संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ५१ ते ५५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

खुंटले वेदांत हरपले सिध्दांत अभंग क्र. ५१

खुंटले वेदांत हरपले सिध्दांत । बोलणें धादांत तेंही नाही ॥
ते रुप पहातां नंदाघरी पूर्ण । यशोदा जीवन कृष्णबाळ ॥
साधितां साधन न पविजे खूण । तो बाळरुपे कृष्ण नंदाघरी ॥
निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा । गयनीच्या द्विपा तारुं गेले ॥

अर्थ: वेदांतांत सिध्दांत असतात पण त्या पैकी एक ही ब्रह्मस्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही वेंदांची धाव तेथे खुंटते.चारी वाणी ही त्याचे वर्णन करु शकत नाहीत. जे स्वरुप वेद पाहु शकले नाही ते नंदा घरी कृष्ण होऊन अवर्तिण झाले व तेच स्वरुप यशोदेचे जीवन झाले. त्या नंदा घरी आलेल्या कृष्ण स्वरुपाला समजण्यासाठी साधना केली तरी ते कळत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गयनीनाथांचा ज्ञानरुपी दिपस्तंभामुळे माझा परमार्थचा प्रवास संपन्न झाला.

तेथे नाही मोल मायाचि गणना अभंग क्र.५२

तेथे नाही मोल मायाचि गणना । आपण ये़सणा ब्रह्मघडु ॥
ते रुप साजिरे निर्गुण साकार । देवकीबिढार सेवियेले ॥
नसंपडे ध्याना मना अगोचर । तो गोपवेषधर गोकुळी रया ॥
निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट । कृष्ण नामें पाठ नित्य वाचा ॥

अर्थ: त्याच्या स्वरुपाचे मोल करण्यास माया ही थिटी आहे. आपण किती ही केले तरी त्याच्या स्वरुपाला पोहचु शकत नाही. त्यास ब्रह्मस्वरुपाचे सगुण साकार रुप देवकीनी भोगले. जे स्वरुप ध्यान करुन ही सापडत नाही ते विनासायास गोपवेश घालुन गोकुळात आले. निवृत्तिनाथ म्हणतात जे धर्मपीठ श्री गहिनीनाथांनी भुषवले. त्या पिठात सतत कृष्णनामाचा घोष होतो.

नाही छाया माया प्रकृतीच्या आया अभंग क्र.५३

नाही छाया माया प्रकृतीच्या आया । मनाच्या उपाया न चलें काही ॥
तें रुप स्वरुप अपार अमूप । यशोदे समीप खेळतसे ॥
विश्वाचा विश्वास विश्वरुपाधीश । सर्वत्र महेश एकरुपे ॥
निवृत्ति सर्वज्ञ नाममंत्रयज्ञ । सर्व हाचि पूर्ण आत्माराम ॥

अर्थ: ते परब्रम्ह ज्याला चारी हि शरिरे नाहीत त्यामुळे त्याची छाया ही नाही व शरिरच नसल्याने मायेला ही परे आहे.म्हणुन तेथे मनाचा ही उपाय चालत नाही. ते स्वरुप येवे विशाल आहे की त्याचे मोजमाप नाही होत ते स्वरुप यशोदे जवळ खेळते. तो परमात्मा नुसता जगाचा विश्वास नाही तर विश्वाचे रुपचे आहे. व तोच सर्वांचा महा देव आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या सर्व जगात पसरलेल्या स्वरुपाला मी कृष्णनामात पाहातो व सतत त्याचा जप करतो.

प्रतिपाळ सप्रतिज्ञेचा नेम अभंग क्र.५४

प्रतिपाळ सप्रतिज्ञेचा नेम । सर्वज्ञता तम गिळीतसे ॥
ते रुप सकुमार गोप वेषधर । सर्वज्ञ साचार नंदाघरी ॥
त्रिपुर उदार सर्वज्ञता सूत्र । नामरुप पात्र भक्ति लागी ॥
निवृत्ति संपद सर्वज्ञ गोविंदा । सूत्रमणी सदा तिथे निमो ॥

अर्थ: तो परमात्मा अज्ञानरुपी अंधकाराचा ग्रास घेऊन भक्तांचे रक्षण करण्याच्या प्रतिज्ञेला अनुसरुन त्यांचे संरक्षण करतो. तेच सर्वज्ञ साचार असलेले स्वरुप गोपाळाचे रुप घेऊन आले आहे. त्रिपुरासुराला उदार होऊन सोन्यारुप्यालोहाची शहरे देणारा तो सर्वज्ञ असुन तो सुत्ररुपाने जगाचे धारण करतो. त्याच नामरुपावर विश्वास असलेले त्याची भक्ती करतात. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा ब्रह्मांड माळेचा सुत्रमणी असुन त्याच्याशी मी एकरुप झालो.

मी ज्ञानेसि विज्ञान रुपेंसि सज्ञान अभंग क्र.५५

मी ज्ञानेसि विज्ञान रुपेंसि सज्ञान । ध्यानेंसि धारणा हारपली ॥
ते रुप संपुर्ण वोळले हे खुण । नंदासी चिद्गन वर्षलासे ॥
अरुप सरुप लक्षिता पै माप । नंदा दिव्य दीप उजळला ॥
निवृत्ति संपूर्ण नामनारायण । सच्चिदानंदघन सर्व सुखी ॥

अर्थ: त्या स्वरुपाच्या ठिकाणी ईश्वर स्वरुपाचा निर्णय करणारे विज्ञानासहित स्वरुप सांगणारे स्वरुप ज्ञान व प्रकृतीच्या तत्वे सांगणारे सुक्ष्म ज्ञान ध्यानासह लयाला जाते. त्या परमात्म्याने नंदा घरी येऊन सर्वांवर चैतन्याचा वर्षाव केला.ज्याच्या अरुप स्वरुपा ला माप नाही तो प्रत्यक्ष नंदाकडे वंशरुप दिप होऊन तेवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या नारायण नामाचा जप केला तर सच्चिदानंद सहज प्राप्त होतो.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading