👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७६
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
अर्थ:-
ज्या वैष्णवाने हरिनामाची जोड धरली त्याची सर्व अनंत कोटी पापे नष्ट होतात. एकदा उच्चारलेले हरिनाम हे अनंत जन्माच्या तपा समान आहे. त्या हरिनामामुळे सर्व मार्ग सुगम होतात. त्याच हरिनामामुळे योग, याग, क्रिया धर्माधर्म ह्यांचा विलय त्या हरिपाठात होतो. माझ्या साठी फक्त हरिनाम हेच यज्ञ याग आहेत व ते सोडुन मला दुसरा नित्यनेम नाही असे माऊली सांगतात.
