वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कोण्हि येक वेळे आठरा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076405 · अभंग क्र. १३

13.
कोण्हि येक वेळे आठराव्या वरुषात ।
सोमवारी व्रत थोर आले ॥१॥
हिरभंट यासी गोदान दिधले ।
द्विमुखी पाहिले यजमाने ॥२॥
काली ते कपिला काळे तिचे वस्त्र वच्छ ) ।
प्रदक्षणे पुच्छ निवेदिली ॥३॥
सुवर्णाची शृंगे रुपियाचे खूर ।
वर पीतांबर पांघुरिला ॥४॥
सर्व उपचारे गोदान दिधले ।
पाहावया आले सर्व जन ॥५॥
उपजोनिया वत्स गाय नेली घरा ।
वत्स पीत क्षीरा दोहाचिया ॥६॥
जाले दिवस दहा अकराव्या दिनी ।
हिरंभटा-स्वप्नी द्विज बोले ॥७॥
ब्राह्मण हा तुझे आहे वोसरीस ।
कपिला तयास निवेदिजे ॥८॥
स्वप्न परी साचे केले हिरंभटे ।
भ्रतारासी निष्ठे गाय दिल्ही ॥९॥
आनंदले मन सर्वाचेही जाण ।
गाई-सुश्रूषण घडे आम्हा ॥१०॥
नित्य मायबाप जाती तृणालागी ।
पाळिती प्रयोगी जाण तोषे ॥११॥
गाईचे ते वत्स तेही पै कपिला ।
माझ्या ठाई तिला हेत बहु ॥१२॥
मीच सोडी तरी वत्स रिघे दोहा ।
करिता दोहावा सवे माझी ॥१३॥
मीच पाणी पाजी तृण घाली मीच ।
मजविण कांची मनी वाहे ॥१४॥
मी जाय पाणिया वोरडे ते वत्स ।
गाय वाय पुच्छ सवे चाले ॥१५॥
करुनीया लोक नवलची राहाती ।
उगेच पाहाती कंस गाई ॥१६॥
मोकळेचि वत्स असोनिया जाण ।
न वचे आपण गाईपाशी ॥१७॥
तृण घाली तरी भक्षिनी आपण ।
पाजिल्या जीवन तेव्हा पिती ॥१८॥
रात्रीच्या अवसरी वत्स निजे सेजे ।
पुराणी ते फुंजे श्रवणकाळि ॥१९॥
कथेपासी जाय सवे तेहि येत ।
उभेची निवांत कथा ऐके ॥२०॥
गाय गोठा गह्री आपण कथेसी ।
जता मी स्नानासी सवे चाले ॥२१॥
करिती अपूर्व हे तुझे समंधी ।
लोक नाना शब्दी बोलताती ॥२२॥
कोण्ही म्हणे आहे योगभ्रष्ट वत्स ।
कोणी म्हणती नष्ट सवे इची ॥२३॥
कोण्ही म्हणती जन रिणादत इचे ।
रीण फिटे तिचे तैच सुटे ॥२४॥
ऐसे नानापरी वत्स ते न सोडी ।
मजही ते आवडू तयापासी ॥२५॥
न देखता वत्स हितु तळमळी ।
उदकेवीण मासोळी तैसे वाटे ॥२६॥
दळिता कांडिता वाहताही पाणी ।
वत्सेविण जनी नावडे हो ॥२७॥
भ्रतार रागीट नावडे की तया ।
परी त्यासी माया मनी आली ॥२८॥
म्हणे ‘ असो तुज नाही मूलबाळ ।
हाचि तुझा खेळ जाण मनी ॥२९॥
तुजही आवडी कथा-पुराणाची ।
संगती फुकाची तुज जाली’ ॥३०॥
तव तये वेळे जयराम गोसावी ।
तेथे तो स्वभावी सहज आले ॥३१॥
कथा घरोघरी ब्राह्मणाची पूजा ।
संतर्पणे द्विजा आरंभिली॥३२॥
रात्री कथा हेती दिवसाही करिती ।
मायबापे प्रीती पाहाती ते॥३३॥
तेथे तया संगे मीही जाय कथे ।
वत्सही ते तेथे सवे चाले॥३४॥
