॥ श्रीएकनाथमहाराजकृत
54.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय चोपन्नावा ॥
अहिरावणाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पूर्वप्रसंगीं निरुपण । श्रीहनुमंते महिरावण ।
रणी मारिला देखोन । अहिरावण क्षोभला ॥१॥
हनुमंताच्या पुच्छावर्ती । राक्षस पडीले नेणो किती ।
निधडे निधडे वीर पुढती । बळे लोटती संग्रामा ॥२॥
आम्ही निधडे महावीर । राक्षसांचे भार अपार ।
एक वानर दोघे नर । करु चकचूर क्षणार्धे ॥३॥
हनुमंत रामाना आज्ञा देण्याची विनंती करितो :
ऐकोनि राक्षसांच्या युक्ती । विनवी श्रीरामासी मारुती ।
मज आज्ञापी श्रीरघुपती । यांची शांती करीन ॥४॥
श्रीराम म्हणे गा पवनात्मजा । सदा यशस्वी तुझिया भुजा ।
प्राणदात तू रघुराजा । कीर्तिध्वजा ब्रह्मांडी ॥५॥
जानकीमनोरथाची वल्ली । प्रतापजीवनें त्वा जीवविली ।
मज रघुनाथा वेळ पडली । सांभाळिली त्वा एके ॥६॥
तुझिया उपकारांचे ओझे । मस्तक उचलू न शके माझे ।
तुझे कर्तृत्व तुजला साजे । केलीं काजें अतर्क्य ॥७॥
सीताशुद्धीपासूनि कर्मे । जी जी केलीं ती ती दुर्गमें ।
ऐसे बोलोनि रघूत्तमें । मिठी प्रेमे घातली ॥८॥
श्रीरामे देता आलिंगन । हनुमान झाला सुखसंपन्न ।
ब्रह्मप्राप्तीहूनि गहन । समाधान पावला ॥९॥
आता ऐके वचन । तुवा मारिला महिरावण ।
माझा वांटा अहिरावण । कृपा करुन मज द्यावा ॥१०॥
अहिरावणाशी युद्ध करण्याची रामांची इच्छा व
हनुमंताच्या खांद्यावर बसून रामलक्ष्मणांची युद्धाची सिद्धता :
ऐसे बोलता श्रीरघुनाथे । आवेश न धरवे हनुमंताते ।
नमस्कारोनि श्रीरामाते । उभयतांते उचलिलें ॥११॥
उभयस्कंधी दोघेजण । घेवोनि श्रीरामलक्ष्मण ।
केले हनुमंते उड्डाण । बळे गर्जोन भुभुःकारे ॥१२॥
तया भुभुःकाराच्या घोषें । कित्येक निमाली राक्षसे ।
अहिरावणही निजमानसें । धाके त्रासे कपीच्या ॥१३॥
शेष विष्णु श्रीशंकर । तिन्ही झाले एकत्र ।
श्रीराम हनुमंत सौमित्र । अति विचित्र शोभती ॥१४॥
असंख्य राक्षसांचें सैन्य । तिही वेढिले तिघे जण ।
युद्ध मांडलें दारुण । सावधान अवधारा ॥१५॥
शक्ति शूळ गदा मुद्गर । फरश पट्टिश लहुडीचक्र ।
लक्षनियां नर वानर । शस्त्रे अपार टाकिती ॥१६॥
झणें लागती श्रीरामासी । म्हणोनि हनुमंत आकाशी ।
उडोनि पुच्छे राक्षसांसी । अति आवेशी ठोकित ॥१७॥
क्षणैक भासे भूमंडळी । क्षणैक भासे नभोभंडळी ।
पुच्छे राक्षसा खंदळी । आतुर्बळी करीतसे ॥१८॥
धन्य त्या पुच्छाचा प्रताप । राक्षसांसी सुटला कंप ।
कंपामाजी मारी थाप । पाडी अमूप पदघाते ॥१९॥
असो यापरी हनुमंते । रणी मारिले राक्षसांते ।
ते देखोनि श्रीरघुनाथें । आश्चर्यातें मानिलें ॥२०॥
अहिरावण जों पाहे नयनी । पाठिराखा नाही कोणी ।
क्रोधे अधरोष्ठ चावूनी । धांवे रणी साटोपे ॥२१॥
घेवोनिया धनुष्यबाण । मांडिलें माहेश्वरीं ठाण ।
अवलोकोनि रघुनंदन । काय आपण बोलत ॥२२॥
जेंवीं होता सन्निपात । यद्वा तद्वा बडबडत ।
तैसा लक्षोनि रघुनाथ । अहा जल्पत अविचारे ॥२३॥
जेंवी सुरापानी उन्मत । वेदश्रुतीतें निंदित ।
किंवा अधर्मी अदत्त । साधुसंत उपहासी ॥२४॥
तेंवी म्हणे रे रघुनंदना । तू तंव कौसल्येचा तान्हा ।
केंवी आलासि समरांगणा । व्यर्थ प्राणां द्यावया ॥२५॥
नरमांसाची प्रीत मोठी । हे रावणे जाणोनि पोटी ।
तुज पाठविले उठाउठी । आम्हा साठीं आप्तत्वें ॥२६॥
आता पाहे रणकौतुक । बाणे छेदोनि मस्तक ।
तोरण देवीच्या संमुख । बांधीन देख निर्धारे ॥२७॥
ऐसे ऐकोनिया वचन । हास्य करोनि रघुनंदन ।
मी कीटक हीन दीन । गिळीन गगन म्हणतसे ॥२८॥
राक्षसांचा कुळांतक । दाशरथि मी रघुकुळटिळक ।
युद्ध करिता मज संमुख । क्षणे देख मरशील ॥२९॥
निद्रिस्थ देखोनि केसरी । जंबुक त्याची चेष्टा करी ।
जिव्हा देखोनि मांसावरी । बळे बाहेरी वोढित ॥३०॥
जागृत होता कुंजरारी । त्याचा एकचि ग्रास करी ।
तैसी तुजला झाली परी । दृढ विचारीं मानसी ॥३१॥
वैर नसतां तुज आम्हांसी । चोरोनि आणिले दोघांसी ।
आता केले ते पावसी । होई युद्धासीं सावध ॥३२॥
ऐसे बोलता रघुनंदन । क्रोधे क्षोभला अहिरावण ।
धनुष्य सज्जोनिया पूर्ण । तीक्ष्ण बाण विंधिले ॥३३॥
ते देखोनि रामचंद्र । बाण सोडोनि दुर्धर ।
निवारोनि अति सत्वर । शर अपार वर्षला ॥३४॥
श्रीरामाचे बाणजाळ । तेणे व्यापिले नभोमंडळ ।
अद्भुत राक्षसांचे बळ । तेणे सकळ छेदिले ॥३५॥
निवारोनि श्रीरामबाण । केले राक्षसें विंदान ।
शक्तिवरदाचा तीक्ष्ण । शर दारुण विंधिला ॥३६॥
परम योद्धा श्रीरघुनंदन । क्षणे चूर्ण करिता बाण ।
शक्तिवरदालागीं मान । स्वये आपण देतसे ॥३७॥
बाण साहोनि श्रीरघुनाथें । राक्षस विंधिला बाणे शते ।
तेणे निवारितां बाण त्याते । कपाळातें खोंचिले ॥३८॥
अहिरावणाच्या रक्तबिंदूपासून अनेक अहिरावणांची निर्मिती :
बाण लागता भाळावरी । तेथे झाली नवलपरी ।
रक्तबिंदु व्रणद्वारीं । भूमिवरी पडतांचि ॥३९॥
जितुका रक्तबिंदु पडत । तितुका अहिरावण उठत ।
ते देखोनि श्रीरघुनाथ । बाण सोडित आवेशें ॥४०॥
वेगळाले शर विंधित । लागता रक्तबिंदु पडत ।
पडतांचि अहिरावण घडत । अति अद्भुत मांडले ॥४१॥
एकापासून झाले शत । शतापासून लक्ष होत ।
लक्षांचे कोटिपर्यंत । अर्बुदांत कोटीचे ॥४२॥
ऐसे गगन आणि मेदिनी । बाणी व्यापिली अहिरावणीं ।
ऐसे देखोनिया मनी । कोदंडपाणी खवळला ॥४३॥
समस्त मिळोनि अहिरावण । गदा परिग मुसळ बाण ।
घेवोनिया श्रीरघुनंदन । चहूंकडून वेढिला ॥४४॥
श्रीराम धनुर्वाडा चोखट । तितुकियांचे छेदिले कंठ ।
कंठ छेदिता उद्भट । चालिले लोट रक्ताचे ॥४५॥
तया रक्ताचे मागुती । रुपे घडती नेणो किती ।
गदापरिघ मुसळ हाती । घेवोनि धांवती युद्धासीं ॥४६॥
धन्य तयांचे तपश्चरण । धन्य शिवाचे वरदान ।
प्रतापी रघुनंद । अणुप्रमाण ढळेना ॥४७॥
लावोनियां अग्निबाण । करोनि रक्तांचे शोषण ।
त्यांचा घ्यावा यासी प्राण । अशक्य कोण श्रीरामा ॥४८॥
सहज संकल्पाची प्रौढी । रची ब्रह्मांडांच्या कोडी ।
घडोनि सवेंचि मोडी । घडी विघडी संकल्पें ॥४९॥
तेथे बापुडे अहिरावण । मारावया नवल कोण ।
परंतु शिवाचे वरदान । रघुनंदन प्रतिपाळी ॥५०॥
शुद्ध ग्रंथाचा ग्रंथार्थ । पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ ।
हाचि जाणावा भावार्थ । त्याचे सामर्थ्य विशेष ॥५१॥
लीलामात्रें अहिरावण । मारावयासी अशक्य कोण ।
परंतु भक्ताचें महिमान । स्वये आपण वाढवी ॥५२॥
अहिरावणाच्या वधानुवृत्तीं । देखोनिया अपार व्यक्ती ।
आश्चर्य करोनि रघुपती । काय चित्ती विचरी ॥५३॥
बाण सोडिता रिपुवधार्थी । वैरी अधिकचि वाढती ।
परम अद्भुत वर्तले क्षिती । काय याप्रती करावे ॥५४॥
मारिता न मरे एक जण । चिंतावला रघुनंदन ।
उगाचि राहिला आपण । घाय दारुण टाळित ॥५५॥
श्रीरामे न सोडितां बाण । युद्धा पेटले अहिरावण ।
घाय हाणिती अवघे जण । श्रीरघुनंदन टाळित ॥५६॥
हनुमंत रामाज्ञाने मकरध्वजाच्या मातेला उपाय विचारतो :
ऐसे देखोनि हनुमंत । पर्म झला चिंताक्रांत ।
उपाय कीजे कोण येथ । श्रीरघुनाथ वांचवावया ॥५७॥
येथे न चले रणव्युत्पत्ती । येथे न चले प्रतापशक्ती ।
मारिता अधिक अद्भवती । युक्ति कोणती करावी ॥५८॥
किंवा अवघे अहिरावण । पुच्छप्रतापे आकळून ।
इतुकियांचे घेऊ प्राण । कळ लावून कंठासीं ॥५९॥
ऐसे विचारिता मारुती । युक्ती आठवली निजचित्तीं ।
जाऊन पुसू पुत्रापती । तो हे निश्चिती सांगेल ॥६०॥
ऐसे चिंतोनियां जाण । केले श्रीरामाचे स्मरण ।
हनुमंते करोनि उड्डाण । पुत्रसदन पावला ॥६१॥
तेणे नमस्कारिलें ताता । येणे सांगितले वृत्तांत ।
मकरे पाचारिली माता । समूळ वार्ता ते सांगे ॥६२॥
मकरध्वजाच्या मातेचे उपायकथन :
मगरी म्हणे प्रतापरुद्रा । वचन ऐके गुणसमुद्रा ।
संकट पडिले श्रीरामचंद्रा । त्या परिहारा सांगेन ॥६३॥
धर्म पत्नी अहिरावणा । तिचे निजनाम चंद्रसेना ।
तुम्ही जावोनि तिच्या सदना । तियेसी जाणा पुसावे ॥६४॥
पतिव्रता ते सत्यवचनी । परम साध्वी तपस्विनी ।
तियेसी पुसतां तत्क्षणीं । तुजलागोनी सांगेल ॥६५॥
कैसे सांगेल भ्रतारमरण । ऐसी आशंका घेईल मन ।
तरी तेविषयी निरुपण । सावधान अवधारा ॥६६॥
नागपाशीं श्रीरघुनंदना । बांधोनि आणितां राजसदना ।
तेथे आली चंद्रसेना । मनमोहना देखिले ॥६७॥
सुंदर देखोनि रघुपती । चंद्रसेनेची मनोवृत्ती ।
श्रीरामी वेधिली निश्चिती । ऐसा पति असावा ॥६८॥
श्रीरामी गुंतले तन मन । नाठवेचि प्रपंचस्फुरण ।
कांत व्हावा रघुनंदन । ऐसे जाण वांछित ॥६९॥
मी अनुचरी तियेची जाण । तेथे माझे गमनागमन ।
तिचे हृद्गत कळलें पूर्ण । तैंपासून मजलागी ॥७०॥
श्रीरामी गुंतली वासना । त्यालागीं सांगेल कांतमरणा ।
एतद्विषयीं अनुमाना । पवननंदना न करावे ॥७१॥
अहिरावणपत्नी चंद्रसेनेच्या सदनात हनुमंताचे आगमन :
ऐसे ऐकोनिया वचन । हनुमान उल्लासला पूर्ण ।
म्हणे कृपाळु रघुनंदन । मजलागून तुष्टला ॥७२॥
स्मरोनि श्रीरामपायांसी । तेथोनि उडाला वेगेंसी ।
आला चंद्रसेनेपासीं । देखोनि तियेसी ध्यानस्थ ॥७३॥
जैसा श्रीराम देखिला नयनी । तैसा बिंबला अंतःकरणी ।
तेणे ध्यासें श्रीरामध्यानीं । बाह्यकरणीं तटस्थ ॥७४॥
डोळस सुंदर घनसांवळा । कांसे कसिला सोनसळा ।
आपाद वैजयंती माळा । कतिमेखळा शोभत ॥७५॥
मुकुतकुंडलें शोभायमान । श्यामसुंदर राजीवनयन ।
वदन सर्वानंदसदन । कुंदरदन साजिरा ॥७६॥
सुरेख भ्रकुटी शुकनासिक । भाळीं कस्तूरीची रेख ।
ऐसा देखोनि रघुकुळटिळक । लागली देख समाधी ॥७७॥
कोटिमदनांचें सांडणे । श्रीरामावरोनि ओंवाळणें ।
चंद्रसेना आपले मनें । भोगी तेणे तटस्थ ॥७८॥
जैसा साधक हृदयभवनीं । आत्मस्वरुपातें लक्षूनी ।
तटस्थ राहे सहजासनीं । तेंवी कामिनी देखिली ॥७९॥
नातरी देखोनि सर्पासी । तटस्थता जेंवी अजेसीं ।
तेंवी देखोनि श्रीरामासी । चंद्रसेनेसी समाधी ॥८०॥
हनुमान पाहे आत्मज्ञानी । तंव ते वेधली श्रीरामध्यानीं ।
म्हणे धन्य इयेची जननी । इयेलागूनी प्रसवली ॥८१॥
राक्षसयोनीमाजी जनन । आणि इयेसी श्रीरामध्यान ।
श्रीरामाचे महिमान । होता दर्शन समाधि ॥८२॥
अति चंचळत्वें मन विकारी । एकाग्र राहोनि निर्विकारी ।
त्याचिया भाग्याची थोरी । मज वैखरीं न वर्णवे ॥८३॥
मने गोंविलें साधकांतें । मनें भ्रमविलें ज्ञानियातें ।
मनें नाडिले योगियातें । तापसातें दंडिलें ॥८४॥
