श्री विठ्ठल-पुंडलिक
385.
श्री विठ्ठल-पुंडलिक संवाद
पितयाची भक्ति पुंडलिके केली | मात हे ऐकिली देवरामे ॥१॥
नवलक्ष गोधने पांचसे सवंगडे |रामकृष्ण पुढे चालताती ॥२॥
उठा चला जावो पुंडलिक पाहो |देव म्हणे भावो पाहो त्याचा ॥३॥
गोकुळिंहुनि देव पंढरपुरा पातला |त्वरित पावला वेणूनादी ॥४॥
तेथुनि परतला वाळवंटी आला |तंव देव देखिला पुंडलिके ॥५॥
देव उभा आहे पुंडलिक पाहे |चतुर्भुज स्वये देखियला ॥६॥
देखियेला हरी शंख चक्र करी |आयुधे ती चारी झळकती ॥७॥
चतुर्भुज मूर्ती देखियली द्रुष्टी |पुंडलिके इट टाकियेली ॥८॥
इटेवरी उभा राहिला विठ्ठल |ठसा मिरविला त्रिभुवनी ॥९॥
पुंडलिक भाव पाहू आला देव |प्रसन्न झाले सर्व पुंडलिका ॥१०॥
वैकुंठ कैलास आणील हा येथ |नामा म्हणे हित जाले आम्हा ॥११॥
