👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९५२
निर्गुण चवाळे आणिलें । बापनिवृत्तीनें मज पांघुरविलें ॥१॥ चौघे चाऱ्ही पदर म्हणीतले । पांघुरण झालें सारासार ॥२॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें । माझें चोरूनी जिणें उघडे केलें गे माय ॥३॥
अर्थ:-
बाप म्हणजे धन्य धन्य श्रीगुरूनिवृत्तीरायांनी निर्गुण घोंगडे म्हणजे निर्गुण परमात्म्याचे पांघरूण आणिले आणि मला पांघरविले. चौघे चारी पदर म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे ज्याचे पदर आहे. तेच सारासार विचारांने निर्गुण पांघरूण झाले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानीे माझ्या या चार देहांत असलेले जिणे नाहीसे करून उघडे केले. म्हणजे परमात्मरूप केले. असे माऊली सांगतात.
