धन्य आजि दिन ॥ झाले संताचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी ॥ दैन्य गेलें उठाउठी ॥२॥
झाले समाधान ॥ पायी विसावलें मन ॥३॥
तुका म्हणॆ आले घरां ॥ तोचि दिवाळी दसरा ॥४॥
१ वसुबारस, अर्थात गोवत्सद्वादशी
२ धनत्रयोदशी
३ नरक चतुर्दशी
४ लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी
५ बलिप्रतिपदा अर्थात पाडवा
६ गोवर्धन पूजा अर्थात अन्नकुट
७ भाऊबीज
८ दिवाळी-दीपावली मुहूर्त
१ वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस,
वसुबारस
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.[७] घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.
स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.
२ धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.[९]
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक कथा आहे. इंद्रदेवाने महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेआहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[३]
हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[११]
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी
या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या राजकन्या व स्त्रियांचे एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले.
दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत,
कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.
नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[१३]
वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[१४]
नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा
हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[१७] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस.
या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.
व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.
घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.
गोवर्धन पूजा
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते.{१} बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.[२२] भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[२३]