आहे. वेदांचे जन्मस्थान असलेला तो वेदरुप परमात्मा नंदाघरी नारायण झाला आहे.निवृत्तिनाथ म्हणतात, तो गोपिकांचे हित करणारा माझा देव माझे मनोरथ पूर्ण करतो.
उफराटी माळ उफराटें ध्यान अभंग क्र.१४२
उफराटी माळ उफराटें ध्यान । मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥
तें रूप आवडे भोगिता साबडें । यशोदेसि कोंडें बुझावितु ॥
नहोनि परिमाण हरपलें ध्यान । आपणचि रामकृष्ण जाला ॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी । मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥
अर्थ: मनाला उन्मनी अवस्थेत त्याची मूर्ती पाहिली की उफराटे ध्यान व उफराटी माळ न जपता ही त्याचा लाभ होतो. येथे महाराज कर्मकांडाचा निषेध करतात. त्याच उन्मनी अवस्थेत निरागस कृष्णरुप पाहताना ते रुप यशोदेचीही कोडी निरसन करताना दिसते. त्याचे ध्यान करताना ध्यानच हारपून जाते व आत्माच स्वयंभ रामकृष्ण बनतो.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या वैकुंठातील कृष्णाच्या पायावर त्याचेच नाम अर्पण केले की जपमाळ व जप तोच होऊन जातो. त्या परती जपमाळ दुसरी नाही.
श्यामाचि श्यामशेज वरी अभंग क्र.१४३
श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥
शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं । तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥
अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार । गोपिकासमोर हरीराजा ॥
नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि । पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥
शांति नेणें क्षमे पारु विश्रांतिसी अरुवारु । तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥
विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे । तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥
निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म । चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥
अर्थ: त्या श्याम रंग परमात्म्याच्या रंगामुळे आकाशच श्याम रंगात रंगुन त्याची शय्या झाले व त्या श्याम रंगामुळे क्षिरसागर ही अलौकिक निल तेजाने चमकत आहे. जो परमात्मा क्षिरसागरात शेषशय्येवर आहे तोच नंद यशोदेच्या घरात खेळत आहे. ज्याने क्षिरसागराची निर्मीती केली तोच परमात्मा गोपीकांसाठी हरिराज आहे. जे योगी मनाच्या दृष्टीने स्थुल जगताला पाहतात तेंव्हा ते जगत मिथ्या मायिक आहे हे त्यांना समजत नाही. व ज्ञानदृष्टी देऊन तोच हरि ते मायिक विज्ञात्वाला दुर करतो.जो परमात्मा शांती व क्षमेचे विश्रांतीस्थान आहे. किंवा ह्या दोन्ही त्याच्याजवळ वस्ती करतात.तो गोपाळांची कामे करत आहे. ज्याला विचारवे की तुझे मुळ रुप कोणते तर तो ठसठसशीत (देटुगे) पणे निराकार निर्गुण सांगतो तो गोसावी कृष्ण होऊन गोकुळात राहतो. निवृतिनाथ म्हणतात,त्याचे नुसते नाम घेतली की विजय होतो त्याच्या चिंतनाने चिंता दुर होते अ़सा ते चिंतामणी नाम आहे.
विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा अभंग क्र.१४४
विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा । बोलताचि वाचा हारपती ॥
तें रूप श्रीधर कृष्णाचा आकार । सर्व निराकार एकरूपें ॥
नसतेनि जीव असतेनि शिव । तदाकार माव मावळली ॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप । विश्वीं विश्वदीप आपेंआप ॥
अर्थ: जगत पित्याचे वर्णन करताना चारही वाणी लोप पावतात.परमात्म्याने कुठलेही रूप धारण केले तरी त्याची सर्व रूपे एकच आहेत.स्वरूप कुठलेही असले तरी ब्रह्मरूपाचा बोध झाल्याने भ्रमाचा नाश होतो.
निवृत्तिनाथ म्हणतात, जगताचे मुळ रुप हे कृष्णरुपच आहे. व तो विश्वाचा दिप होऊन सहज वावरतो.
तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध अभंग क्र.१४५
तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध । नामाचा उद्बोध नंदाघरी ॥
प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥
निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख । विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥
अर्थ: जगाचे तारक तीर्थ असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे नांव घेऊन नंदाच्या गोकुळात लोक एकमेकाला उद्बोध करतात. जो प्रकाशमान करण्याऱ्या सर्व वस्तुंमध्ये प्रकाशच आहे तो द्वैत अद्वैतात आडकत नाही. निवृतिनाथ म्हणतात, विश्वाचे विश्वरुप असणाऱ्या हरिच्या नामाचे साधन बनवल्यामुळे त्या कृष्णाचे सुख मला लाभले आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६