👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७९
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥ हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥
अर्थ:-
ज्याच्या जवळ नित्यनेम आहे तो नर दुर्लभ आहे. त्याच्या जवळ लक्ष्मी व तिचा नाथ दोघे ही राहतात. नारायण हरि हा मंत्र जपणाऱ्याच्या घरी भुक्ती मुक्ती दोन्ही हात जोडुन कामारी होतात. हरिनामावीण असणाऱ्याचे जीवन नरकच असते. व तो प्राणी सहज यमाचा पाहुणा होतो. मी श्री गुरु निवृतिनाथाना विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले की गगना पेक्षा हरिनाम मोठे आहे असे माऊली सांगतात.