ऐसे जे मन विकारवंत । चंद्रसेनेनें नेमस्त ।
करोनी हृदयी श्रीरघुनाथ । असे भोगित स्वानंदे ॥८५॥
धन्य इयेचा भावार्थ । धन्य इयेचा संचितार्थ ।
धन्य इयेचा परमार्थ । श्रीरघुनाथदर्शने ॥८६॥
ज्याचे हृदयी श्रीरघुनाथ । त्याचे भाग्य अति समर्थ ।
ऐसे बोलता हनुमंत । सद्गदित जाहला ॥८७॥
आत्मप्रत्ययाची गोष्टी । ऐकता हर्ष होय पोटी ।
नातरी प्रेमळ देखोनि दृष्टी । पडे मिठी प्रेमळा ॥८८॥
वस्तु देखोनि आवडती । कोणा एका उपजे प्रीती ।
तैसे देखोनिया सती । झाला मारुति तटस्थ ॥८९॥
हनुमंताची ध्यानमूर्ती । ब्रह्मानंदे श्रीरघुपती ।
ते देखोनि तिचे चित्ती । झाला मारुति सद्गद ॥९०॥
देही श्रीरामाचे उदेलें । नयनी प्रेमाश्रु पातले ।
स्वेदकंपादि दाटले । पूर्ण झाले मनोरथ ॥९१॥
तेणे विसरला मीतूंपण । विसरला स्थूल लिंग देह कारण ।
विसरला विश्व तैजस प्राज्ञ । महाकारण विसरला ॥९२॥
विसरला अवस्था उन्मनी । परमानंद कोंदला मनी ।
नेत्र राहिले उन्मळोनी । जनी वनी श्रीराम ॥९३॥
हनुमान विसरला देहस्फुर्ती । हृदयी कोंदला श्रीरघुपती ।
ऐसे ऐकोनि निश्चिती । आज्ञेपिता जरी श्रोते ॥९४॥
दाशरथि श्रीरघुनंदन । पाहता त्याची मूर्ति सगुण ।
त्याचे एवढे महिमान । फळ ते कोण निर्गुणाचें ॥९५॥
परवस्तुची होता प्राप्ती । जैसी तियेची फळश्रुती ।
ते त्वा सगुणध्यानस्थितीं । तैसी निश्चिती स्थापिली ॥९६॥
ऐसी श्रोतियांची युक्ती । ऐकोनि वक्ता करी विनंती ।
सावध होवोनिया चित्ती । यथानिगुतीं ऐकावे ॥९७॥
अणूमाजी ब्रह्म पूर्ण । हे तो प्रसिद्ध वदे वचन ।
कांही रिते नाही जाण । जग संपूर्ण परब्रह्म ॥९८॥
आपलें स्थान न सोडून । कार्यकारणीं होय उत्पन्न ।
मायामहत्तत्वादि त्रिगुण । ब्रह्मापासून जाहले ॥९९॥
धरणी आदि पंचभूतें । तेथूनि पावलीं जननातें ।
परंतु मुकलीं ब्रह्मातें । हे कोणाते न बोलवे ॥१००॥
सुवर्णापासून नग जाला । तरी सुवर्णत्वा काय मुकला ।
त्यासी अधिक लाभ झाला । नाम पावला अलंकार ॥१॥
तेंवी जे जे आले व्यक्ती । ते ते ब्रह्मरुप निश्चिती ।
मग पूर्णावतार श्रीरघुपती । ब्रह्ममूर्ति केंवी नव्हे ॥२॥
अणुही परी ब्रह्मत्वेंसीं । कांही नसतां प्रतापासी ।
हा तरी प्रतापाची राशी । ब्रह्मत्व यासी केंवी नसे ॥३॥
ज्याचे गृहीं सर्व संपत्ती । आणि स्वामित्व लोकांप्रती ।
भगवद्गीतेंत श्रीपती । माझी विभूति ते म्हणे ॥४॥
ऐसिया राजियांच्या चळथा । नित्य सेविती श्रीरघुनाथा ।
ज्याचा चतुरानन खेळता । वंदी माथा शंकर ॥५॥
श्रीराम चूडामणि रघुवीर । ज्यासी वंदिती नर सुरवर ।
पूर्णब्रह्म हा निर्धार । केंवी साचार न मानावा ॥६॥
आणीकही दुसरा अर्थ । रावणभये सुर समस्त ।
क्षीरसागरा जावोनि त्वरित । रमाकांत प्रार्थिला ॥७॥
त्यांचे ऐकोनिया स्तवन । शेषशायी श्रीनारायण ।
स्वये झाला रघुनंदन । हे तो वचन वाल्मीकी ॥८॥
नारायण तो श्रीरघुनंदन । शेष तोचि लक्ष्मण ।
शंख चक्र भरत शत्रुघ्न । वाल्मीकवचन प्रसिद्ध ॥९॥
पूर्णब्रह्म श्रीनारायण । तोचि झाला श्रीरघुनंदन ।
झाला म्हणणे हेंही गौण । तोचि आपण प्रकटला ॥११०॥
जोचि देखिला वाराणसीं । तोचि भेटला अन्य देशी ।
तरी काय भेद झाला त्यासी । देशकाळासीं भेदत्व ॥११॥
जैसा होता शेषशयनी । तोचि झाला अयोध्याभवनीं ।
पूर्णब्रह्मत्व रघुनंदनी । निश्चियेंकरोनी पै असे ॥१२॥
सगुण असता श्रीनारायण । त्यासी ब्रह्मत्व कैसेन ।
ऐसे म्हणती त्यांचे ज्ञान । अति अज्ञान जाणावें ॥१३॥
सगुण मानिती श्रीहरीतें । त्यांचे ज्ञान असो परतें ।
त्याहून आहे म्हणता वरतें । सरतें पुरतें अज्ञान ॥१४॥
असो हे भेदाची मात । पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ ।
स्वलीला अवतार धरित । नाना दावीत चरित्रें ॥१५॥
ब्रह्म नसतां रघुनंदन । तरी कैसेनि तरती पाषाण ।
जीवनात्मा श्रीराम आपण । स्वसत्तें जाण तारिले ॥१६॥
आणीक दुसरा चमत्कार । लंकेपुढें घोरांदर ।
होता मरती निशाचर । आणि वानर उठती ॥१७॥
समुद्री पाषाण तरती । हे ईश्वरत्वाची प्रतीती ।
आत्मत्वाची दुजी ख्याती । कपि वांचती संग्रामी ॥१८॥
बाण फिरोनि भातां रिघती । हे व्यापकत्वाची प्रतीती ।
आणि स्वकर्मत्वाची ख्याती । कपि मारिती राक्षसा ॥१९॥
हेचि आशंका पार्वतीसी । सीता होवोनि वानासीं ।
छळो आली श्रीरामासी । श्रीरामे तिसी ओळखिलें ॥१२०॥
ब्रह्म नसता श्रीरघुपती । तरी कैसेनि ओळखता पार्वती ।
सर्वज्ञत्वाची हे प्रतीती । श्रीराम निश्चिती परब्रह्म ॥२१॥
ऐसे ईश्वरत्व आत्मत्व सर्वज्ञत्व । व्यापकत्व आणि सर्वकर्तृत्व ।
त्यासी न मानितां ब्रह्मत्व । अज्ञानत्व म्हणजें यासी ॥२२॥
सच्चिदानंद आत्माराम । तो श्रीराम पूर्णकाम ।
ज्याचे सहज घेता नाम । उडे परम अज्ञान ॥२३॥
त्याचे भजन तेंचि साधन । त्याचे स्मरण तेंचि मनन् ।
त्याची प्राप्ति तोचि जाण । ब्रह्म पूर्ण त्रिसत्य ॥२४॥
ऐसियापरी श्रीरघुनंदन । पूर्ण ब्रह्म सनातन ।
त्यांचे हृदयी करिता ध्यान । झाला लीन हनुमंत ॥२५॥
ऐसे ऐकोनिया वचन । सुखावले श्रोतेजन ।
म्हणती वक्ता विचक्षण । समाधान पै केले ॥२६॥
पूर्णब्रह्म श्रीरघुनंदन । आम्हा ठावें असे पूर्ण ।