जेथे बैसे माय तेथे मी आपण ।
वत्सही धावोन सवे उभे॥३५॥
हागेना ते मुते उभेचि श्रवणे ।
आइके कीर्तन नामघोष॥३६॥
आरती जालिया नमस्कार होती ।
आपणही क्षिती ठेवी डोके॥३७॥
देखोनिया जन हासती सकळ ।
परि ते प्रेमळ आल्हादची॥३८॥
म्हणती योगभ्रष्ट पूर्वील हरिभक्त ।
गोवेषे विरक्त पहा कैसे॥३९॥
तव येके दिवसी मोरोपंते कथा ।
करावया भक्ता पाचारिले॥४०॥
दिवस येकादशी प्रहरा दो हरिकथा ।
मांडीली तत्त्वता महानंदे॥४१॥
जयराम गोसावी शिष्य-समुदायेसी ।
बैसला सभेसी आसनी ते॥४२॥
टाळ मृदंगेसी होतसे गायन ।
मिळाले जन सर्व तेथे॥४३॥
तेथे आपणही मायबाप बंधू ।
कथा परमानंदू पाहातसे॥४४॥
समागमे वत्स मजपासी बैसले ।
लोकी त्यासी नेले दारवंटा॥४५॥
म्हणती स्थळ नाही बैसवया जना ।
पशू हे श्रवणा काय योग्य॥४६॥
मी रडो लागले वत्सलागी तेथे ।
तव झाले श्रुत गोसाविया॥४७॥
वोरडता वत्स मज येथे रडता ।
सांगती अवस्था स्वामीवासी॥४८॥
म्हणती ‘ येक मुली हिरंभटघरी ।
ते आली श्रीहरी-कीर्तनासी॥४९॥
तिजसवे येक वत्स असे त्यासी ।
सांगाते तयासी हिंडविते॥५०॥
ते वत्स बाहेरी घातिले अडचणी ।
त्यालागी ते रुसुनी रडत असे॥५१॥
ते वत्स आरडत बाहेरी तिष्ठते ।
रडत हे येथे गलबला॥५२॥
साक्ष अंतरीचा तो स्वामी जयराम ।
वत्सआंतर्याम वोळखिले॥५३॥
म्हणे “आणा त्यासी वत्साचे आंतरी ।
काय नाही हरी आत्मवेत्ता॥५४॥
कथेलागी होतो जीव कासावीस ।
पशू की तयास म्हणो नये”॥५५॥
आणविले वत्स बैसविले आसनी ।
पाहोनी नयनी तोष वाटे॥५६॥
मजही कृपावंत कृपेचिये शब्दे ।
बोलावी प्रारब्धे पूर्व-पुण्ये॥५७॥
कुर्वाळोनी दोघा पाहे पूर्ण दृष्टी ।
न मानेचि गोष्टी जनालागी॥५८॥
कथा होत असे गजर महाथोर ।
चित्त हे निर्भर वैष्णवाचे॥५९॥
जयराम गोसावी याचे मनोगत ।
पुण्यसीळ सत्य उभयवर्गे॥६०॥
कथेमाजी वत्स उभेचि तिष्ठत ।
रूपी सर्व चित्त आणुनिया॥६१॥
हे मुली लहान वय इचे थोडे ।
श्रवण हे आवडे नवल मोठे॥६२॥
म्हणे इचे कोण्ही आहे ये कथेसी ।
मायबाप तिसी सांगितला॥६३॥
भ्रतारही इचा आहे बहु योग्य ।
परि इचे वैराग्य थोर दिसे॥६४॥
मायबापासवे येतसे पुराणी ।
वत्सही घेउनी समागमे॥६५॥
मग म्या आपुले आपण पाहिले ।
चरणी घातले लोटांगण॥६६॥
वत्सही तैसेची पायावरी पडे ।
अपूर्वता घडे सर्व जना॥६७॥
वाम सव्य दोन्ही होतो दोघे जण ।
वत्सा मज तेणे उठविले॥६८॥
कथा संपलिया लोक गेले सर्व ।
परि हे अपूर्व म्हणती जन॥६९॥
हिरंभट आणि आणिकही जन ।
म्हणती हे चिन्ह कोण कळा॥७०॥
बहेणि म्हणे ऐसे कोल्हापुरी होये ।
पुढीलहि सोय तुम्हा सांगो॥७१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग