वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ३०. माया-सीतेचा प्रसंग

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088197 · अभंग क्र. ३०

30.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय तिसावा ॥
देवांतक व त्रिशिर यांचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

नरांतकाच्या वधामुळे त्याचे पाचही पुत्रांचे रणांगणावर आगमन :

अंगदे मारिला नरांतक । राक्षसदळी परम धाक ।
पळोनियां वीरनायक । लंकेसंमुख निघाले ॥१॥
पळता देखोनि राक्षसभार । कोपा चढला राजकुमर ।
अवघे होऊन एकत्र । निशाचर परतले ॥२॥

नरांतकं हतं दृष्ट्वा चुक्रुशुनैर्ऋतर्षभाः ।
देवांतकजस्त्रिमूर्धा च पौलस्त्यश्च महोदरः ॥१॥
आरुढो मेरुसंकाशं वानरेंद्रं महोदरः ।
वालिपुत्रं महाविर्यमभिदुद्राव वीर्यवान् ॥२॥
भ्रातृव्यसनसंतप्तस्तदा देवांतको बली ।
आदाय परीघं घोरमंगदं समभ्यद्रवत् ॥३॥
रथमादित्यसंकाशं युक्तं परमवाजिभिः ।
अस्थाय त्रिशिराश्चापि वालिपुत्रमुपाद्रवत् ॥४॥
स त्रिभिर्मेघसंकाशैनैर्ऋतैस्तैरभिद्रुतः ।
वृक्षमुत्पाटयामास महाविटपमंगदः ॥५॥

अंगद वीरशिरोमणी । नरांतक पाडिला रणी ।
ते देखोनि पांचही जणीं । आले गर्जोनी संग्रामा ॥३॥
त्यांहीमाजी तिघे वीर । त्रिशिरा देवांतक महोदर ।
रणी मारावया अंगद वीर । अति सत्वर धांवले ॥४॥
रणी मर्दावया अंगद वीर । गजारुढ महोदर ।
धांविन्नला अति दुर्धर । घाये वानर मारावया ॥५॥
बंधुस्नेहें आत्यंतिक । खवळोनियां देवांतक ।
परिघ हाणावया संमुख । देवोनि हाक पै आला ॥६॥
अनर्ध्य रथ अनर्घ्य वारु । त्यावरी बैसोनि त्रिशिरा वीरु ।
रणी मारावया वानरु । अति सत्वर धांविन्नला ॥७॥
रणी मारावया जुत्पती । एक गजी दोघे रथी ।
धांवतां संग्रामव्युत्पत्तीं । अंगदे ख्याती लाविली ॥८॥
रावणकुमर रणप्रवीण । एकावरी तिघे जण ।
येता देखोनिया जाण । आले स्फुरण अंगदा ॥९॥
अतिरथी तिघे जण । करित आले गडगर्जन ।
करावया तिघांसींही रण । आले स्फुरण अंगदा ॥१०॥
जैसा शनैश्वर जाण । तीन राशी भोगी आपण ।
तैसाच अंगद रणप्रवीण । तिघे जण मर्दावया ॥११॥
मेघगर्जनें गर्जती वीर । रामनामे गर्जे वानर ।
युद्ध मांडिलें घोरांदर । शस्त्र संभार सुटले ॥१२॥

महोदरं समासाद्य शालमुत्पाट्य वीर्यवान् ।
देवांतकाय तं वीरश्चिक्षेप सहसांगदः ॥६॥
महावृक्षे महाशैलं शक्रो दीप्तमिवाशनिम् ।
त्रिशिरास्तं तु चिच्छेद शैरराशीविषौपमैः ॥७॥
वृक्षं निकृत्तमालोक्य समुत्पत्य ततोंऽगदः ।
स ववर्ष ततो वृक्षाञ्शिलाश्च कपिकुंजरः ॥८॥
तांश्चिच्छेद सुसंक्रुद्धस्त्रिशिरा निशितैः शरैः ।
परिघाग्रेण तान्वृक्षाञ्शिलाश्च निजधान सः ॥९॥

रावणाचे तिघे पुत्र एकट्या अंगदावर चालून येतात :

