👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
देवामुकुटमणि ऐकीजे पुराणी अभंग क्र.९६
देवामुकुटमणि ऐकीजे पुराणी । तो हा चक्रपाणी नंदाघरी ॥
नंदानंदन हरि गौळणी गोरस । गोकुळीं हृषीकेश खेळतसे ॥
हरि हा सकुमार भौमासुर पैजा । वोळलासे द्विजा धर्मा घरी ॥
निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडे । हरिरूप चहूकडे दिसे आम्हा ॥
अर्थ: सर्व देवांचा जो मुकुटमणी आहे असे पुराणे सांगतात तो परमात्मा चक्रपाणी नंदाघरी आहे. तोच हा नंदाचा मुलगा गौवळणींचे गोरस चोरुन खातो तोच गोपाळांबरोबर गोकुळात नाना खेळ खेळतो. तोच श्रीकृष्ण भौमासुराला पैज घेऊन मारुन आला व त्यानेच धर्माराजा घरी उष्ट्या पत्रावळी उचलत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्याचे नाम अट्टाहासाने नाम घेतल्याने त्याचेच रुप मला सर्वत्र दिसते.
वेदबीज साचें संमत श्रुतीचें अभंग क्र.९७
वेदबीज साचें संमत श्रुतीचें । गुह्य या शास्त्रांचें हरि माझा ॥
तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु । कृष्ण मुक्ती देतु देतु जीवघाते ॥
अर्जुना साहाकारी द्रौपदी कैवारी । तो विदुराचे घरी अन्न मागे ॥
निवृत्तिचे धन गोकुळी श्रीकृष्ण । यादव सहिष्णु हरि माझा ॥
अर्थ: हा माझा हरि सर्व शस्त्रांचे मुळ असुन वेदांचे बीज आहे. त्या हरिला आपला जीव लावला की तो आपल्या जीवदशेतुन मुक्त करतो. तोच हरि श्रीकृष्ण बनुन गोकुळांत खेळतो आहे. तोच हरि अर्जुनाला साह्यभूत झाला, द्रौपदीचा तारणहार झाला तोच विदुरा घरी कण्या मागुन खातो. निवृतिनाथ म्हणतात, तोच हरि माझे महाधन आहे व तोच हरि गोकुळात गौळ्यांसारखा बनुन सर्वाटबरोबर सहिष्णु पध्दतीने राहात आहे.
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा अभंग क्र ९८
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा । तो गौवळीयांच्या काजा तिष्टतुसे ॥
देखिलें सांवळें पूजिती गोवळे । नंदाघरीं खेळे स्वामी माझा ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ । योगिये चिंतित हृदयीं जया ॥
अर्थ: ज्या श्रीकृष्णाची पुजा करायची ही इच्छा ब्रह्मादिकांना आहे. तोच श्रीकृष्ण गौवळ्यांची काम करण्यासाठी तिष्टत बसला आहे. गौवळी ज्या सावळ्या परब्रह्माला पुजतात तो नंदाघरी खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्याला योगी हृदयात ज्याला जपतात ते दैवत सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी अभंग क्र. ९९
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । ती उच्छिष्टे काढी धर्माघरी ॥
देखिला वो माये चक्रभुज स्वभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥
याज्ञिक अर्पिती मंत्रांच्या आहुती । तो द्रोपदियेप्रती भाजी मागे ॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामे ॥
अर्थ: जशी हंड्यांची उतरंड रचतात तसे हे ब्रह्मांड ज्याच्या इच्छेने रचले गेले तो धर्माच्या घरी उष्ट्या पत्रावळी गोळा करत आहे. हे माझे आई ज्याच्या भुजांवर चक्र आहेत असा तो कृष्ण अर्जुनाची घोडी सांभाळत आहे. ज्याच्या नावे याज्ञिक यज्ञात आहुत्या देतात तो द्रौपदीच्या ताटाला लागलेले भाजीचे पान मागुन खातो व संतुष्ट होतो. निवृतिनाथ म्हणतात, ज्याचे नाम घेत पांडव पुण्यवंत झाले त्याच दैवताचे नाम माझे मनोरथ पूर्ण करतील.
निरालंब बीज प्रगटे सहज अभंग क्र. १००
निरालंब बीज प्रगटे सहज । तो गौळियांचे काज करी कृष्ण ॥
हरि हा सावळा वेधिलिया बाळा । माजि त्या गोपाळा गायी चारी ॥
वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण । तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥
निवृत्तिचे ध्यान मनाचें उन्मन । योगिया जीवन हरि माझा ॥
अर्थ: जो परमात्मा कोणावर अवलंबुन नाही तो विश्वाचे बीज होऊन प्रगटला आहे. तरी ही तो गौळ्यांची कामे करत असतो. ज्याच्या रुपावर गवळणी लुब्ध झाल्या त्या कृष्णरुपात तो गायी चारतो.ज्याच्या चरणसेवेसाठी सुरगण व योगी तिष्टत असतात तो कृष्ण यशोदेकडे स्तनपानाचा हट्ट करतो. निवृती नाथ म्हणतात ज्या श्रीकृष्ण नामाचे ध्यानी ध्यान करतात तोच त्या योगीजनांचा प्राण आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
