अध्याय ४० नवनाथ भक्त
40.
अध्याय ४० नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय चाळीसावा - फलश्रुति 👉
यश श्री ऐश्वर्य पुत्र-पौत्र इ. सर्व गोष्टी प्राप्त होतील.
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी पंढरीनाथा । पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता । दीनबंधो अनाथनाथा । पुढे ग्रंथ बोलवी ॥१॥
मागिले अध्यायी रसाळ वचन । तुवा बोलविले कृपेंकरुन । स्वर्गी चरपटीनाथे जाऊन । इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥
हरिहरांची जिंकूनि कोटी । पुढे लोभाची भेटी । गमनकळा नारदहोटी । प्राप्त झाली महाराजा ॥३॥
उपरी मनिकर्णिकेचे करुनि स्नान । पुढे पातले पाताळभुवन । घेवूनि बळीचा गौरव मान । वामनाते भेटला ॥४॥
भोगावतीची करुनि आंघोळी । पुनः पातला भूमंडळी । यावरी कथा पुढे कल्होळी । नवरसाते वाढी का ॥५॥
असो आता रमारमण । ग्रंथाक्षरी बैसला येवून । तरी पुढे श्रोती सावधान । कथारस घ्यावा की ॥६॥
इंद्र चरपटीने जिंकला । वैभवे मशकातुल्य केला । तरी तो विस्मयवान खोंचला । खडतरपणी हृदयांत ॥७॥
मग जो गुरु वाचस्पती । परम ज्ञाता सर्वमूर्ती । सहस्त्रनयन तयाप्रती । घेवूनिया बैसलासे ॥८॥
देवमंडळांत सहस्त्रनयन । घेवूनि बैसलासे कनकासन । जैसा नक्षत्री रोहिणीरमण । अति तेजे मिरवला ॥९॥
ऐशा रीती पाकशासन । बैसला सेवूनि सभास्थान । मग बृहस्पती विस्मयरत्न । चरपटप्रताप सांगतसे ॥१०॥
अहा वय धाकुटे सान स्वरुप । परी अर्कासमान थोर प्रताप । हरिहरादि करुनि लोप । स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥
तरी वाताकर्षणविद्या सबळ । देवदानव झाले निर्बळ । नाथपंथी हे महाबळ । आतळले कैसे कळेना ॥१२॥
तरी याते करुनि उपाय । साध्य करावी इतुकी ठेव । या कर्मासी कोण लाघव । स्वीकारावे महाराजा ॥१३॥
की तयाच्या गृहाप्रती जावून । दास्य करावे मनोधर्मे । तोषवूनि सर्व कर्म । महीवरी मिरवावे ॥१४॥
असो यापरी यत्न करुन । भेट घ्यावी त्या गंवसून । परी ते जोगी तीव्रपणे । वर्तताती सर्वदा ॥१५॥
तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट । अर्थ वदावा तयासी निकट । परी काय चाड आमुची अलोट । कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥
तरी भिडेचे उपजेपण । उजेड पडेल दासत्वेंकरुन । तयामागे रानोरान । अपार मही हिंडावी ॥१७॥
तरी हिंडल्याने कोणे काळी । उदय पावेल कृपानव्हाळी । अमरपुरीची देवमंडळी । तेजोयुक्त होईल ॥१८॥
म्हणाल ऐसे कासयान । हा विपर्यास येईल घडोन । तरी मही होतो पुण्यपावन । आसन माझे घेतसे ॥१९॥
तरी मी येथे सावधान । करुनि रक्षितो आपुले आसन । तस्मात् अमरावती सोडून । जाणे नाही मजलागी ॥२०॥
ऐसे बोलता अमरपती । बोलता झाला वाचस्पती । म्हणे महाराजा नाथाप्रती । येथेंचि आणावे महायत्ने ॥२१॥
तरी तो यत्न म्हणशील कैसा । यज्ञ करावा सोमभासा । त्या निमित्ते नाथ राजसा । घेवोनि यावे स्वर्गासी ॥२२॥
मग तो येथे आल्यापाठी । दावूनि भक्तीची अपार कोटी । मोह उपजवोनि नाथापोटी । कार्य साधूनि घेइजे ॥२३॥
ऐसे बोलता तपोद्विज । परम तोषला अमरराज । उपरी म्हणे महाराज । कोणा पाठवू पाचाराया ॥२४॥
यावरी बोले कचतात । हे महाराज अमरनाथ । मच्छिंद्रपिता अष्टवसूंत । उपरिचर नामे मिरवतसे ॥२५॥