दोघे रावणराजकुमर । महाबळ महोदर ।
क्षोभला अंगद वाळिकुमर । तिघे वीर मारावया ॥१३॥
पर्वतभारेंसी संभार । उपडोनि शालवृक्ष थोर ।
देवांतकावरी वानर । रागे सत्वर लोडित ॥१४॥
वाजता अंगदाचीं हाक । येता देखोनि संमुख ।
अवो भुलला देवांतक । उपाव एक सुचेना ॥१५॥
येणे मारिला नरांतक । तैसाच मारील देवांतक ।
त्रिशिरा धांवोनियां देख । शालवृक्ष छेदिला ॥१६॥
वृक्ष छेदिता शतधारी । अंगदे लोठोनी पुच्छेंकरीं ।
पाडिता राक्षसांचे भारी । शतसहर्स्त्रीं प्राणांत ॥१७॥
राक्षसदळीं हाहाकार । अंगदे केला महामार ।
विस्मित त्रिशिरा महोदर । धन्य वानर प्रतापी ॥१८॥
तिघांसी युद्ध करी समोर । पुच्छे मारी राक्षसभार ।
अंगद प्रतापी वानर । सुरासुर वानिती ॥१९॥
माझ्या वृक्षाचा आघात । तिघीं मिळोनि केला व्यर्थ ।
अंगद क्षोभला अत्यंत । रणकंदनार्थ करावया ॥२०॥
मारावया निशाचर । पाचारोनि निजवानर ।
म्हणे शिळा पर्वत शिखर । रणी सत्वर पुरवावे ॥२१॥

अंगदाचा रावणाच्या तिन्ही पुत्रांवर हल्ला :

ऐंसें सांगोनि वानरांसी । अंगद उसळला आकाशी ।
मग माडिलें संग्रामासी । अति आवेशी क्षोभोनी ॥२२॥
शिळा शिखरें अत्यद्‍भुत । वृक्ष पाषाण पर्वत ।
अंगद गर्जगर्जोनि वर्षत । रणी प्राणांत राक्षसा ॥२३॥
शिळाशिखरीं अत्यद्‍भुतीं । रणी लावोनियां ख्याती ।
करीन तिघांची समाप्ती । रणव्युत्पती पहा माझी ॥२४॥
उपमर्दून तिन्ही गुण । सुख पावती योगिजन ।
तुम्ही मारिल्या तिघें जण । रणकल्याण मज तेव्हा ॥२५॥
ऐसे गर्जोनि समर्थ । शिळाशिखरे द्रुम पर्वत ।
लागवेगें पै वर्षत । रणकंदनार्थ राक्षसा ॥२६॥
द्रुमादिपर्वतशिखरें थोर । चेंपला राक्षसांचा भार ।
रणी उठला हाहाकार । राजकुमर विस्मित ॥२७॥
आम्हांसी युद्ध करिता संमुख । मागे राक्षस गांजिले निःशेख ।
अंगद वीर अति अचुक । पाडिलें टक तिघांसी ॥२८॥
बाणी पर्वत निवारित । तंव येती असंख्यात ।
तेही साटोपे जंव तोडित । येती आघात वृक्षांचें ॥२९॥
वृक्ष निवारितां जाण । मस्तकी वाजती पाषाण ।
घाबरे केले तिघे जण । रणप्रवीण अंगदे ॥३०॥
बाण तोमर परिघाग्र । तिघीं निवारितां गिरिवर ।
अंगद वर्षे सत्वर । शिळाशिखरें पर्वती ॥३१॥
जैशा पर्जन्याच्या धारा । तैसा वर्षे गिरितरुवरां ।
उसंत नाही तिघां वीरा । राजकुमारां गाजिलें ॥३२॥
पुरुषार्थाची परम कीर्ती । तिघे वीर ते अतिरथी ।
अंगदे लावोनियां ख्याती । रणव्युत्पत्ती गांजिले ॥३३॥
त्रिशिरा वीर रणप्रवीण । वज्रास्त्रें विंधोनि बाण ।
पर्वत तरुवर छेदून । केले शतचूर्ण रणरंगी ॥३४॥
पर्वत पुरविल्या वानरांसी । त्रिशिरा विंधी अति आवेशी ।
तिही घेवोनि त्रासासी । सुग्रीवापासी पळाले ॥३५॥
देवांतकाचा परिघ थोर । महोदराचा तोमर ।
त्रिशिरा विंधी तीव्र शर । अंगद वीर मूर्च्छित ॥३६॥
अंगद वानरी युवराजा । सांपडला आमच्या समाजा ।
त्यासी बांधोनिया वोजा । नेऊ विजयध्वजा लंकेसी ॥३७॥
त्यासी बांधवेना संपूर्ण । त्याच्या अंगी आंगवण ।
मंडप घेवोनि उडाला जाण । त्यासी कोण बांधील ॥३८॥
सांपडला आहे हाताआंत । तंव त्याचा करु घात ।
ऐसे विचारिता समस्त केले विपरीत अंगदे ॥३९॥
अंगद पडता मूर्च्छित आपण । स्मरे श्रीरामनामस्मरण ।
मूर्च्छा जावोनि संपूर्ण । आले स्फुरण अंगदा ॥४०॥
महोदरा देवोनि लात । गजीं पाडिला मूर्च्छित ।
देवांतकासी चपेटघात । तोही रथस्थ पाडिला ॥४१॥
त्रिशिर्‍याचे धनुष्याचें शित । पुच्छे छेदोनिया तेथ ।
त्याचे बाण करोनिया व्यर्थ । रणी गर्जत अंगद ॥४२॥
तिघे महावीर दारुण । अंगदासीं करिता रण ।
धन्य अंगदाची आंगवण । तिघांही जणा नातोपे ॥४३॥

