संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १३६ ते १४०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि अभंग क्र.१३६

ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि । हरपती बुद्धी शास्त्रांचिया ॥
तें रूप साजिरें गोकुळीं गोजिरें । यशोदे सोपारें कडिये शोभे ॥
न संटे त्रिभुवनीं नाकळे साधनीं । नंदाच्यां आंगणीं खेळे हरी ॥
निवृत्ति निधडा रूप चहूं कडा । गोपाळ बागडा गोकुळीं वसे ॥

अर्थ: ज्याच्या रुपाचे वर्णन करताना शास्त्रांची बुध्दी हारपते त्याच्या दारी सर्व सिध्दीही सेवेसाठी तिष्ठत असतात. तेच गोजिरे साजिरे रुप यशोदेच्या कडेवर बसुन गोकुळाला दर्शन देत आहे. जे रुप त्रिभुवनाला दिसत नाही कोणत्याही साधनात अडकत नाही ते नंदाच्या अंगणात खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच स्वरुप ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत ते गोकुळात संवंगड्यांबरोबर खेळत आहे.

न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण अभंग क्र.१३७

न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण । श्रुति जेथें संपूर्ण हरपती ॥
देवरूप श्रीकृष्ण योगियां संजीवन । तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥
न दिसे वैकुंठी तें योगियांचे ध्यानबीज । तो गोपाळाचें काज हरि करी ॥
निवृत्ति गयनि हरि उच्चारितां माजीं घरीं । होती मनोरथ पुरी कामसिद्धी॥

अर्थ: ज्याचे वर्णन श्रुती करु शकत नाहीत ज्याच्या स्वरुपात कोणतेही द्वैत नाही तेच स्वरुप आत्मखुण आहे. तेच देवस्वरुप कृष्णरुप योग्यांना संजिवनी देते तेच रुप हे परिपूर्ण आत्मस्वरुप आहे. जे स्वरुप वैकुंठात दिसत नाही जे स्वरुप योग्यांच्या ध्यानाचे बीज आहे ते सगुण रुपात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या कृपेने मी त्याच नामाचा जप केला त्या मुळे माझे सर्व मनोरथ व इच्छा पूर्ण झाल्या.

सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी अभंग क्र.१३८

सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी । उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥
तें रूप सावळें योगियाचें हित । देवांचें दैवत कृष्णमाये ॥
सत्रावी उलंडी अमृत पिऊनि । ब्रह्मांड निशाणी तन्मयता ॥
निवृत्ति अंबु हें वोळलें अमृत । गोकुळीं दैवत नंदाघरीं ॥

अर्थ: योग्यांच्या ध्यानात चंद्ररुपाला बाजुस करुन ज्ञानसुर्याचा शोध घेतला जातो. व त्या ज्ञानसुर्याचा बिंबाकार ते योगी मनात ठसवतात. चंद्र म्हणजे अंधार व सुर्य प्रकाश हे अज्ञान व ज्ञानाचे रुपक आहे. तेच ज्ञानबिंब सावळे रुप धारण करुन सर्व देवांचे दैवत झाले असुन तेच योग्यांना हितकार आहे. योगी चंद्राच्या सतरावीतुन ते नामामृत घेऊन आपल्या मनात ब्रम्हांडाचे स्वरुप म्हणुन धारण करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, नंदाच्या घरी तेच दैवत अवतरले असुन ते नामामृत त्याने मला ही पाजले आहे.

न साधे योगी न संपडे जगीं अभंग क्र.१३९

न साधे योगी न संपडे जगीं । तें नंदाच्या उत्संगी खेळें रूप ॥
कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळीं । गोपिका सकळीं वेढियेला ॥
गाईचे कळप गोपाळ अमुप । खेळतसे दीप वैकुंठीचा ॥
निवृत्ति दीपडें वैकुंठें साबडें । यशोदामाये कोडें चुंबन देत ॥

अर्थ: जे ब्रह्मस्वरुप योग्यांच्यां ध्यानात सापडत नाही जे जगाला दिसत नाही ते नंदाच्या मांडीवर खेळत आहे. तोच माझा हरि गोकुळात कृष्ण बनुन खेळत आहे व त्यांने सर्व गोपिका नादावल्या आहेत. तो वैकुंठीचा दिप गाईंचे कळप घेऊन गवळ्यांसोबत खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मला ज्ञानप्रकाश देणारा निरागस कृष्ण माता यशोदेचे प्रेमाने चुंबन घेतो.

भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता अभंग क्र.१४०

भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता । तो गोकुळीं खेळता देखों हरी ॥
मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे । गौळणी वाडेकोडें खेळविती ॥
न संपडे ध्यानीं मनीं योगिया चिंतनी । तो गोकुळीचें लोणी हरी खाये ॥
निवृत्तिजीवन गयनीनिरूपण । तो नारायण गोकुळीं वसे ॥

अर्थ: पुर्ण समर्पण भावाने त्याचे नामस्मरण केले तर तर हरि पुर्णत्वाने प्राप्त होतो.तोच बाळकृष्ण बनुन गोकुळात खेळत आहे. तो मुक्तीदाता सर्व बाजुने जगात कोंदला आहे मात्र सगुण रुपातील त्याला, गवळणी कडेवर खेळवतात. जो परमात्मा योग्यांच्या ध्यानात सापडत नाही तोच गोकुळात लोणी चोरुन खातो.निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी त्याचे स्वरुप मला समजवल्यामुळे त्या गोकुळात राहणाऱ्या नारायण मी समजु शकलो.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading