चारधाम पदभ्रमण यात्रा… शुभारंभ…
गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब…
*पुष्प - १*
नर्मदा परिक्रमेनंतर पुढील नियोजनासाठी मधे जवळजवळ अकरा वर्षे गेली. दरम्यान च्या काळात गिरनार वाऱ्या सुरू होत्या. दैनंदिन कामे व प्रपंच सुरू होता. मी दररोज पहाटे सकाळी तळजाईला व्यायामासाठी जायचो. तेथे अनेक ज्येष्ठ, वृद्ध, तरुण व्यायाम पटू भेटायचे. तळजाई चढून आल्यानंतर मंदिरापाशी पाच मिनिटे गप्पा व्हायच्या. तेथे चर्चेमध्ये एकदा समजले की तळजाई ला दररोज येणारे श्री दिवाकर घड्याळजी या ज्येष्ठ सदस्यांनी नुकतीच सुमारे एक हजार किलोमीटरची चारधाम यात्रा म्हणजे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ ही ऋषिकेश पासून ऋषिकेश पर्यंत पायी पूर्ण केली आहे.
माझे कुतूहल चाळवले. त्यांची भेट घेतली, माहिती घेतली, चर्चा केली आणि मनामध्ये आपणही चार धाम यात्रा पायी करावी याचे बीज रूजले. २०२० साली मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जेव्हा कपाट उघडतात म्हणजे मंदिर उघडतात त्यावेळी आपण चारधाम यात्रेला जावे असा बेत निश्चित केला. परंतु
कोव्हिड संसर्गामुळे लाॅकडाऊन झाला व जाता आले नाही. २०२१ साली मी माझा मुलगा चि मिहिर कडे मुलाकडे अमेरिकेत गेलो होतो आणि तिथून मी एप्रिल महिन्यात परत येणार होतो आणि मे महिन्यात मध्ये चारधाम यात्रेला जाणार होतो. परंतु एप्रिल मध्ये अमेरिकेत असतानाच भारतात कोव्हिडचा संसर्ग पुन्हा वाढल्यामुळे देशभर लाॅकडाऊन सुरू झाल्याचे समजले. त्यामुळे २०२१ साली उत्तराखंड शासनाने चार धाम यात्रा स्थगित केली. त्यामुळे २०२१ सालीही चारधाम यात्रा पायी करण्याचा विचार सोडून द्यावा लागला. अखेर २०२२ में महिन्यामध्ये, मी चार धाम यात्रा पायी करण्याचे नियोजन सुरू केले. पुन्हा श्री घड्याळजी काकांची भेट घेतली, चर्चा केली, माहिती घेतली. कोणत्या रस्त्याने जायचे, रस्त्यात येणाऱ्या अडचणी, निवास व्यवस्था, कसे जायचे कुठे थांबायचे, बरोबर काय नेले पाहिजे, साहित्य किती असावे, त्याचे वजन किती असावे, किती वाजता चालायला सुरुवात करावी, कधी थांबायला पाहिजे, हवामान या सगळ्यांची माहिती त्यांच्याकडून घेतली. फेब्रुवारी २०२२ मध्ये रेल्वेचे तिकीट काढले. मुंबई ते हरिद्वार. तीस तासांचा हा प्रवास…
तिकिट काढल्यानंतर हळूहळू सामान जमा करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे एक
ट्रेकिंगची मोठी सॅक आहे. तिचे वजन चार किलो आहे. त्यामुळे ती नेण्याचा विचार रद्द केला. आता नवीन सॅक खरेदी करणे आले. मग पुण्यातील भवानी पेठेत पीक एडवेंचर्स नावाचे सॅक बनविणारे दुकानदार आहेत. त्यांच्याकडे जाऊन नवीन 40 लिटर सामान बसू शकेल एवढी हॅवर सॅक खरेदी केली. या सॅकचे वजन सुमारे तेराशे ग्रॅम आहे. कमी वजनाच्या फॅब्रिकचा वापर करून, कमी वजनाची सॅक त्यांनी बनवली आहे. त्याच्यानंतर बरोबर नेण्याच्या वस्तूंची यादी… आपल्या घरात असलेल्या वस्तू आणि नवीन खरेदी करण्याच्या वस्तू अशा दोन स्वतंत्र याद्या तयार केल्या. बाहेरून आणायच्या एक एक वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. हातातली काठी डोक्यावर लावावयाचा हेडलाईट, गॉगल इ…
मित्रवर्य मुकुंद सहस्त्रबुद्धे याचा जावई श्री अद्वैत गोखले हा नियमित हिमालयात ट्रेकिंगसाठी ग्रुप घेऊन जातो. त्यांच्याकडूनही काही टिप्स घेतल्या. कपड्यांचे रोल करून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणे, जेणेकरून पावसामुळे सॅक ओली झाली तरी सॅकमध्ये पाणी येऊन कपडे भिजत आहेत. छत्री घेणे असा काही टिप्स श्री अद्वैतने दिल्या.
निघेपर्यंत बॅगमध्ये वस्तू भरणे चालू होते. अगदी शेवटी निघताना उन्हासाठी टोपी आणि पायमोजे भरले व सॅक बंद केली. सॅकचे वजन जवळजवळ सामानासह साडेआठ किलो झाले होते. पहिली भरलेली स्लीपिंग बॅग काढून टाकली आणि दुसरी हलकी स्लीपिंग बॅग घेतली, त्यामुळे वजन कमी झाले. जास्ती झालेले सामान हरिद्वारला ठेवण्याचा पर्याय होताच.
रेल्वेत पॅन्ट्री कार बंद असल्यामुळे ३३ तासांच्या प्रवासात लागतील एवढी शिदोरी घेतली. घरातून निघताना आईच्या पाया पडलो. देवाला नमस्कार केला. पत्नी सौ वर्षांची गळाभेट घेतली, चि मिहिरने निघायच्या दिवशी खास फोन करून पाठिंबा दिला व गंगोत्रीच्या पुढे जवळच असलेले गंगेचा उगम होतो ते गोमुख व पुढील तपोवन करायलाही सांगितले. आणखी हुरुप आला. घरून प्रस्थान ठेवले. पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्सप्रेस निघताना पत्नी सौ वर्षा हिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिले… २९ वर्षांचा सहवास. पती-पत्नी यापैकी कोणीही एक दीर्घकाळ दूर राहणार असेल तर भरून येणारच. तिच्या डोळ्यातील अश्रू न सांगताच बरेच काही बोलून गेले. रेल्वे प्लॅटफॉर्म सोडेपर्यंत एकमेकांना हात दाखवत होतो नाईलाजाने ती घराकडे निघाली आणि मी मुंबईकडे…
मुंबईत उतरल्यावर सायंकाळी मित्रवर्य मुकुंद सहस्रबुद्धे याच्या प्रभादेवीच्या घरी थांबलो. त्याच्याशी छान गप्पा झाल्या. नियोजनाविषयी चर्चा झाली. थोडेसे या हृदयीचे त्या हृदयी झाले. रात्री मुकुंद ने छान भोजन प्रबंध आयोजित केला. माझ्याकडे चार तासांचा वेळ होता. रात्री बारा वाजता हरिद्वार एक्स्प्रेस होती. ही रेल्वे नावाला एक्स्प्रेस आहे…खरेतर जनता गाडी म्हणावी… गाडीने वेग घेईपर्यंत पुढचे स्टेशन येते मजल-दरमजल करत प्रवास करतात, तसा प्रवास चालू होता सकाळी उठल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत ना चहावाला ना नाश्ता विचारणारा… कोणीही डब्यात आले नाही. घरून पत्नी सौ वर्षाने बनवून दिले मेथीचे थेपले सोबत टॉमेटो केचप असा नाष्टा केला, पुढील स्टेशनवर चहा प्यायलो.
एक एक स्टेशन मागे पडत होती. रतलाम सारख्या जंक्शन असलेल्या स्टेशनवरून सुद्धा जेवणासाठी बरी व्यवस्था नव्हती. आश्चर्य म्हणजे रतलाम ला स्टेशनवर जेवायला भाजी नव्हती. पण घट्ट रबडी खुणावत होती. प्रवासात दूध व दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. गिरनारला मी एकदा आईस्क्रीम खाऊन पोट बिघडल्याचा अनुभव घेतला होता. शेवटच्या दोन हजार पायऱ्या उतरलो ते दत्त महाराजांच्या कृपेने…
तेव्हा पासून कानाला खडा…
सुमारे ३४ तासांचा प्रवास करून सकाळी ९.३० वाजता हरिद्वारला पोहोचलो. रेल्वेतून उतरल्यावर मी हरिद्वारला सामान ठेवून, आवरून ऋषिकेशला जाणार होतो. परंतु रेल्वेतील एक सहप्रवासी श्री गर्ग हे ऋषिकेशला मेहुणीच्या लग्नासाठी मोटारने निघाले होते. त्यामुळे मूळचा बेत बदलून मी त्यांच्या बरोबर ऋषिकेशला गेलो.
चारधाम यात्रेची पूर्वतयारी करीत असताना, मला वेळोवेळी स्वतःचा व्यक्तिगत मोबाईल नंबर देऊन मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या, गढवाल मंडल विकास निगमचे एक पर्यटन अधिकारी श्री वीरेन्द्र सिंह गुसाई यांची भेट घेऊन, त्यांचे अनोपचारिक आभार मानायचे होते. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. पुण्याहून आणलेली खास चितळ्यांची बाकरवडी व आंबा बर्फी त्यांना भेट दिली. आठवणीसाठी त्यांच्याबरोबर फोटो काढला. त्यांनी मोठ्या मनाने परत काही मदत लागली तर जरूर फोन करा असे आवर्जून सांगितले. त्यांची गळा भेट घेऊन मी परत हरिद्वारला निघालो.
सकाळी नाष्टा केला नव्हता. दुपारचे ११ वाजले होते. ऋषिकेश हून निघताना भरतराम भट्ट भोजनालयात भरपेट जेवण केले. मिक्स व्हेजिटेबल, बटर रोटी व सोबत कांदा. तेथून हरिद्वारला येण्यासाठी एसटी स्टँडवर गेलो. तेथे समोरच चार धाम यात्रेकरूंचे मोफत रजिस्ट्रेशन चालू होते. काउंटरवर मी एकटाच. आधार कार्ड व काही अधिक माहिती देऊन फोटो काढून माझे इ रजिस्ट्रेशन करून घेतले. त्यांनी मला चार धाम यात्रेचा एक व हेमकुंड साहेब यात्रेचा एक असे बार कोड असलेले दोन रिस्ट बॅण्ड दिले.
एसटीने हरिद्वारला आलो.
हरिद्वार मध्ये छोटी खोली घेतली. स्नान केले.
दुपारी विश्रांती घेतली. किसी जास्तीचे सामान मुकुंद सहस्रबुद्धे याच्या कृपेने त्यांच्या हरिद्वार येथील सरोवर पोर्टिगो हाॅटेलच्या प्रतिनिधी सोबत पाठवून दिले. यात्रा पूर्ण झाल्यावर ते तो आणून देणार होता. सायंकाळच्या हर की पौडीच्या गंगारतीच्या सोहळ्याचे वेध लागले होते…
हरिद्वार म्हणजे…हरिचे द्वार
हरि म्हणजे विष्णू…
विष्णूकडे जाण्याचे द्वार
हरिद्वारला भाविक, विष्णूच्या दारी डोके टेकवून आपली यात्रा सुरू करतात. पूर्वीच्या काळी चार धाम यात्रा कच्चे रस्ते, दरड कोसळणे, दरीत कोसळणे इ कारणांमुळे कठीण समजली जायची. बरेच वेळा यात्रेकरू परत येत नसत. वैकुंठाचा अधिपती रमा पती श्री विष्णूस नतमस्तक होऊन यात्रेकरू त्याला सुखरूप यात्रेसाठी साकडे घालत किंवा काही बरेवाईट झाले तर वैकुंठाला ने असे आर्जवही करीत.
केदारनाथ हे भोलेनाथ शंकराचे स्थान तर बद्रीनाथ हे विष्णूचे. एक पालन करणारा तर दुसरा पैलतीरी नेणारा. दोघांनाही अनन्यभावाने शरण जाऊन आपल्याला मोक्ष मिळावा म्हणजे जन्म दरजन्मातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग खुला व्हावा..
गंगातिरी भाविक आपल्या आप्तांच्या आत्म्यास सद्गती लाभावी म्हणून फुले, वात, उदबत्ती असलेला पानांचा द्रोण गंगामैयाला अर्पण करतात. पाण्यात सोडलेला हा द्रोण हिंदोळ्यावर पुढे सरकत जातो. दूरवर जात दिसेनासा होतो. जड मनाने आप्त माघारी फिरतात. पाण्यात वाहण्यासाठी तयार करून ठेवलेले द्रोण खूप मनोवेधक दिसतात… आरतीसाठी भाविक गोळा होऊ लागतात. आरती दिसावी म्हणून मोक्याची जागा पटकावण्याची धावपळ सुरू असते. जागा न मिळालेले मागे उभे राहतात.
सायंकाळी हरकी पौडी म्हणजे हरीची पायरी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा मातेच्या आरती चा मोठा सोहळा असतो. हा सोहळा अतिशय दिमाखदार, देखणा, प्रेक्षणीय व मनोहारी असतो. हजारो यात्रेकरू या सोहळ्यासाठी सायंकाळी गंगामाईच्या किनारी येतात व आरतीत सहभागी होतात. या आरतीचा एक वेगळाच आयाम आहे. आरतीचा एक तासाचा वेळ कसा निघून जातो समजत नाही.
सुरुवात होते मंत्रांनी… मोठमोठ्या पंचारती, झांजा, घंटा, आरत्या म्हणणारे पुजारी आणि भाविक…
पाण्यात पडलेले आरतीचे प्रतिबिंब
हळूहळू मंद होत जाणारा प्रकाश आणि खळखळत वाहणारी गंगामैय्या. आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. सगळे कसे मनात, हृदयात भरून ठेवण्याजोगे. विस्तृत पात्राने वाहणारी, स्वच्छ गंगामैय्या हरकी पौडी या घाटाच्या बाजूला वळवलेली आहे. इथे पाण्याला प्रचंड ओढ असल्यामुळे नदीकिनारी रेलिंग करून साखळ्या लावलेल्या आहेत. आपल्याला पाण्यात उतरल्यावर स्नान करताना त्या साखळ्या धराव्या लागतात. आरतीची सांगता होते. सगळे भाविक हळूहळू आपल्या घराकडे परतू लागतात. अव्याहत वाहणारी गंगामैया सागराच्या मिलनासाठी निघालेली असते. येथे येणाऱ्या भाविकांच्या मनात हरकी पौडी येथे होणाऱ्या सायंकाळच्या गंगारतीसाठी उपस्थित राहणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो तो आपापल्या परीने गंगा मातेचे चित्र डोळ्यासमोर उभे करतो. डोळे मिटून तिला भक्तिभावाने शरण जातो. जीवनदायिनी गंगा माता हजारो वर्षांपासून अविरत प्रवास करीत आहे. गंगामाते विषयी प्रत्येक हिंदू धर्मीयांच्या मनात एक वेगळीच आत्मीयता, आदराचे स्थान आहे व तिचे पौराणिक असे महत्त्व आहे.
मनातील आंदोलने कमी करून, आपले मन अधिक शांततामय करून, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशाल करण्यासाठी पाण्याच्या किनारी थोडा वेळ बसून राहावे असे म्हटले जाते. खळखळ वाहणारे नदीचे पाणी, सरोवर, तळे यांच्याकडे ती अलौकिक अशी शक्ती आहे असे म्हणतात. कधीतरी सर्वांनी करून पाहावे. आरती संपल्यानंतर, घाटावरची गर्दी कमी झाल्यावर मी सुद्धा गंगा मातेच्या किनारी एका बाजूला डोळे मिटून शांतपणे थोडा वेळ बसून राहिलो. मनातल्या मनात चारधाम यात्रेचा संकल्प सोडला उद्या सकाळपासून हरिद्वार हून चारधामची यात्रा सुरू होणार होती.
हा प्रवास आहे…आनंदसाठी, मनःशांतीसाठी आत्मिक उन्नतीसाठी, लौकिक पारलौकिक अनुभवासाठी, सामाजिक – नैसर्गिक प्रत्ययासाठी… ईश्वर, निसर्ग, दाते, अन्नदाते, आक्षयदाते,मदत कर्ते दयाळू यांच्याकडून शिकण्यासाठी…
गर्व, दुराभिमान, मत्सर, राग, आसक्ती, द्वेष
यापलिकडे जाण्यासाठी पदभ्रमणाचा हा प्रपंच…
आपले प्रत्येक पाऊल आपल्याला कणाकणाने काहीतरी मागे सोडायचा मार्ग दाखवणार आहे असा विश्वास वाटतो…
देव तर सगळीकडे आहे, मग तिकडे कशाला जायचे…
माणसेही सगळी सारखीच मग तिकडची अशी काय वेगळी आहेत…
निसर्ग तर इथून तिथून सारखाच… थोडाफार फरक काय तो असेल…
सातपुडा, सह्याद्री अशा पर्वत रांगा असताना, हिमालयाचे असे काय वेगळे आहे…
मंदिरे, नद्या, बर्फ, जंगल, दऱ्याखोऱ्या हे तर बऱ्याच ठिकाणी आहेत…
मग हा अट्टाहास, उठाठेव, तंगडेतोड कशासाठी ?
ज्याला हे प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे त्यांनीच शोधली पाहिजेत…
मला मिळालेले उत्तर दुसऱ्याचे समाधान कसे करू शकेल…
सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करायच्या नसतात… काही दुसऱ्यासाठी पण करून बघाव्यात. जगणे आणि जगून बघणे यातील फरक समजणे सोपे आहे का…
जो जगलाच नाही, तो मेलाच कसा...
प्रपंच हा न संपणारा आहे…
जन्म, शिक्षण, लग्न, अपत्य, त्यांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, त्यांची लग्ने, नातवंडे, आजारपण, स्टॅडर्ड ऑफ लिव्हिंग, मुदत ठेवी, व्याज, गुंतवणूक, सोने खरेदी, बंगला, गाडी, परदेश प्रवास ….बापरे
हे सगळे करता करता, करायचे राहून गेलेल्या गोष्टींची यादी यापेक्षा कधी मोठी झाली ते समजत नाही…
सकाळी उठण्यासाठी घड्याळाचा गरज लावताना सकाळी जिवंत असू याची खात्री देता येत नाही…तेव्हा…गजर न लावता जागे व्हा
कोरी पाटी घेऊन निघावे…जे जे उमटेल त्याचा अभ्यास करावा… आजन्म विद्यार्थ्यांने ज्ञानार्जनासाठी हे करणे उत्तम
उद्या रविवारी, पहाटे ब्रह्म मुहूर्तावर पदभ्रमणाचा श्री गणेशा करायचा आहे… लवकर निद्रादेवीच्या स्वाधीन करायला हवे…
गुरुदेव दत्त…
🙏
क्रमशः …
©️ लेखक व वाटसरू
उदय नागनाथ
मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath@dd819