उपरिचर जाता महीतळवटी । मच्छिंद्राची घेईल भेटी । सांगूनि त्याते कार्य शेवटी । मग मच्छिंद्र आम्हा बोधील ॥२६॥
तरी त्याते पाचारुन । कार्ययज्ञाचा वदूनि काम । विमानयानी रुढ करुन । पाठवावा महाराजा ॥२७॥
यापरी मच्छिंद्रनाथ । आला असता अमरपुरींत । गौरवोनि तुवा त्याते । तुष्टचित्ती मिरवावा ॥२८॥
तरी शक्ति तव सरितालोट । मच्छिंद्र उदधिपोट । संगमिता पात्र अलोट । प्रेमतोय भरले असे ॥२९॥
तरी सुमुखाचे पडता जळ । कार्यशुक्तिकामुक्ताफळ । तूते ओपील तपोबळ । नवनाथ आणोनिया ॥३०॥
मग तो मुक्त अविंधविधी । लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधी । मग ते रत्न कर्णविधी । स्वीकारी का महाराजा ॥३१॥
ऐसे ऐकूनि गुरुवचन । परम तोषला सहस्त्रनयन । मग रथी मातली पाठवोन । उपरिचरा पाचारी ॥३२॥
उपरिचर येता वदे त्याते । म्हणे महाराजा कामना मनांत । उदेली करु सोममखाते । पूर्ण करी आता तू ॥३३॥
तरी विमानयानी करोनि आरोहण । जाऊनिया मच्छिंद्रनंदन । उपरी त्याते सवे घेऊन । जावे नवनाथमेळी ॥३४॥
मग ते आर्या भावार्थित । मेळवोनि आणी अमरपुरींत । सोममखाचे सकळ कृत्य । तया हस्ते संपादू ॥३५॥
अवश्य म्हणे वसुनाथ । तत्काळ विमानयानी बैसत । बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ । लक्षूनिया पातला ॥३६॥
तो गोरक्ष धर्मनाथ । चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत । बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ । तीर्थस्नानी ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥
ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथे । अवचटपणी देखिला ताते । मग उठोनि मौळी चरणाते । समर्पीत महाराजा ॥३८॥
मग नाथ वसु भेटून । बैसला सकळांमध्ये वेष्टून । म्लानवाणी कार्यरत्न । अमरांचे सांगतसे ॥३९॥
म्हणे महाराज हो शक्रापोटी । अर्थ उदेला मखकोटी । तरी आपण नवही जेठी । साह्य व्हावे कार्यार्था ॥४१॥
बहुतांपरी करुनि भाषण । सर्वांचे तुष्ट केले मन । उपरी मच्छिंद्राते बोधून । अवश्यपणी वदविले ॥४१॥
मग जालंदर कानिफा चौरंगी । मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी । गोपीचंद रायादि अन्य जोगी । आरुढ झाले विमानी ॥४२॥
गौडबंगाली हेलापट्टण । प्रविष्ट झाले तै विमान । राव गोपीचंद मातेसी भेटून । समागमे घेतली ॥४४॥
उपरी विमानयानी होऊन । पहाते झाले वडवालग्राम तेथून । तेथे वटसिद्धनागनाथ पाहून । आरुढ केला विमानी ॥४४॥
तेथूनि भर्तरीचे करुनि काम । विमान चालविती इच्छिल्या व्योमे । तो गौतमतीरी नाथ उत्तम । जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥
यापरी तीर्थ करिता महीपाठी । महासिद्ध जो नाथ चरपटी । अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठी । सवे घेतला महाराजा ॥४६॥
तेणे पुण्यमान देशी विटग्राम नामाने । पहाते झाले विमानयाने । तेथे रेवणसिद्ध बोधून । आरुढ केला विमानी ॥४७॥
असो नवनाथ परिवारासहित । ते विमानयानी झाले स्थित । चौर्यायशी सिद्धांसमवेत । अमरपुरी पातले ॥४८॥
विमान येता ग्रामद्वारी । सामोरा आला वृत्रारी । परम गौरवोनि वागुत्तरी । चरणांवरी लोटला ॥४९॥
सकळा करोनि नमनानमन । नेत सदना सहस्त्रनयन । आपुल्या आसनी बैसवोन । षोडशोपचारे पूजिले ॥५०॥
नवनाथा पाहोनि सकळ अमर । मनी संतोषले अपार । तेज पाहोनिया गंभीर । उभे तेथे ठाकले ॥५१॥