तुझे पहावयासी ज्ञान । केला प्रश्न कौतुकीं ॥२७॥
सद्गुरुकृपाघनतुषारें । आनंदविलीं मनमयूरें ।
झाले समाधान पुरें । चालवी त्वरे कथेसी ॥२८॥
श्रोतियांसी करोनि नमन । वक्ता म्हणे सावधान ।
समधि पावला हनुमान । पुढील कथन अवधारा ॥२९॥
सर्व वृत्तींचा निरास । करोनि स्वरुपी सावकाश ।
लीन असता हनुमंतास । श्रीरामास अति चिंता ॥१३०॥
स्वरुपी वेधल वायुकुमर । झाला मत्कार्याचा विसर ।
ऐसे जाणोनि रघुवीर । करी सत्वर सावध ॥३१॥
श्रीराम चैतन्याचें चित्त । श्रीराम आनंदाचे जीवित ।
स्फुरणरुपेंसी प्रकटत । सावध करी रघुनंदन ॥
येता वृत्तीवरी हनुमान । झाले स्मरण कार्याचें ॥३३॥
अवस्था जिरवूनि उदरी । हनुमंत विचारी अंतरी ।
श्रीराम सांडोनि संगरीं । काय करी मी येथे ॥३४॥
आलो वर्म पुसावयासी । ते स्मरण नाहींच मानसी ।
काय गुंतलों समाधीसी । वेगी कार्यासी करावे ॥३५॥
श्रीराम सर्वांसी बुद्धिदाता । श्रीराम चैतन्या चेतविता ।
तेणे चेतविलें हनुमंता । पुढील कथा अवधारा ॥३६॥
हनुमंताकडून चंद्रसेना सावध होऊन प्रश्न करते :
हनुमान उघडोनि पाहे नयना । तंव ते ध्यानस्थ चंद्रसेना ।
करोनि हरिनामें गर्जना । टाळी जाणा पिटिली ॥३७॥
ऐकता हनुमंताची टाळी । तिची उघडली कर्णटाळी ।
सावध होवोनि नेत्रकमळीं । पाहे बाळी सचकित ॥३८॥
म्हणे नवल कैसे झाले । कैचें वानर येथे आले ।
यासी पुसोनि पाहो वहिले । नमन केले तंव तेणे ॥३९॥
देखोनि बोले राक्षसभार्या । कपि आलासी कोण्या कार्या ।
तेजे दिससी समान सूर्या । वानरवर्या सांगावे ॥१४०॥
हनुमंताचे वृत्तांतकथन व वर्मउपायाची याचना :
हनुमंत म्हणे चंद्रवदनें । शुभलक्षणे कुंदरदने ।
गुणचातुर्यसौंदर्यसदने । माझी वचनें परिसावीं ॥४१॥
रावणे निजसामर्थ्येसीं । बंदीं घातले देवांसी ।
सुरवरी प्रार्थिलें श्रीहरींसी । अति करुणेसी भाकूनी ॥४२॥
त्यांचे ऐकोनिया स्तवन । स्वये अवतरे नारायण ।
सूर्यवंशी श्रीरघुनंदन । ब्रह्म पूर्ण प्रकटला ॥४३॥
त्याचा बंधु तो लक्ष्मण । तोचि सहस्रवदन ।
शंखचक्रावतार पूर्ण । भरतशत्रुघ्न जाणावे ॥४४॥
पुढे दशरथाचे वचनें । वना पातला श्रीरघुनंदन ।
सीता हरिली दशाननें । कपटभावेंकरोनी ॥४५॥
तिची करावया सोडवण । मेळवोनि वानरसैन्य ।
लंके आला श्रीरघुनंदन । समुद्री पाषाण घालोनी ॥४६॥
वानरी करोनि घोरांदर । रणी मारिले निशाचर ।
रावणाचे बंधुपुत्र । श्रीरामे समग्र मारिले ॥४७॥
तेणे दुःखे दशानन । अहिमही दोघे जण ।
त्यांसी जाणवी वर्तमान । साह्य पूर्ण करावे ॥४८॥
तिही ऐकिलें वचन । निद्रिस्थ श्रीरामलक्ष्मण ।
येथे आणिले चोरोन । त्यांचे हवन करावया ॥४९॥
ऐसे कळतां मज हनुमंता । वेगी धांवोनि तत्वता ।
केले महिरावणाच्या घाता । श्रीरघुनाथा सोडविले ॥१५०॥
हे देखोनि अहिरावण । दुःखे क्षोभला दारुण ।
पडखळोनि रघुनंदन । दुर्धर रण मांडिले ॥५१॥
दुर्धर रणयोद्धा श्रीराम । केला अद्भुत संग्राम ।
तेथे कौतुक झाले परम । न कळे वर्म राक्षसी ॥५२॥
बाण लागता शत्रुशरीरीं । रुधिर पडता पृथ्वीवरी ।
बिंदुपासाव होती वैरी । नवलपरी हे माते ॥५३॥
चंद्रसेना सत्यवचनी । ऐसे ऐकोनिया कानी ।
वर्म पुसावयासी जननी । तुजलागोनी मी आलो ॥५४॥
वैरी कैसेनि उद्भवती । त्यांची कैसी हो शांती ।
हे मज सांगावे निश्चिती । श्रीरघुपतिसुखार्थ ॥५५॥
रणसंकटीं पडिला श्रीराम । त्याचा जेणे होय निगम ।
ऐसे सांगावे निजवर्म । मनोधर्म हा माझा ॥५६॥
निजधर्माचे संरक्षण । करावया साधूचें पाळण ।
मारावया दुष्टजन । रघुनंदन अवतरला ॥५७॥
श्रीराम भक्तांचे माहेर । श्रीराम ज्ञानाचे जिव्हार ।
श्रीराम विश्वाचा आधार । पूर्णावतार श्रीराम ॥५८॥
श्रीराम मुनिजनांचे ध्यान । श्रीराम योगियांचें भजन ।
श्रीराम सुरांचें देवतार्चन । मदनमोहन श्रीराम ॥५९॥
श्रीरामाऐसें निधान । राक्षसी घेतलें वेष्टून ।
त्यासी उपाय कीजे कवण । कृपा करुन सांगावा ॥१६०॥
ऐसे बोलता हनुमंता । चंद्रसेनेसीं परमावस्था ।
संकट ऐकोनि श्रीरघुनाथा । झाली तत्वता विव्हळ ॥६१॥
श्रीराम सर्वांगसुकुमार । सुवर्णतनु सुंदर ।
राक्षसांचे शस्त्रप्रहार । केंवी रघुवीर साहेल ॥६२॥
आणि असावा ऐसा भर्ता । पूर्वसंकल्प चित्ती होता ।
ऐसिया बुद्धीची विकळता । सांगे तत्वता पतिमरण ॥६३॥
म्हणे ऐके श्रीरामदूता । परमसाधु परम भक्ता ।
माझिया पुरविसी मनोरथा । तरी मी तत्वता सांगेन ॥६४॥
साच ऐकोनिया वचन । हृदयी हर्षला हनुमान ।
म्हणे सांगसी मजलागून । ते पूर्ण करीन मी ॥६५॥
चंद्रसेना म्हणे त्याते । सत्य मिथ्या न कळे माते ।
जरी तू देसील भाकेतें । तरी मी तूते सांगेन ॥६६॥
आपुला साधावया कार्यार्थ । भाक देवोनि हनुमंत ।
म्हणे काय तो सांग त्वरित । मनोरथ मी कर्ता ॥६७॥
चंद्रसेनेचे हनुमंताला अटीसह उपायकथन :
हर्षे बोले चंद्रसेना । म्हणे ऐक पवननंदना ।
म्या भोगावें श्रीरघुनंदना । मुख्य वासना हे माझी ॥६८॥
कांत व्हावा श्रीरघुपती । ऐसी वांच्छा आहे चित्ती ।
पूर्ण करी तू मारुती । म्हणोनि सती वंदित ॥६९॥
कांत व्हावा श्रीरघुनंदन । म्हणोनि सांगतें पतिमरण ।
अवश्य हनुमंते बोलोन । पुसे फिरोन ते गोष्टी ॥१७०॥
