पिता-माता-बंधू-समवेत
14.
पिता-माता-बंधू-समवेत बिर्हाडी ।
पावले ते घडी वत्सयुक्त ॥१॥
दोन घटिका रात्री होती ते समई ।
वत्स तये गाई पाजियेले ॥२॥
हिरंभटी स्नान केले अग्नीसेवे ।
कार्तिकाचे दिवे आकाशात ॥३॥
सडे संमार्जन केले स्नान तेथे ।
गौचे शृंग होते कर्वाळिले ॥४॥
भ्रताराने स्नान केले आपुलिया ।
दक्षिणेची गया कोल्हापूर ॥५॥
तव कोण्ही एक निराबाई होती ।
तिने कथास्थिती सांगितली ॥६॥
भ्रताराचे कानी कथेतील सर्व ।
सांगाया अपूर्व म्हणोनिया ॥७॥
वत्साचे वृत्तांत माझेही रुदन ।
भ्रताराचे कान तृप्त केले ॥८॥
जयराम गोसावी विदेही अवस्था ।
तेणे हात माथा ठेवियेला ॥९॥
थोर याचे भाग्य तो यासी बोलिला ।
आसीर्वाद दिल्हा योग तेणे ॥१०॥
जातीचा भिक्षुक आला बहुत राग ।
धावला सवेग गृहाप्रती ॥११॥
धरूनिया वेणि मारिले यथेष्ट ।
हिरंभटा कष्ट फार जाले ॥१२॥
नावरे मारिता गायही वोरडे ।
वत्सही ते रडे कासाविस ॥१३॥
आठराव्या वरुषात मज होते तेथे ।
काय मी की सेवा आंतरले ॥१४॥
मायबाप बंधू न बोलती काही ।
भ्रतारे क्रोधही आवरिला ॥१५॥
शांत जालियाने पुसती तयास ।
स्त्रियेवरी त्रास कासयाचा ॥१६॥
येरु म्हणे रात्री कथेत प्रतिष्ठा ।
काय यांची निष्ठा देखियेली ॥१७॥
कैचे हे पुराण कैची हरिकथा ।
मारीन अन्यथा नव्हे येथ ॥१८॥
इतुके बोलोनिया भ्रतार पुनरपि ।
क्रोध तो नाटोपी अग्निऐसा ॥१९॥
बहेणि म्हणे तेव्हा देह संकल्पिले ।
प्राक्तनाचे केले कोण वारी ॥२०॥