मग हवनकृत्य मनकामना । वदता झाला सकळ जना । म्हणे महाराजा कवणे स्थाना । सिद्ध अर्थ अर्थावा ॥५२॥
मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ । म्हणती सुरवरपाळा ऐक मात । सिंहलद्वीपी स्थान अदभुत । यज्ञ तेथे करावा ॥५३॥
अटव्य कानन आहे तुमचे । शीतळ छायाभरित जळाचे । तेथे न्यून साहित्याचे । पडणार नाही कांहींच ॥५४॥
उपरिचरन वसु गंधर्व घेऊन । पाहत झाले अटव्यवन । तेथे यज्ञसाहित्य आहुती करुन । यज्ञ आरंभ मांडिला ॥५५॥
दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन । मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण । यज्ञ आहुती नवही जण । स्वाहा म्हणोनि कुंडी टाकिती ॥५६॥
परी किलोतळेचे सीमे आंत । अटव्यवन होते अदभुत । यज्ञ होता मीननाथ । मच्छिंद्राते आठवला ॥५७॥
मग पाचारोनि उपरिचर तात । मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ । सिंहलद्वीपी मीननाथ । कवण ग्रामी ठेविला ॥५८॥
येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत । अटव्यवन हे विख्यात विराजित । तरी कीलोतळेसहित मीननाथ । पाचारितो आतांचि ॥५९॥
मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन । मीननाथासह कीलोतळारत्न । पाचारुनि एक क्षण । भेटी केली उभयता ॥६०॥
परम स्नेहाने क्षण एक कांही । वाहवले मोहप्रवाही । उपरी दारा सुत तया ठायी । मच्छिंद्राने ठेविले ॥६२॥
चौरंगी आणि अडबंगीनाथ । मिरवीत बैसविले समुदायांत । यज्ञआहुती तयांचे हस्ते । स्वीकारीत महाराजा ॥६२॥
दहा नाथ यज्ञआहुती । प्रवाही चाले मच्छिंद्रजती । पुत्रमोह धरुनि चित्ती । अभ्यासाते बैसविला ॥६३॥
अभ्यास करिता मीननाथ । वाचस्पती शक्रासी बोलत । म्हणे महाराजा यज्ञार्थ । तुम्ही बैसता सरेना ॥६४॥
तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु । बैसवोनि पहावा अर्थ सुरसु । ऐसे बोलता प्राज्ञ विशेषु । अमरपाळ समजला ॥६५॥
मग हातींचे सोडूनि यज्ञकंकण । वसुहाती केले स्थापन । मग न्यूनपणे बहुता प्रार्थून । निजदृष्टी विलोकी ॥६६॥
सर्व पदार्थ आणवोनि आपण । अंगे झिजवी शचीरमण । उदकपात्र सांगता जाण । सिद्ध होय पुढारी ॥६७॥
खाद्य भोज्य षड्रस अन्न । करे आणीतसे पात्री वाढून । शेवटी शिणले तयाचे चरण । निजहस्ती चुरीतसे ॥६८॥
ऐसी सेवा करिता संपन्न । तुष्ट होतसे जतीचे मन । हृदयी भाविती यावरुन । प्राणसांडी करावी ॥६९॥
येरीकडे मीननाथ । सुतासी विद्या अभ्यासीत । तो समय जाणोनि सापेक्ष । इंद्र मयूरवेषे नटलासे ॥७०॥
निकटतरुशाखेवरती । विद्या अभ्यासीत गुप्तपंथी । तो अकस्मात वातास्त्र जपती । वाताकर्षण लाधले ॥७१॥
दैवे सर्व तपराहटी । सकळ लाधली हातवटी । उपरी वाताकर्षणविद्या पाठी । वातप्रेरक अस्त्र लाधले ॥७२॥
ऐसी विद्या होता सघन । परम हरुषला सहस्त्रनयन । परी एक संवत्सर होता यज्ञ । अभ्यासीत तंववरी ॥७३॥
असो हवनअर्पण आहुती । मग पावूनि पूर्ण समाप्ती । मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती । अग्रपूजे बैसला ॥७४॥
मग पूजा करोनि सांगोपांग । उपरी दशमनाथे पूजिले अंग । वस्त्रभूषणे चांग । देऊनिया गौरविले ॥७५॥
सकळा बैसवोनि कनकासनी । उभा राहिला जोडीनि पाणी । सर्वासी वदे म्लानवदनी । नाथ वचन माझे परिसा ॥७६॥