मग म्हणे गा ऐके सत्य । अहिरावण जो माझा कांत ।
तेणे तप केले अद्भुत । तोही वृत्तांत अवधारी ॥७१॥
लोहकंटकीं एकनिष्ठ । येणे रोवोनि अंगुष्ठ ।
तप केले अति उत्कृष्ट । श्रीनीळकंठप्रीत्यर्थ ॥७२॥
प्रसन्न होवोनि त्रिनयन । तेणे दिधले वरदान ।
रक्तबिंदु पडता जाण । अहिरावण जन्मावे ॥७३॥
भ्रमराळी शिवकंधरी । पाताळ अमृत लवकरीं ।
आणोनि रुधिरी घालिती ॥७४॥
तेणे उठती अहिरावण । हे हनुमंता सत्य जाण ।
असत्य न वदे माझे वदन । पुढील कारण करावे ॥७५॥
हनुमंताचे उड्डाण व भ्रमरसंहार :
ऐसे ऐकता हनुमंत । चंद्रसेनेतें वंदित ।
मज वोळला श्रीरघुनाथ । असे डुल्लत निजप्रेमे ॥७६॥
करोनिया श्रीरामस्मरण । केले हनुमंते उड्डाण ।
वेगी पातला पाताळभुवन । जेथे स्थान अमृताचें ॥७७॥
सादरें पाहे हनुमंत । तंव भ्रमरीं झांकिलें अमृत ।
म्हणे सतीचें वचन सत्य । वर्म निश्चित सांगितले ॥७८॥
त्या अमृतरुद्राते रक्षण । लोकपाळ ठेविले जाण ।
येरें करोनि आंगवण । मारिले पूर्ण निमषें ॥७९॥
पुढे येता वायुसुत । भ्रमर देखिले अमृत नेत ।
एकामागे एक पळत । त्वरान्वित अति वेगे ॥१८०॥
तेणे क्षोभला हनुमंत । थापा हाणोनि समस्त ।
अवघ्या करोनि प्रांणात । निर्जीवित पडिले ॥८१॥
कोणी उरले पांच सात । ते पळाले भयभीत ।
मुख्य जो का भ्रमरनाथ । जाणवीत तयासी ॥८२॥
तो अति उग्र स्थूळशरीरी । मेरु भ्रमरमाळेवरी ।
गरुडाऐसा फडत्कारीं । आला सत्वरी धांवोनी ॥८३॥
वज्रप्राय चंचु कठिण । हाणि हनुमंता धांवोन ।
येरे दोनी पक्ष धरोन । पाडिला जाण भूतळीं ॥८४॥
पाय देवोनि वक्षाप्रती । पक्ष उपडितां दोही हाती ।
येरू येवोनि काकुलती । म्हणे मारुती वांचवी ॥८५॥
तुझिया उपकारा उत्तीर्ण । मी एकदां होईन जाण ।
जेव्हा माझे करिसी स्मरण । मी पावेन ते समयी ॥८६॥
म्हणसील भ्रमर हीन दीन । होसी उतराई कैसेन ।
तरी कीटक समुद्रा उत्तीर्ण । झाले म्हणून ऐकिजे ॥८७॥
ऐसे ऐकोनि दीनवचन । कृपें कळवळिला हनुमान ।
त्यासी भाकें गोंवून । दिल्हा सोडून भ्रमरेंद्र ॥८८॥
तेथे बैसोनि हनुमंत । स्वेच्छा प्राशिलें अमृत ।
येरीकडे श्रीरघुनाथ । काय करित ते ऐका ॥८९॥
आकाशवाणीने रामांना निर्दालक बाण सोडण्याची सूचना :
सज्जोनिया चापशर । युद्ध मांडिले घोरांदर ।
बाणी निवटी राक्षसभार । श्रीरघुवीर दृढ योद्धा ॥१९०॥
तंव गर्जली आकाशवाणी । बाण सज्जीं कोंदडपाणी ।
तुझे शत्रु तुझिया बाणी । येच क्षणी निमतील ॥९१॥
शत्रु जेणे पावती जनन । तया उपाय पडिले खान ।
अमृतवृष्टी सरली जाण । विजयी पूर्ण तू होसी ॥९२॥
ऐसे अशरिरिणीचें वचन । ऐकोनि श्रीरघुनंदन ।
चापीं सज्जी अग्निबाण । घ्यावया प्राण शत्रूचा ॥९३॥
सबीज मंत्रे आव्हानिला । सुसाटध्वनि शर सूटला ।
शत्रुकाननीं लागला । निघती ज्वाळा धडधडां ॥९४॥
बाणे शोषोनि रुधिर । अवघे करोनि एकत्र ।
कंठ छेदिले सर्वत्र । निमेषमात्र न लागता ॥९५॥
जितक्या झाल्या होत्या व्यक्ती । तितक्यांची केली शांती ।
धन्य धनुर्वाडा रघुपती । निमेषगती न लागता ॥९६॥
अहिरावणाचा वध :
मुख्य जो का अहिरावण । तयाचे शिर छेदून ।
बानें वंदोनि रघुनंदन । निघे परतोन भात्यांत ॥९७॥
समुद्री नाना तरंग उठती । वायु त्यांची करी शांती ।
तेंवी निजबाणें श्रीरघुपती । राक्षसव्यक्ती निवटिता ॥९८॥
नातरी मनाचे संकल्प । साधक करी निर्विकल्प ।
तेंवी अहिरावण अमूप । रविकुळदीपक संहारी ॥९९॥
जेंवी नाना भूतकृती । असता नाशे ब्रह्मसंपत्ती ।
तेंवी राक्षसांच्या व्य्क्ती । श्रीरघुपति संहारी ॥२००॥
भेदवाद्यांचे शब्दार्थ । जेवी वेदांत दूषित ।
तैसियापरी श्रीरघुनाथ । संहारित राक्षसा ॥१॥
जेंवी उगवता सूर्यकिरणें । लोपोनि जाती तारांगणे ।
ऐसियापरी श्रीरघुनंदनें । रणी मारणे शत्रूंतें ॥२॥
क्रोधांवाचून संहार । काम नसता कामाचार ।
लोभावांचून परिवार । श्रीरघुवीर संपादी ॥३॥
असो त्याची अतर्क्य गती । तोचि जाणे निश्चिती ।
किंवा त्याचे भक्त जाणती । येरांप्रती टकमक ॥४॥
ऐसियापरी श्रीरघुनंदन । मारोनिया अहिरावण ।
विजयी झाला संपूर्ण । पुढील कथन अवधारा ॥५॥
अहिरावण पडिला रणी । ऐसे देखोनिया नयनी ।
पळों लागल्या राक्षसश्रेणी । जीव घेवोनि श्रीरामभयें ॥६॥
धर्मयोद्धा श्रीरघुनंदन । पळत्यावरी न घाली बाण ।
रणी उभा रणप्रवीण । सहलक्ष्मण स्वानंदे ॥७॥
हनुमंताचे राक्षससैन्यात आगमन व राक्षसांची दाणादाण :
येरीकडे श्रीहनुमंत । उड्डाण करोनिया त्वरित ।
आला राक्षससैन्यांत । नाम गर्जत श्रीरामाचे ॥८॥
पुच्छ वाढिविलें थोर । आवर्त घालोनि चौफेर ।
राक्षसांसी केला मार । अति दुर्धर तो ऐका ॥९॥
गज धरोनि हस्तकीं । हाणी गजाचे मस्तकी ।
रथ घेवोनि एकाएकी । बळे टाकी रथावरी ॥२१०॥
मोठा युद्धा आवेश । झोडी राक्षसेराक्षस ।
पायी मारिले बहुवस । सावकाश रणरंगीं ॥११॥
एक आकाशी झुगारिले । एक सागरी बुडविले ।
एक पायींच तुडविले । एक झोडिले कराघातें ॥१२॥
पुच्छ पसरिले दुर्धर । राक्षस आकळोनि समग्र ।
लोहार्गळा घेवोनि थोर । केला चूर अस्थींचा ॥१३॥
भयें भ्रमविलें निशाचरा । पळो लागले सैरावैरां ।
एकी घेवोनि भेदरा । रणी थरथरां कांपती ॥१४॥
