ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.970

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७०

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कापडी अभंग ९७०

ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदी । मिळाली संतमांदी । त्याचे चरणरज वंदी रे ॥धृ॥ शिवनाम शीतळमुखीं । सेवीं पां कापडिया रे । दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु । पळ सुटला कळिकाळा बापुडीया रे ॥१॥ गुरूलिंग जंगम । त्याने दाविला आगम । आधिव्याधि झाली सम । तेणें पावलों विश्राम रे ॥२॥ जवळी असतां जगजीवन । कां धांडोळिसी वन । एकाग्र करी मन । तेणें होईल समाधान रे ॥३॥ देहभाव जेथें विरे । तें साधन दिधलें पुरे । बापरखुमादेविवरें विठ्ठलु रे विठ्ठलु रे विठ्ठलु रे ॥४॥

अर्थ:-
ॐकार स्वरूप आदिशंकराला नमस्कार असो ज्यांनी समतारूपी कावड खांद्यावर घेतली आहे असे जे संत समुदाय त्यांच्या चरणधुलीस मी वंदन करतो श्रीशंकराचे शांती देणारे नाम तोंडी ठेवून या संतांची सेवा करा. अशी सेवा केली म्हणजे बिचाऱ्या यमाला दुडु दुडु करीत (त्वरेने) पळच काढावा लागेल. ब्रह्मज्ञानसंपन्न अशा जंगम गुरूंनी वेदांतील महावाक्याचा उपदेश केल्यामुळे माझी शारीरिक व मानसीक दुःखें नाहीसी झाली. त्यामुळे मला यथार्थ समाधान झाले. असा जगजीवन परमात्मा जवळ हृदयांतच असतां तुम्ही रानोमाळ कां फिरता? तुम्ही आपले चित्त स्थिर करा म्हणजे सहजच समाधान लाभेल. देहभाव नाहीसा होऊन समाधान प्राप्त होते. असे हे मन एकाग्र करण्याचे साधन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी आम्हाला दिले. असे माऊली सांगतात.

Leave a Reply