👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ९५५
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९५५
कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांशी का दिली वांगली ॥धु ॥ स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्धसत्त्वगुण विणली रे । षड्गुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुंदरा शोभली रे ॥१॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे । रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुताने भरली रे ॥२॥ षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे । नवा ठायीं फाटुनी गेली ती त्वां आम्हांसी दिधली रे ॥३॥ ऋषि मुनि ध्याता मुखीं नाम गातां संदेह वृत्ती विरली रे । बापरखुमादेविवर विठ्ठलें त्वत्पदी वृत्ति मुरली रे ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्णा तुझी धोगडी म्हणजे उपाधि शुद्धसत्त्वप्रधान आहे. मग आम्हाला तमोगुणप्रधान अशी वाईट उपाधि का बरे दिलीस? सच्चिदानंदासी मिळून शुद्धसत्त्वप्रधान मायेच्या योगाने ही तुझी धोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा सहा गुणांचे गोंडे लावले आहेत.व ती रत्नजडित आहे म्हणून हे शामसुंदरा, श्रीकृष्णा तुला ती चांगली शोभते. आतां आमच्या म्हणजे जीवाच्या घोगडीला पाहिले तर प्रारब्धकर्मे, मलीन सत्त्वप्रधान अविद्या व पंचमहाभूते यानी ही विणलेली आहे.
या आमच्या देहरूप घोंगडीत रक्त, रेत, नाड्या, मल, मुत्र वगैरे घाण भरली आहे. जन्माला येणे, असणे, वाढणे, बदल होणे, क्षीण होणे व मरणे अशा सहा विकारांनी व काम क्रोध लोभ मोह दंभ व अहंकार या सहा शत्रुनी, अधिदैविक व आधिभौतिक व अध्यात्मिक अशा तीन तापांनी जणू ती विणली आहे. शिवाय तुला दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या व एक तोंड, एक मूत्रविसर्जनाचे व एक मलविसर्जनाचे अशी नऊ छिद्रे आहेत. असली घाणेरडी फाटकी घोगडी तूं आम्हांला दिली आहेस. ऋषी व मुनी तुझे ध्यान करित असता व मुखाने नाम उच्चारीत असतां मी ब्रह्मरूप असेन कसा? हा त्यांचा संशय दूर झाला. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगां, माझी वृत्ती तुझ्या पायी लीन झाली आहे. असे माऊली सांगतात.