माते घडला एक अन्याय । परी आपण सहन करा समुदाय । म्या मयूरवेष धरुनि माये । अभ्यासिले विद्येते ॥७७॥
मीनजतीचा प्रताप गहन । मज सांपडले विद्यारत्न । तरी आपुला वर त्याते देऊन । सनाथपणी मिरवावे ॥७८॥
ऐसे बोलता अमरनाथ । सर्वासी समजले तस्करीकृत्य । मग ते कोपोनि परम चित्तांत । शापवचन बोलताती ॥७१॥
म्हणती इंद्रा तू कृत्रिम । आणिले ठकवावया कारण । तरी चोरुनि घेतले विद्यारत्न । निष्फळ होईल तुजलागी ॥८०॥
ऐसे बोलता सकळ जती । मग उपरिचर वसु वाचस्पती । गौरवोनि अपार युक्ती । तुष्ट केले चित्तांत ॥८१॥
म्हणती महाराजा शापमोचन । पुढे बोला कांही वचन । मग ते बोलती तयाकारण । तप आचरावे इंद्राने ॥८२॥
द्वादश वर्षे तप आचरिता । विद्या फळेल तत्त्वता । परी नाथपंथी छळ न होता । पदरावरी पडेल ॥८३॥
ऐसे बोलोनि सकळ जती । विमानारुढ झाले समस्ती । खाली उतरुनि महीवरती । नाना तीर्थे भ्रमताती ॥८४॥
ऐसे भ्रमण करिता जती । तीर्थे झाली अपरिमिती । याउपरी कीलोतळेते मच्छिंद्रजती । पुसोनिया चालिला ॥८५॥
मग ते कीलोतळेचे नमन । अवर्ण्य आहे अनुष्ठान । नेत्री प्रेमबिंदु आणोन । बोळविले नाथासी ॥८६॥
सवे घेऊनि मीननाथ । विमानयानी झाले समस्त । खाली उतरुनि मृत्युमहींत । नाना तीर्थे पाहिली ॥८७॥
हेलापट्टणी मैनावती । पोहोंचवोनि तीर्थे हिंडती । तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती । सिद्ध तीन निर्मिले ॥८८॥
तयांचे सांगितले पूर्वी नाम । आता सांगावया नाही काम । असो सिद्धकटकासह उत्तम । तीर्थे करीत भ्रमताती ॥८९॥
येरीकडे अमरनाथ । लक्षूनिया सह्याद्रिपर्वत । द्वादश वरुषे तप निश्चित । तीव्रपणी आचरला ॥९०॥
परी ते आचरिता तीव्रपणी । मंत्रप्रयोगे सोडी पाणी । तेणे सरिता लोट लोटोनी । भीमरथीते भेटली ॥९१॥
ते मणिकर्णिकेचे जीवन । आणिले होते कमंडलू भरोन । परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन । इंद्रायणी पडियेले ॥९२॥
ऐसे तप करोन । स्वस्थानासी इंद्र जाऊन । उपरी नवनाथ करिता तीर्थाटन । बहुत दिवस लोटले ॥९३॥
शके सत्राशे दहापर्यंत । प्रकटरुपे मिरवले नाथ । मग येऊनि आपुले स्थानांत । गुप्तरुपे राहिले ॥९४॥
मठींत राहिला कानिफाजती । उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती । जानपीर जो जालंदर जती । गर्भागिरी नांदतसे ॥९५॥
त्याहूनि खालता गैबीपीर । तो गहनीनाथ परम सुंदर । वडवानळ ग्रामी समाधिपर । नागनाथ असे की ॥९६॥
वीटग्रामी मानवदेशांत । तेथे राहिले रेवणनाथ । चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ । गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥
भर्तरी राहिला पाताळभुवनी । मीननाथ गेला स्वर्गालागोनी । गिरनार पर्वती गोरक्षमुनी । दत्ताश्रमी राहिला ॥९८॥
गोपीचंद आणि धर्मनाथ । ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांत । विमान पाठवोनि मैनावतीते । घेऊनि विष्णु गेलासे ॥९९॥
पुढे चौर्यायशी सिद्धांपासून । नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने । येथूनि चरित्र झाले संपूर्ण । सर्व नाथांचे महाराजा ॥१००॥
तरी आता सांगतो मुळापासून । कथा वर्तली कवण । प्रथमाध्यायी गणपतिस्तवन । सुंदरपणी मिरवले ॥१॥
उपरी सांगूनि रेताक्षिती । आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती । तो बद्रिकाश्रमाप्रती । तपालागी बैसला ॥२॥
या प्रसंगाचे श्रवण पठण । नित्य करिता भावेंकरुन । तरी समंधबाधा घरांतून । जाईल वासूनी महाराजा ॥३॥
द्वितीय अध्यायी अत्रिनंदन । विद्यार्णव केला अनुग्रह देऊन । उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन । सिद्धयर्थकळा साधिली ॥४॥
तो अध्याय करिता नित्य पठण । अपार धन लाभेल संसारी जाण । विजयलक्ष्मी पाठी बैसून । करील हरण दरिद्र ॥५॥
तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती । युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती । युद्ध करुनि उपरांती । ऐक्यचित्त झाले असे ॥६॥
याचे झालिया पठण । शत्रु होतील क्षीण । मुष्टिविद्यासाधन । तया होत सर्वथा ॥७॥
मुष्टिबाधा झाली असोन । अपकार होईल तियेने । मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण । राहे तया घरी सर्वदा ॥८॥
चतुर्थ अध्यायी वदली कथा । अष्टभैरव चामुंडा समस्ता । रणी जिंकूनि वसुसुता । ज्वालामुखी भेटली ॥९॥
तो अध्याय नित्यपठण करिता । चुकेल कपटाची बंधनव्यथा । शत्रु पराभवोनि सर्वथा । निरंतर शांति मिरवेल ॥११०॥
पांचवे अध्यायींचे कथन । भूते घेतली प्रसन्न करुन । अष्टपती जिंकून । विजयी झाला मच्छिंद्र ॥११॥
ती कथा नित्य करिता पठण । भूतसंचार नोहे त्या घराकारण । आले असता जाती सोडोन । परम त्रासेंकरोनिया ॥१२॥
सहाव्या अध्यायांत । शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ । युद्ध करुनि प्रसन्नचित्त । वश्य झाली अस्त्रे ती ॥१३॥
तो अध्याय नित्य करिता पठण । शत्रूलागी पडेल मोहन । निष्कपट तो करुनि मन । किंकर होईल द्वारींचा ॥१४॥
सातव्या अध्यायी अपूर्व कथा । जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता । उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा । इच्छेसमान झालीसे ॥१५॥
ती कथा नित्य गाता ऐकता । लिप्त नोहे त्रौर्यायशींची व्यथा । झाली असेल मिटेल सर्वथा । चिंत्ता व्यथा हरतील ॥१६॥
जखीणभयापासुनी । त्वरित मुक्त होईल जनी । एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी । फलप्राप्ति घेइजे ॥१७॥
आठव अध्यायी सकळ कथन । पाशुपतरायासी रामदर्शन । रणी मित्रराज जिंकोन । केला प्रसन्न विद्येसी ॥१८॥
तो अध्याय नित्य गाता ऐकता । आपुला सखा देशावरता । तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वता । चिंताव्यथा हरेल की ॥१९॥
नववे अध्यायी कथन । गोरक्षाचा होऊनि जन्म । उपरी सेवूनि बद्रिकाश्रम । विद्यार्णव झालासे ॥१२०॥
तो अध्याय नित्य गाता ऐकता । साधेल विद्या इच्छिल्या अर्था । ब्रह्मज्ञान रसायण कविता । चवदा विद्या करोनि राहे ॥२१॥
दशम अध्यायीचे कथन । स्त्रीदेशी मच्छिंद्रनंदन । अंजनीसुतअर्थी पाठवोन । अर्थ किलोतळेचे पुरविले ॥२२॥
एकांती बैसूनि अनुष्ठान । संजीवनी पाठ करी गौरनंदन । गहिनीनाथाचा झाला जन्म । कर्दमपुतळा करिता तो ॥२३॥
तो अध्याय करिता पठण । स्त्रियांचे दोष जातील कपटपण । फळे वाचतील होता जाण । जगी संतती मिरवेल ॥२४॥
उपरी गृहृद्रव्याच्या यज्ञांत । उदय पावला जालिंदरनाथ । तो एकादश अध्याय पठण करिता नित्य । अग्निपीडा होईना ॥२५॥
आणि जयाचे धवळारात । पूर्वीचा कांही दोष असत । तो जाऊनि संपत्तिविशेषाते । संततीसह भोगील की ॥२६॥
बाराव्यांत हे कथन । जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन । उपरी कानिफाचा होऊनि जन्म । विटंबिले देवांसी ॥२७॥
तो अध्याय करिता पठण । क्षोभ न पावे कोणी देवता जाण । क्षोभित असल्या होतील शमन । सुख सर्व त्याचि देती ॥२८॥
तेराव्या अध्यायांत । मैनावतीते प्रसन्न नाथ । होऊनि केले अचल सनाथ । ब्रह्मरुपी आगळी ॥२९॥
तरी तो अध्याय करिता पठण । स्त्रीहत्येचे दोष सघन । त्यांचे होऊनि सकळ निरसन । उद्धरील पूर्वजा चतुर्दश ॥१३०॥
चतुर्दश अध्यायी कथन । गर्तेत जालिंदर गोपीचंदाने । स्त्रीबोले घातले नेऊन । गुप्त निशीमाझारी ॥३१॥
तो अध्याय पठण करिता । असेल बंध कारागृही व्यथा । तरी त्याची होईल मुक्तता । निर्दोष जनी वर्तेल ॥३२॥
पंचदशांत सुढाळ कथन । कानिफामारुतीचे युद्धकंदन । उपरी स्त्रीराज्यांत जाऊन । आतिथ्य पूर्ण भोगिले ॥३३॥
तो अध्याय गाता ऐकता नित्य । घरचे दारचे कलह नित्यकृत्य । शांति पावोनि सर्व सुखांत । निर्भयपणे नांदेल ॥३४॥
सोळावे अध्यायांत । कानिफा भेटला गोपीचंदाते । तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य । दुःस्वप्नाते नाशील ॥३५॥
सप्तदश अध्यायी कथन । जालिंदर काढिला गर्तेतून । उपरी नाथाची दीक्षा घेऊन । गोपीचंदे अर्चिला ॥३६॥
तोचि अध्याय पठण करिता । योग साधेल योग आचरता । दुष्टबुद्धि जाईल सर्वथा । सुपंथपंथा लागेल तो ॥३७॥
अष्टादश अध्यायी कथन । बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन । तपःपूर्ण भगिनी उठवोन । तीव्रपणी आचरला ॥३८॥
तो अध्याय नित्य पठण करिता । ब्रह्महत्या नासेल सर्वथा । पूर्वज कुंभीपाकी असता । सुटका होईल तयांची ॥३९॥
एकोणिसाव्यात गोरक्षाकारण । भेटला मारुति श्रीरामप्रीतीने । तरी तो अध्याय करिता पठण । तया मोक्षार्थ साधेल का ॥१४०॥
तिसाव्यात अदभुत कथन । श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण । गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन । स्नेहसंपन्न जाहला ॥४१॥
तो अध्याय पठण करिता गोड । लागले असेल अत्यंत वेड । तरी ती चेष्टा जाऊनि धड । होऊनि प्रपंच आचरेल ॥४२॥
एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून । मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने । नानापरी बोधूनि मन । दुष्टकर्माते निवटिले ॥४४॥
तो नित्य अध्याय पठण करिता । नासेल बहुजन्माची गोहत्या । निष्कलंक होऊनि चित्ता । तपोलोकी मिरवेल ॥४४॥
बाविसाव्यांत सोरटीग्रामी । गोरक्षे मीननाथा मारोनी । पुन्हा उठविला मंत्रेंकरोनी । मच्छिंद्रमोहेंकरुनिया ॥४५॥
तरी तो अध्याय नित्य पठण करिता । पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वता । तो होईल विद्यावंत । विद्वज्जना मान्य की ॥४६॥
तेविसाव्यांत रसाळ कथन । मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन । सुवर्णविटेकरिता सुवर्ण । गर्भगिरि केला असे ॥४७॥
आणिक केला तेथे उत्सव । तरी तो अध्याय पठण नित्य भावे । करिता घरी सुवर्ण नव । अखंड राहे भरोनि ॥४८॥
चोविसाव्यांत भर्तरीनाथ । जन्मोनि आला आवंतिकेंत । तरी तो अध्याय पठण करिता नित्य । बाळहत्या नासेल ॥४९॥
बाळहत्या जन्मांतरी । तेणे समस्त वांझ होती नारी । तरी ते नासेल संसारी । सुखी होऊनि बाळ वांचे ॥१५०॥
पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन । रासभ झाला शापेंकरुन । तरी तो अध्याय केलिया पठण । शापवचन बाधेना ॥५१॥