एक पळती आकाशांत । भला सांपडला पंथ ।
ऐसे वदता पुच्छकेत । पायी धरित अतर्क्ये ॥१५॥
पुच्छ नव्हे हा काळकेत । लपोनि राहता विवरांत ।
पुच्छ पातले उमगित । ओढोनि काढित बाहेरी ॥१६॥
ऐसी राक्षसा करोनि बोहरी । पुच्छे प्रवेश करोनि नगरी ।
हनुमान मर्कटचेष्टा करी । नवलपरी ते ऐका ॥१७॥
नगरी वागती नगरलोक । तेथे पुच्छ आले देख ।
पायी धरोनि एकाएक । बळे सकळिक आपटिले ॥१८॥
पळोनि जाता निजगृहांत । पुच्छ पातलें अकस्मात ।
महानाटकी हनुमंत । राक्षसांत मांडिला ॥१९॥
पुच्छ घालिता नासिकांत । राक्षस सटसटां शिंकत ।
नाकी वदनी सकसळित । बुळबुळित बृहतीमाजी ॥२२०॥
अधोद्वारा दाटित । वदनद्वारीं काढित ।
तेणे राक्षसा प्राणांत । कळकळित कपिभये ॥२१॥
नगरी मांडिला आकांत । राक्षस ठायी ठायी लपत ।
सर्वदेखणा हनुमंत । पुच्छ धाडित त्या ठाया ॥२२॥
सर्वभूती श्रीरगुनाथ । त्यासी भजता हनुमंत ।
झाले सर्वज्ञत्व प्राप्त । जाणे समस्त विश्वहृदय ॥२३॥
सर्वभूती श्रीरघुनाथ । ऐसे जाणोनि हनुमंत ।
राक्षस मारिले किमर्थ । तोही वृत्तांत अवधारा ॥२४॥
श्रीराम सर्वांचा हृदयस्थ । हृदयी असोनि साक्षिभूत ।
सर्वी साक्षित्वें नांदत । नव्हे लिप्त पापपुण्य ॥२५॥
घटी रविबिंब देखिले । आणि घटासी फोडिलें ।
तरी काय सूर्यातें भेदिले । बोलता बोल् मानेना ॥२६॥
सहज फोडितां तरंगासी । काय फोडिलें समुद्रासी ।
तैसे मारिता इतरांसी । श्रीरामासी काय लागे ॥२७॥
आणि प्रवृत्तिशास्त्रसंमत । देवद्रोही मदोन्मत्त ।
ब्रह्मद्वेषी अधर्मरत । त्यांचा घात करावा ॥२८॥
आणिकही दुसरा अर्थ । मुक्त जे जे कर्म करित ।
ते ते त्यासी अबाधत । न लागे निश्चित पापपुण्य ॥२९॥
गोकुळामाजी श्रीअनंते । भोगिलें नाना योषितातें ।
पाप कोणते जडले त्याते । हेंचि निश्चिते सांगावे ॥२३०॥
तयाचपरी श्रीहनुमंतें । रणी मारिले राक्षसांतें ।
नाही मानिले हत्येतें । तन्मयत्वें संग्राम् ॥३१॥
असो यापरी हनुमंत । निजात्मध्यासें युद्ध करित ।
रणी खवळला अत्यद्भुत । पुच्छकेत सोडिला ॥३२॥
आला आला रे पुच्छकेत । नगरी मांडिला आकांत ।
राक्षस शंखस्फुरण करित । सैरा धांवत दशदिशा ॥३३॥
पुच्छ येता बाजारांत । चाटे दिंडांमाजी लपत ।
वाणी लपती पोत्यांत । पुच्छ ओढित तेथूनी ॥३४॥
तेली लपती घाण्यांत । साळी दडती निजगर्तेत ।
पानपसारे अटक्यांत । पुच्छ काढित तेथूनी ॥३५॥
विचारोनि युक्ती शूद्रीं । लपती कडब्यामाझारी ।
पुच्छ अवचितें पायी धरी । काढी बाहेर ओढोनी ॥३६॥
एक तळघरीं देती दडिया । एक समुद्री देती बुडिया ।
एक टाकिती पेवीं उडिया । पुच्छ पाया सोडीना ॥३७॥
कोट्यनुकोटी राक्षसभार । मारिले हनुमंते समग्र ।
नगरी उठिला हाहाकार । रजनीचर पळताती ॥३८॥
धांवत आले राजगृहासी । जानविलें चंद्रसेनेसी ।
येरी जाणोनि मानसी । निजयुक्तीसी सांगत ॥३९॥
पुच्छ् जवळी येता जाण । घाला जानकीची आण ।
तेचि युक्तीतें करोनी कित्येक जाण वांचले ॥२४०॥
हनुमंताचे रामचंद्रासन्निध आगमन व कथन :
ऐसे करोनि चरित्र । उड्डाण करी वायुपुत्र ।
येथे उभे श्रीराम सौमित्र । मित्र तिकडे सत्वर परतला ॥४१॥
अगाध हनुमंताची ख्याती । स्वर्गी सुरवर वानिती ।
लिहितां न पुरे एवढी क्षिती । यथामती बोलता ॥४२॥
येरीकडे श्रीरघुनंदन । अनुलक्षूनि लक्ष्मण ।
म्हणे युद्धाचे लक्षण । कैसे जाण भासलें ॥४३॥
वैरी कोठून उद्भवले । कैसेनि नासातें पावले ।
हे तव महाआश्चर्य झाले । कोणे केले कळेना ॥४४॥
ऐकोनि बोले सुमित्रासुत । वाढ वेळ गेला हनुमंत ।
त्यावीण हा कार्यार्थ । नव्हे निश्चित दुजियाचा ॥४५॥
ऐसे दोघे संवादती । तंव आकाशपंथें मारुती ।
उतरोनियां शीघ्रगती । श्रीरघुपति नमियेला ॥४६॥
देवाभक्तां होता भेटी । निजानंदें कोंदली सृष्टी ।
गगनी केली पुष्पवृष्टी । सुखसंतुष्टी सुरवरी ॥४७॥
हनुमंतासी श्रीरघुनंदन । म्हणे आम्हांते सांडोन ।
कोठे केले होते गमन । मजलागून सांगावे ॥४८॥
ऐसे बोलता श्रीरघुपती । वरतें न पाहे मारुती ।
म्लानवदन दीनवृत्ती । श्रीरामाप्रती अनुवादे ॥४९॥
दुर्धर देखोनि अहिरावणा । जावोनि प्रार्थिली चंद्रसेना ।
तुझ्या देवोनि अंतुरीपणा । जय आंदणा घेतला ॥२५०॥
तुझे एकपत्नीव्रत । हे तो घडेना निश्चित ।
अतएव माझा संचितार्थ । पै विपरीत फळिन्नला ॥५१॥
तुझे नाम स्मरतां वदनी । पापी वसती वैकुंठभुवनीं ।
माझे पूर्वज नरकायतनीं । तुझे कारणीं पडियेले ॥५२॥
श्रीरामांची प्रतिक्रिया :
ऐसे बोलता हनुमंत । कृपेनें कळवळला रघुनाथ ।
तू तंव माझा परम आप्त । भला कार्यार्थ साधिला ॥५३॥
जैसे निवारिलें संकट । तैसे निवारीं हे दुर्घट ।
आम्हांसी अणुमात्र खटपट । नलगे स्पष्ट तव धर्मे ॥५४॥
हनुमंताची चंद्रसेनेला तयारीची सूचना :
ऐसे बोलता श्रीरघुवीर । वेगे उडाला वायुकुमर ।
चंद्रसेनेचें मंदिर । अति सत्वर ठाकिलें ॥५५॥
तियेसी बोले हनुमंत । तुझे पुरवावया मनोरथ ।
येथे आणितों श्रीरघुनाथ । सावचित्त तू ऐस ॥५६॥
श्रींराम सर्वात्मा सर्वज्ञ । श्रीराम त्रैलोक्यातें मान्य ।
त्याचे आतिथ्य करिता सामान्य । सत्य जाण महादोष ॥५७॥
ब्रह्मादिका पडे दृष्टी । तो येतसे तुझे भेटी ।
भाग्य तुझे न वदवे होटीं । धन्य सृष्टी तू एक ॥५८॥
तरी ऐके एक वचनार्थ । शेज करावी सुनिश्चित ।
अणुमात्र भंगल्या श्रीरघुनाथ । उठोनि त्वरित जाईल ॥५९॥
हनुमंताची भ्रमराला मंचक कोरण्याची आज्ञा :
येरी बरे म्हणोनि पाही । शेज सांवरी लवलाही ।
हनुमंताने तेचि समयी । भ्रमर हृदयी आठविला ॥२६०॥
तो स्मरतांचि पातला तेथे । नमस्कारिलें हनुमंताते ।
काय आज्ञा करी माते । निजभावार्थे पूसत ॥६१॥
ऐकोनि बोलिजे हनुमंते । चंद्रसेनेच्या मंदिरातें ।
तुवा जावोनि गुप्तपंथे । मंचकातें कोरावें ॥६२॥
पोंचट करावा मंचक । वरी बैसतां रघुकुळटिळक ।
भंगोनि जाय एकाएक । ऐसा देख करावा ॥६३॥
आज्ञा म्हणोनि मधुकर । वेगे पावला राजममंदिर ।
मंचक कोरुनि समग्र । किंचिन्मात्र रक्षिला ॥६४॥
कर्दळीपत्रप्रमाण । त्वचा रक्षोनियां जाण ।
वेगे करोनि उड्डाण । पवननंदन वंदिला ॥६५॥
तुवा दिधले जीवदान । त्याचे न होववे उत्तीर्ण ।
परंतु स्वल्प सेवा जाण । तुजलागून अर्पिली ॥६६॥
हनुमान येवोनि श्रीरामापासीं । भ्रमर भेटविला श्रीरामासी ।
श्रीरामे देवोनि आलिंगनासी । मधुकरासी गौरविले ॥६७॥
भ्रमर म्हणे पवनात्मजा । तुवा उद्धार केला माझा ।
मज भेटविला श्रीरामराजा । झालों तुझा उपकारी ॥६८॥
ऐसे स्तवोनि उभयतांसी । भ्रमर गेला निजधामासी ।
हनुमंताने श्रीरामासी । राजगृहासीं चालविलें ॥६९॥
श्रीरामांचे चंद्रसेनेच्या निजमंदिरात आगमन व मंचकभंग :
श्रीराम येता निजमंदिरा । आडवी धांवोनि सुंदरा ।
नमस्कारोनि श्रीरघुवीरा । निजवोंवरा आणिले ॥२७०॥
श्रीराम बैसतां मंदकावरी । झाली मंचका चकचूरी ।
तैंच उठोनि झडकरी । निघे बाहेरी श्रीराम ॥७१॥
चंद्रसेनेचा हनुमंतावर क्रोध :
कपट कळलें चंद्रसेनेसी । मग भरोनि क्रोधावेशीं ।
काय बोलिली हनुमंतासी । कपटी होसी तू एक ॥७२॥
अरे कपटिया श्रीरामदूता । आपुलें कार्य साधिले धूर्ता ।
मारवोनि माझ्या कांता । हितस्वार्था नागविले ॥७३॥
अति भावार्थे पुसोनि वर्म । शेखी केले घातक कर्म ।
कोठे राहिला सत्य धर्म । महा अधर्म त्वा केला ॥७४॥
श्रीरामांकडून सांत्वन व उपदेश :
आता शाप घेई माझा । म्हणोनि बोलली राक्षसभाजा ।
कृपा आली राघवराजा । पवनात्मजाकारणें ॥७५॥
माझ्या कार्यालागी जाण । येणे केले हे विंदान ।
आणि शाप दारुण । किमर्थ आपण घालावा ॥७६॥
ऐसे विचारुनि पोटी । आत्मज्ञानाचे परिपाठी ।
चंद्रसेनेसी सांगे गोष्टी । कृपादृष्टीं कृपाळू ॥७७॥
मी सर्वाअत्मा सर्वदेशीं । व्यापक नव्हे एकदेशी ।
व्यापकता नाना आकारांसी । निजदेहासीं व्यापक ॥७८॥
श्रीरामे धरली धरा राहे । श्रीरामे जीवन जीवताहे ।
श्रीरामप्रतापें वायु आहे । चाळविताहे सर्वांसी ॥७९॥
श्रीरामे दिधला अवकाश । म्हणोनि नांदताहे आकाश ।
श्रीरामे तेजासी प्रकाश । श्रीराम सर्वांसीं व्यापक ॥२८०॥
श्रीराम बुद्धीसी बोधविता । श्रीराम चित्तासी चेतविता ।
अंतःकरणी सर्व सत्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥८१॥
श्रीरामे सबळ अहंकार । श्रीरामे मनाचा व्यापार ।
श्रीराम प्राणांसीं परिचार । श्रीराम साचार सर्वगत ॥८२॥
श्रीरामे नयनांसी द्रष्टेपण । श्रीरामे श्रवणांसी होय श्रवण ।
श्रीरामे सुवास घेणे घ्राण । श्रीरामेंविण ते व्यर्थ ॥८३॥
श्रीरामे गोडी जाणे रसना । श्रीरामे प्राणी मीतूंपणा ।
जाणे जाणा तत्वता ॥८४॥
श्रीराम शरीर उठवी बैसवी । श्रीराम शरीर निजवी फिरवी ।
हे जाणते स्वानुभवी । येरा पदवी अतर्क्य ॥८५॥
श्रीराम प्राणांचाही प्राण । श्रीराम जीवाचे जीवन ।
श्रीराम मनाचे उन्मत । चैतन्यघन श्रीराम ॥८६॥
ऐसा श्रीराम तो सर्वगत । भोगीत राहे तू निवांत ।
सद्गुरुमुखें करोनि प्राप्त । आन किमर्थ वांछिसी ॥८७॥
म्हणसी सद्गुरुसी पुसों जाता । हातीचा जासील तू आता ।
तरी एतद्विषयीं ऐक कथा । तुज सर्वथा सांगेन ॥८८॥
सकळ सृष्टीचा मी कर्ता । ईक्षणमात्रें सृष्टीचा हर्ता ।
सर्वांमाजी आत्मसत्ता । तो मी तत्वता उपदेशीं ॥८९॥
ब्रह्मा माझा नित्यांकित । शंकर माझे ध्यान करित ।
विष्णु तो मी मूर्तिमंत । उपदेशित तुजलागीं ॥२९०॥
म्या बोलविल्या वेद बोले । म्या चालविल्या सूर्य चाले ।
म्या हालविल्या देह हाले । तो मी बोले तूजसीं ॥९१॥
ईश्वराचा मी ईश्वरु । गुरुचाही आदिगुरु । मजहूनि
परता सद्गुरु । कोण सधरु असेल ॥९२॥
यथा देव तथा गुरु । या श्रुतिवाक्याचा निर्धारु ।
तो मी स्वमुखें सद्गुरु । करी सधरु उपदेश ॥९३॥
तुझ्या देहाचा चाळक । तो मी आत्माराम देख ।
त्यासी भोगितां हे चोख । आवश्यक अंतरी ॥९४॥
तया भोगाचें लक्षण । तेंही ऐक सावधान ।
सर्वसाक्षी चैतन्यघन । तो मी पूर्ण हा ध्यास ॥९५॥
तया ध्यासाच्या परिपाठी । दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी ।
समूळ मावळली हे गोष्टी । पाठीपोटीं श्रीराम ॥९६॥
द्वैताचा ठाव नाही जेथे । भोक्ता कैंचा तेथे ।
मज भोगिजे श्रीरघुनाथें । हे कोणाते नाठवे ॥९७॥
असो ऐसिया निजात्मध्यासें । सांडी दुजेपणाचें पिसे ।
हेंचि भोगी निजमानसें । तुज म्या जैसे सांगितले ॥९८॥
तथापि आवडीच्या भरें । श्रीराम भोगावा शरीरें ।
म्हणसी तरी या अवतारें । हे निर्धारे घडेना ॥९९॥
पुढील अवतारी चंद्रसेनेला कामनापूर्तींचे रामाचे आश्वासन :
तथापि भक्तभावासाठीं । मज अवतरणें शुष्ककाष्ठीं ।
तुझिये प्रीतीस्तव गोरटी । करीन गोष्टी ते ऐक ॥३००॥
यादवकुळीं द्वापारांत । कृष्णरुपें श्रीरघुनाथ ।
तुजला वरील निश्चितार्थ । वचन सत्य हे जाण ॥१॥
तेथे राजा सत्राजित । त्याचे उदरी तू जनित ।
सत्यभामा होसी सत्य । तुज मी तेथ वरीन ॥२॥
अतिशयेंसीं भावार्थ । असे तुजपासी नांदत ।
तुझा होईन मी अंकित । माझे भक्त मज प्रिय ॥३॥
भक्त जैसा मज नाचवित । तैसा तैसा मी नाचत ।
आता राहे तू निवांत । मज भोगित अंतरी ॥४॥
माते गावें मजला ध्यावें । माते पहावे मज स्मरावें ।
मद्रूप होवोनियां रहावे । ऐसेनि हरावें काळातें ॥५॥
ऐसे बोलता श्रीरघुनंदना । तन्मय झाळी चंद्रसेना ।
विसरली मी तूंपणा । श्रीरामवचना अनुसरली ॥६॥
बरवे म्हणोनि श्रीरामासी । नमस्कारिलें साष्टांगेंसीं ।
म्हणे उद्धरिले दीनासी । धन्य होसी श्रीरामा ॥७॥
माझा सदगुरु वायुकुमर । तेणे भेटविला श्रीरघुवीर ।
त्याचा न वर्णवे उपकार । दासी किंकर मी त्याची ॥८॥
परम कृपाळु दशानन । वैकुंठासी करिता गमन ।
आमुचे त्यासी झाले स्मरण । श्रीरघुनंदन पाठविला ॥९॥
आपण गेलिया मोक्षासी । कोण उद्धरील त्यांसी ।
श्रीराम न येचि पाताळासी । म्हणोनि यासी धाडिलें ॥३१०॥
येथे धाडोनि श्रीरघुनंदन । सकुळ तारिला अहिरावण ।
धन्य धन्य दशानन् । वाटे पूर्ण कृपाळु ॥११॥
धन्य धन्य तो राक्षसराज । धन्य धन्य तो पवनात्मज ।
धन्य श्रीराम विजयध्वज । जेणे मज उद्धरिले ॥१२॥
ऐसे करोनिया स्तवन । केले श्रीरामासी नमन ।
घालोनिया पद्मासन । बैसली जाण ध्यानस्थ ॥१३॥
मकरध्वजाला महिकावतीचे राज्यपद :
यानंतर श्रीरघुनाथ । मकरध्वज जो हनुमंतसुत ।
महिकावतिये अभिषेकित । राजा करित तयासी ॥१४॥
आशीर्वाद वदे श्रीरघुनंदन । जोंवरी लंकेसी बिभीषण ।
तोंवरी राजसिंहासन । तुजलागोन पाताळीं ॥१५॥
रामलक्ष्मणाचे हनुमंतासह वानरसैन्यांत पुनरागमन :
ऐसे देवोनि आशीर्वचन । श्रीराम हनुमंत लक्ष्मण ।
वेगे निघाले तेथून । लंकाभुवन पावावया ॥१६॥
मग हनुमंते दोघे जण । स्कंधीं बैसविले आपण ।
वेगे करोनि उड्डाण । आला जाण बिलद्वारा ॥१७॥
विवरी अवघा अंधकार । श्रीराम स्वये प्रकाशकर ।
दर्शने केला विवरोद्धार । पंथ दुर्धर क्रमियेला ॥१८॥
आले एकाएकी बाहेरी । वानरसैन्यामाझारीं ।
अग्निशशांकसूर्यापरी । वानरवीरीं देखिले ॥१९॥
तिन अहोरात्रें श्रीराम । कोठे होता पूर्णकाम ।
आता आला विश्रामधाम । आल्हाद पूर्ण वानरा ॥३२०॥
कोणी नमिती श्रीरामासी । कोणी भेटती लक्ष्मणासी ।
कोणी वंदिती हनुमंतासी । हरिनामेंसीं गर्जती ॥२१॥
आला आला दीनदयाळ । आला आला भक्तवत्सल ।
अला आला प्रणतपाळ । पूर्ण कृपाळ श्रीराम ॥२२॥
आला आला सत्यप्रतिज्ञ । आला आला हो सर्वज्ञ ।
आला आला रघुनंदन । दीनोद्धारण श्रीराम ॥२३॥
आला आला भक्तकैवारी । आला आला अहल्योद्धारी ।
आला आला पौलस्त्यारी । वानरभारी आल्हाद ॥२४॥
आला आला भक्तांतरंग । आला आला सीतारंग ।
आला आला विश्वतरंग । अंतरंग जो आत्मा ॥२५॥
ऐसीया प्रेमाचिया पडिभारें । गर्जो लागलीं वानरे ।
देखोनि श्रीरघुवीरें । आत्यादरें आलिंगिलीं ॥२६॥
मग सुग्रीव बिभीषण । करी धरोनि श्रीरघुनंदन ।
शिबिरामाजी नेले जाण । सुखसंपन्न बैसले ॥२७॥
पुढील कथेचे अनुसंधान । रावणहोमविध्वंसन ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥२८॥
श्रोते म्हणती नवलकथा । श्रीरामकाव्यामाजी नसतां ।
कोठोनि काढिली ही कथा । ऐकोनि वक्ता बोलत ॥२९॥
शतकोटी श्रीरामचरित्र । वदलें वाल्मीकाचें वक्त्र ।
कोठे कैसे चित्रविचित्र । कोणे समग्र शोधिलें ॥३३०॥
परी प्रस्तुत अग्निपुराण । श्रोती पहावे शोधून ।
सेतुबंधनमाहात्म्यीं जाण । हे आख्यान सविस्तर ॥३१॥
आळस सांडोनिया चित्ते । क्षणभरीं करोनि अवकाशाते ।
पहावे शोधून ग्रंथातें । आशंकेते फेडावें ॥३२॥
एकनाथी रामायण । केले सप्तकांडकथन ।
त्यांत अहिरावणाख्यान । काय म्हणोन विसरले ॥३३॥
ऐसे न वदावें उत्तर । ते तंव विष्णुचा अवतार ।
त्यांसी स्वप्नी नाही विसर । महाचतुर ग्रथकर्ते ॥३४॥
परंतु झाले बहुत दिवस । मुखीं पाळितां ग्रथास ।
गाहाळिलें ह्या अध्यायास । तिही तयास काय कीजे ॥३५॥
मग साक्षेपे जयरामसुतें । करोनि घातले अध्यायाते ।
हृदयी रिघोनि एकनाथें । हे मजहातें करविलें ॥३६॥
माझे नव्हे हे ज्ञान । कांही नेणे मी व्याख्यान ।
माझे हृदयी प्रवेशून । केले कथन श्रीरामे ॥३७॥
श्रीराम नयनांचाही नयन । श्रीराम श्रवणांचाही श्रवण ।
श्रीराम मनाचे आदिमन । तेणे लेखन हे केले ॥३८॥
श्रीराम सर्वा बुद्धिदाता । सर्वी सर्वत्र त्याची सत्ता ।
हेंही करणे श्रीरघुनाथा । काय आता मी सागूं ॥३९॥
ऐसे श्रोत्यांसी प्रार्थून । जयरामात्मजें करोनि नमन ।
म्हणे पुढील अनुसंधान । सावधान परिसावे ॥३४०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अहिरावणवधश्रीरामगमनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥५४॥
ओंव्या ॥३४०॥