आणि मानवाविण दुसरा जन्म । होणार नाही तयाकारण । आरोग्य काया पतिव्रता कामिन । पुत्र गुणी होईल ॥५२॥
सव्विसावे अध्यायांत । गणगंधर्व झाला विक्रमसुत । आणि विक्रम भर्तरीसुत । एकचित्त । भेटी होऊनि राहिले ॥५३॥
तो अध्याय करिता पठण । गोत्रहत्या जाति नासून । पोटी पाठी शत्रुसंतान । न राहे होऊनिया ॥५४॥
सत्ताविसाव्यांत अदभुत कथन । राज्यपदी बैसला राव विक्रम । भर्तरी पिंगलेचे होऊनि लग्न । दत्तानुग्रह लाधला ॥५५॥
तरी तो अध्याय करिता पठण । पदच्युत पावेल पूर्वस्थान । गेली वस्तु पुनः परतोन । सांपडेल तयांची ॥५६॥
अट्ठाविसाव्या अध्यायांत । पिंगलेकरिता स्मशानांत । विरक्त होऊनि भर्तरीनाथ । पूर्ण तप आचरला ॥५७॥
तो अध्याय करिता श्रवण पठण । त्या भाविकाचे होईल लग्न । कांता लाभेल गुणवान । सदा रत सेवेसी ॥५८॥
एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र । भर्तरी होऊनि विरक्त पवित्र । गोरक्ष सांगती अत्रिपुत्र । गुरुनाथ पै केला ॥५९॥
तो अध्याय नित्य करिता पठण । सुटेल क्षयरोगापासून । आणि त्रितापांची वार्ता जाण । कालत्रयी घडेना ॥१६०॥
तिसाव्या अध्ययांत । जन्मला चौरंगीनाथ । परी ते चरित्र पठण करिता । तस्करी दृष्टी बंधन होय ॥६२॥
एकतिसाव्यांत चौरंगीनाथ । तपा बैसला हिमालयांत । तरी तो अध्याय पढता । कपटमंत्र न चालती ॥६२॥
बत्तिसाव्यांत सुगम कथन । मच्छिंद्र त्रिविक्रमदेही संचरोन । द्वादश वर्षे राज्य करोन । रेवतीसी पुत्र दिधला ॥६३॥
त्या अध्यायाचे करिता पठण । अयुष्य असता देहाकारण । गंडांतरे करु येतील विघ्ने । आपोआप टळतील की ॥६४॥
तेहतिसाव्यांत गौरनंदन । वीरभद्राचा घेऊनि प्राण । मच्छिंद्रशव स्वर्गाहून । महीवरती उतरिले ॥६५॥
तरी ती कथा करिता पठण । धनुर्वाताचे निरसे विघ्न । झालेल्याते होता श्रवण । पीडा हरेल तयाची ॥६६॥
चौतिसाव्यांत रेवणजन्म । होऊनि भेटला अत्रिनंदन । सहज सिद्धिकळा दावून । गेला असे महाराजा ॥६७॥
तरी ती कथा करिता पठण । जाणे कोणत्याही कार्याकारण । तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन । यश घेऊन येईल तो ॥६८॥
पस्तिसाव्यांत पूर्ण कथन । रेवण झाला विद्यावान । दत्तकृपे स्वर्गी जाऊन । बाळे आणिली विप्राची ॥६९॥
तरी ती कथा करिता पठण । महासिद्ध येईल उदराकारण । बेचाळिसांचे करुनि उद्धरण । गातील आख्यान लोक परी ॥१७०॥
छत्तिसाव्यांत अपूर्व कथा । जन्म झाला वटसिद्धनाथा । आस्तिक ऋषि झाला ताता । तयाचिये मातेसी ॥७१॥
ती कथा करिता श्रवण पठण । सर्पवृश्चिक दंश जयाकारण । झालिया विषाचे उत्तीर्ण । श्रवण केलिया अध्याय तो ॥७२॥
सदतिसाव्या अध्यायांत । नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत । उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ । जिंकियेले भिडोनी ॥७३॥
ती कथा करिता श्रवण पठण । सदना न लागे कुशीलपण । लागल्या त्याचे होईल बंधन । विद्यावंत होऊनिया ॥७४॥
अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म । होऊनि दत्तात्रेये दीक्षा देऊन । विद्येमाजी करुनि संपन्न । तीर्थावली धाडिला ॥७५॥
तरी ती कथा सुरस । श्रवण पठण होता त्यास । हिंवताप मधुरा नवज्वरास । शांति होईल सर्वस्वी ॥७६॥
एकूणचाळिसाव्यांत कथा । चरपटीने जिंकिले अमरनाथा । हरिहरादि देवा समस्ता । स्वर्गी ख्याती लाविली ॥७७॥
तरी तो अध्याय करिता पठण । तो युद्धा जाता तपोधन । शस्त्रबाण पावोन । जय घेऊन येईल की ॥७८॥
यावरी चाळिसाव्यांत कथन । सर्व नाथांते पाकशासन । स्वर्गी नेऊनि करी हवन । विद्यार्थिरुपे अर्थ पुरविला ॥७९॥
तरी चाळिसावा नित्य पठण करिता । लाभेल सर्व इच्छिल्या अर्था । यश श्री ऐश्वर्य योग्यता । पुत्रपौत्री नांदेल ॥१८०॥
एकुणचाळिसांचा फलार्थ । तोचि प्राप्त तदर्थ । की चाळिसावा एक परिस । की कामधेनु कल्पतरु ॥८१॥
गोरक्ष बोलतो वाचेकरुन । त्याते असत्य मानील जन । जो निंदक याते दावील निंदून । तो अधिकारी विघ्नांचा ॥८२॥
इहलोकी परलोकी । राहणार नाही परम सुखी । निर्वश पावोनि शेवटी वंशी । पिचेल ग्रंथ निंदिता हा ॥८३॥
अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार । आहे गोरक्षाचा किमयागार । परी पालटोनि भाषांतर । महाराष्ट्र अक्षरी रेखिला ॥८४॥
म्हणोनि श्रोते हो भाविक जन । सोडोनि द्या की निंदावचन । विश्वासपर स्वार होऊन । मोक्षमुक्काम करी की ॥८५॥
तरी हा ग्रंथ संग्रह करुन । चमत्कार पाहावा पठण करुन । हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण । महासिद्धीचे असती की ॥८६॥
हे चाळीस मंत्र परोपकारी । आहेत दुःखाची करतील बोहरी । तरी संग्रह करुनि उगलेचि घरी । ठेवा विश्वास धरुनिया ॥८७॥
ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र । सुखकारक असती अति पवित्र । दुःखदरिद्रहरण सर्वत्र । गोरक्षकाने निर्मिले ॥८८॥
पठण करिता षण्मासमिति । जो अध्याय ज्या कार्याप्रति । ते कार्य होईल निःसंशय चित्ती । पठण करुनि पहावे ॥८९॥
याउपरी वाचिता न ये जरी । तरी संग्रह करुनि ठेवावा घरी । नित्य वंदिता नमस्कारी । कार्य त्यांतचि घडेल ॥१९०॥
एक कुसुम झोंकूनि वरती । चला म्हणावे मम कार्याप्रति । नवनाथ वंदूनि उक्ति । नमस्कार करावा ॥९१॥
ऐसा याचा आहे मार्ग । करुनि पहावा चमत्कार चांग । नवनाथ ओडवोनि अंग । कार्य तुमचे करितील की ॥९२॥
तरी असो विजय संपत्ती । नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति । धुंडिसुत हेचि प्रार्थी । मालू नरहरी देवाते ॥९३॥
शके सत्राशे एकेचाळीस । प्रमाथीनाम ज्येष्ठ मास । शुक्लपक्ष प्रतिपदेस । ग्रंथ समाप्त जाहला ॥९४॥
तरी ओंव्या सर्व नेमस्त । सप्तसहस्त्र सहाशत । उपरी ऐसे देदीप्यवंत । ओंव्या मंत्र असती ह्या ॥९५॥
अध्याय वाचावया न बनेल ज्यासी । तरी अध्यायांतील एक ओंवीसी । पठण करुनि नाथनामासी । कार्यकाज करावे ॥९६॥
असो आता बहु भाव । श्रोते असोत चिरंजीव । इहलोकी परलोकी ठेव । आनंदाची होतसे ॥९७॥
तरी समस्त नाथांते धुंडीसुत । मालू नरहरि हेचि विनवीत । की श्रोते असोत सुखरुपवंत । सर्व अर्थी सर्वदा ॥९८॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार । सदा परिसोत भाविक चतुर । चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शुभ भवतु ॥
अध्याय ४०॥
ओंव्या १९९॥
॥नवनाथभक्तिसार चत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥
॥नवनाथांचा श्लोक ॥
गोरक्षजालंदरचर्पटाश्च अडबंगकानीफमछिंदराद्याः ।
चौरंगिरेवाणकभर्तिसंज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथसिद्धाः ॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