त्रिशिराश्चांगदं वीरंअभिदुद्राव सायकैः ।
गजेन समभिद्रुत्य वालिपुत्रं महोदरः ॥१०॥
स त्रिभिनैर्ऋतश्रेष्ठैर्युगपत्समभिदुतः ।
न विव्यथे महातेजा वालिपुत्रः प्रतापवान् ॥११॥

अंगद नाटोपे रणप्रवीण । त्रिशिरा क्षोभला अति दारुण ।
काढोनियां निर्वाणबाण । आला गर्जोन संग्रामा ॥४४॥
गजावरुन अति तांतडी । महोदरें घातली उडी ।
तोमरेंसीं लवडसवडी । अंगद कडाडी ठोकिला ॥४५॥
देवांतक तेच अवसरी । परिघ घेवोनिया करी ।
अंगद ताडिला हृदयावरी । गडगर्जे गर्जोनी ॥४६॥
परिघ तुळोनि साटोपता । बळे रणरंगी तळपतां ।
घाव मागुता मागुता । होय हाणिता वारंवार ॥४७॥
तिघे वीर अति विख्यात । सबळ बळे घाव हाणित ।
अंगद नव्हे व्यथाभूत । घाय मानीत तृणप्राय ॥४८॥
अंगदे उडोनि कडाडीं । गजासी देता पै थापडी ।
डोळे फाडोनियां बडीं । रणपडिपांडी मारिले ॥४९॥

तलेन भृशमुत्पत्य जघान गजमंगदः ।
पेततुर्नयने तस्य विननाश स वारणः ॥१२॥
विषाणं चास्य निष्कृष्य वालिपुत्रो महाबलः ।
देवांतकमभिदुत्य स जघान तदोरसि ॥१३॥
स विव्हलित सर्वांगो वातोद्‍भूत इव दुमः ।
लाक्षारससवर्णं च सुस्त्राव रुधिरं मुखात् ॥१४॥
अथाश्वस्य महातेजाःकृच्छ्राद्देवांतको बली ।
आविघ्य परिघं वेगादाजघान तदांगदम् ॥१५॥

देवांतकाचा अंगदाकडून वध :

महोदराचा महाहस्ती । थापा हाणोनि पाडिला क्षिती ।
गजदंत उपडोनिया हाती । देवांतकाप्रती धांविन्नला ॥५०॥
अंगदे पूर्वरागेंकरी । देवांतकाचे उरावरी ।
गजदंत हाणोनि निजगजरीं । धरेवरी पाडिला ॥५१॥
नाकीं तोंडी सुटलें रक्त । लक्षारंगासम आरक्त ।
मुखी रुधिरातें वमित । रणी मूर्च्छित पडियेला ॥५२॥
तोंडी सुटलें रक्त तडफडी । हात पाय स्वये वोढी ।
अति कष्टाच्या पडिपाडीं । मूर्च्छा गाढी भांजिली ॥५३॥
मूर्च्छा भांजोनि संपूर्ण । देवांतक स्वये आपण ।
परिघ घेवोनि दारुण । अंगद जाण ठोकिला ॥५४॥
परीघ लागतांचि निजनेटीं । रणरंगी मेटीकुटी ।
घालोनि बैसला जगजेठी । मूर्च्छा पोटी सांवरुनी ॥५५॥
अंगदे करिता उड्डाण । त्रिशिरा विंधी दारुण बाण ।
महोदर स्वये आपण । हाणी निर्वाण तोमरें ॥५६॥
सर्पप्राय त्रिशिराबाण । ललाटीं भेदला दारुण ।
धन्य अंगदाची आंगवण । अणुप्रमाण न ढळेचि ॥५७॥
दोही कटकीं वाजली हाक । अंगद बळिया चोख ।
तेणे हनुमंता हरिख । आला तवक नीळासीं ॥५८॥

ततोंऽगदं परिक्षिप्तं त्रिभिनैर्ऋतपुंगवैः ।
हनूमानथ विज्ञान नीलश्चापि प्रतस्थतुः ॥१६॥
ततश्चिक्षेप शैलग्रं नीलस्त्रिशिरसे तदा ।
तद्रावणसुतः शूरो निर्बिभेद शितैः शरैः ॥१७॥
ततश्चूर्णितमालोक्य हर्षाद्देवांतकस्तदा ।
परिघेणाभिदुद्राव मारुतात्मजमाहवे ॥१८॥
तमापतंतमुत्पत्य हनूमान्कपिकुंजरः ।
आजघान तदा मूर्घ्नि वज्रकल्पेन मुष्टिना ॥१९॥
स मुष्टिनिष्पिष्टविभिन्नमूर्धा विशीर्णदंताक्षिप्रलंबजिव्हः ।
देवान्तको राक्षसराजसूनुर्गतासुरुर्व्यां सहसा पपात ॥२०॥

अंगदाच्या साहाय्यार्थ हनुमंताचे आगमन व त्रिशिर-हनुमंत युद्ध :

तिघां जणांसी भिडता । अंगद श्रमला युद्ध करिता ।
हनुमंत त्यासी साह्य जाता । नीळही तत्वता स्वये आला ॥५९॥
त्रिशिरा अंगदां विंधी बाण । त्यासी नीळे पाचारुन ।
दीर्घ पर्वत अति सघन । घाली गर्जोन मस्तकी ॥६०॥
त्रिशिरा धनुर्वाडा चोख । लक्ष साधून शरसन्निष्ठ ।
घाये पर्वत केला पिष्ट । पाडिला सकूट पृथ्वीसीं ॥६१॥
पर्वत छेदिला त्रिशिरेंनीं । तेणे देवांतक हरिखेजोनी ।
निजपरिघेंसी गार्जोनी । हाणी धांवोनी हनुमंता ॥६२॥
हनुमान रणी धीट नीट । त्याचा परिघ करोनि पीठ ।
टोला देता चतुस्फोट । पाडिला स्पष्ट पृथ्वींसीं ॥६३॥
कैसा टोल्याचा आघात । भग्न मस्तक रुधिरांकित ।
पृथ्वीतळीं सनेत्र दांत । जिव्हा लोळत सलंब ॥६४॥
देवांतक रावणसुत । टोल्यासाठीं करोनि घात ।
रणी पाडिला निश्चेष्टित । केला प्राणांत हनुमंते ॥६५॥

ततस्तु नीलः प्रतिलब्धसंज्ञः सशैलमुत्पाट्य सवृक्षखंडम् ।
सदूरमुत्पत्य खमुग्रवेगो।महोदरं तेन जघान मूर्घ्नि ॥२१॥
स तेन शैलेन समाहतस्तु रक्षोधिपो भूपितले पपात ।
महोदरो जीवितमुत्ससर्ज यथा गजः सिंहबलाभिभूतः ॥२२॥

नीळ – महोदर यांचा संग्राम, महोदराचा वध :

येरीकडे नीळ महोदर । युद्धा पेटले दुर्धर ।
नीळ क्षोभोनि सेनाधर । केला संहार तो ऐका ॥६६॥
महोदराचा तोमर । नीळ उड्डोणें हरी सत्वर ।
रागे उपडिला गिरिवर । त्यावरी थोर द्रुमशिखरें ॥६७॥
नीळे देवोनिया हाक । पर्वत टाकिता संमुख ।
महोदरासी टकमक । आली भुली देख रणमारे ॥६८॥
देखता नीळाचि आंगवण । महोदर धाके संपूर्ण ।
धाकेंचि त्याचा गेला प्राण । गिरिनिवारण कोण करी ॥६९॥
नीळे पर्वत घालिता पै शिरी । महोदर पडिला धरेवरी ।
जाहली हाडांची चकचुरी । प्राणांत करि वानर ॥७०॥
देवांतकानें हनुमान मारी । नीळ महोदरातें संहारी ।
रावणा जाली पोरमारी । अपांपरी राक्षसा ॥७१॥

पितृव्यं निहतं दृष्ट्वा त्रिशिरा क्रोधमूर्च्छितः ।
हनुमंतं सुसंक्रुद्धो विव्याध निशितैः शरै ॥२३॥
ततो हनुमानुत्पत्य हयांस्त्रिशिरसस्तदा ।
ददार करजैस्तीक्ष्णैर्गजेंद्रं मृगराडिव ॥२४॥
अथ शक्तिं समादाय कालरात्रिमिवांतकः ।
हनूमंतं प्रचिक्षेप त्रिशिरा रावणात्मजः ॥२५॥
दिवि क्षिप्तां महोल्काभां शक्तिं तां तु महाप्रभाम् ।
बभंज हनुमांस्तस्य हर्षाच्च विननाद ह ॥२६॥

त्रिशिराची हनुमंतावर क्रोधाने चढाई :

अंगदे नरांतकसंहार । देवांतका हनुमान वीर ।
नीळे मारिला महोदर । त्रिशिरा दुर्धर क्षोभला ॥७२॥
त्रिशिरा कोपोन दारुण । हनुमंतासी विंधिले बाण ।
पुच्छाग्रें करोनि चूर्ण । केले उड्डाण हनुमंते ॥७३॥
हनुमान तळपोनि अंबरी । त्रिशिरारथाचे वारु चारी ।
विदारिले नखाग्री । जेंवी केसरी गजाते ॥७४॥
विदारुनि वारु चारी । रथ करोनि चकाचुरी ।
हनुमान गर्जे गिरागजरीं । जो महामारी राक्षसा ॥७५॥
बांधावया हनुमान वीर । त्रिशिरा कोपला अत्युग्र ।
शक्ति काढिली दुर्धर । रणी वानर मारावया ॥७६॥
उल्का जैसी कडाडित । की काळरात्री धडधडित ।
करावया हनुमंताचा घात । त्रिशिरा सोडित महशक्ती ॥७७॥
शक्ति अतिशये दुर्धर भारी । तेज न समाय अंबरीं ।
कडकडोनि प्रळयगजरीं । हनुम्यावरी लोटली ॥७८॥
धन्य बळिया हनुमंत । पुच्छे शक्तीचा केला घात ।
मोडून सांडिला रणाआंत । कपि गर्जत स्वानंदे ॥७९॥
शरचाप रणी केले व्यर्थ । दुर्धर शक्तीचा केला घात ।
त्रिशिरा स्वये कोपान्वित । खड्ग काढित साटोपे ॥८०॥

ततः खड्गं समुत्पाद्य त्रिशिरा राक्षसोत्तमः ।
निचखान तदा शूरो वानरेंद्रस्य वक्षासि ॥२७॥
खड्गप्रहाराभिहतो हनूमान्प्लवगोत्तमः ।
आजघान त्रिशिरसं तलेनोरसि वीर्यवान् ॥२८॥
स तलाभिहतस्तेन स्रस्तकेशांबरो भुवि ।
निपपात महातेजा विसंज्ञस्त्रिशिरास्तदा ॥२९॥
यत्‍नतस्तस्य खड्गं तु समाक्षिप्य महाकपि ।
ननाद गिरिसंकाशस्त्रासयन्सर्वराक्षसान् ॥३०॥

त्रिशिरा – हनुमंत यांचे तुंबळ युद्ध व त्रिशिराचा वध :

रणी खवळोनि त्रिशिरा भारी । खड्ग काढोनि कोशाबाहेरी ।
हनुमान हाणिला उरावरी । खड्गधारी साटोपे ॥८१॥
रणप्रवीण हनुमंते । त्रिशिरा हाणोनि तळघातें ।
हिरोन घेऊन खड्गातें । पाडिला तेथे मूर्च्छित ॥८२॥
खड्गहस्ती हनुमान वीर । रणी गर्जती वानर ।
चळीं कांपती निशाचर । अति दुर्धर हनुमंत ॥८३॥
चेतना लाहोनि त्रिशिरा । देखोनि खड्गहस्त वानरा ।
दांत खावोनि करकरा । हाणी कपींद्र मुष्टिघात ॥८४॥
माझे खड्ग वानराहाती । देखोनि प्रज्वळला चित्ती ।
हनुमान हाणी मुष्टिघातीं । सर्वशक्तीं साटोपे ॥८५॥
हनुमंतासीं मुष्टिघात । हाणिता झणणिला हात ।
त्रिशिरा चांचरी जात । स्वये सांवरीत विव्हळ ॥८६॥
लागता त्याचा मुष्टिघात । डळमळीना हनुमंत ।
खड्गहस्ते क्षणाआंत । केला निःपात तिही शिरां ॥८७॥

स तेन खडगेन महाशिरांसि कपिःसमस्तानि सकुंडलानि ।
क्रुद्धः प्रचिच्छेद तदा हनूमास्त्वष्टुःसुतस्येव शिरांसि शक्रः ॥३१॥
तस्मिन्हते देवरिपौ त्रिशीर्षे हनूमता शक्रपराक्रमेण ।
नेदुः प्लवंगाः प्रचचाल भूमी रक्षांसि सर्वाणि विदुद्रुवुश्च ॥३२॥
हतं त्रिशिरसं दृष्ट्वा तथैव च महोदरम् ।
हतो प्रेक्ष्य दुराधर्षै देवांतकनरांतकौ ॥३३॥
चुकोप परमामर्षी मत्तो राक्षसपुंगवः ।
जग्राहार्चिष्मतीं चापि गदां सर्वायसीं तदा ॥३४॥

खड्ग घेवोनि हनुमंते । छेदिलें त्रिशिर्‍याचे तिही शिरांतें ।
समुकुट सकुंडलांतें । लखलखीत पाडिली ॥८८॥
विरुपाचीं महाशिरें । जैसी का छेदिलीं इंद्रे ।
तैसी त्रिशिर्‍याचीं शिरें । रणी कपींद्रें पाडिलीं ॥८९॥
गिरिशृंगे उद्‌भट । शिरें शोभती लखलखाट ।
वटारिले नेत्रवाट । पाडिले स्पष्ट रणरंगीं ॥९०॥
त्रिशिरा सुरवरांचा वैरी । हनुमंते रणमारीं ।
शिरे छेदून शस्त्रधारीं । धरेवरी पाडिला ॥९१॥
सुरवर करिती जयजयकार । नामे गर्जती वानर ।
धाके पळती निशाचर । रणी महाशूर मारिले ॥९२॥

त्रिशिराचा बंधू महापार्श्व यांचे आगमन :

त्रिशिरा मारिला महाशूर । मारिला बंधु महोदर ।
देवांतक राजकुमर । मारिला वीर नरांतक ॥९३॥
देखोनि सुहृदांचा मार । महापार्श्व महावीर ।
दुःखशोकें अति जर्जर । चढला पूर मोहाचा ॥९४॥
महापार्श्व मोहन्वित । स्वये होवोनि सावचित्त ।
रणी राहोनि ध्यानस्थ । कर्तव्यार्थ विचारी ॥९५॥
पळोनि जाता लंकेआंत । पुत्रशोकें लंकानाथ ।
अवश्य करील माझा घात की अपमानांत गांजील ॥९६॥
मुखी लावील मसीचा टिळा । रासभारोहणीं गोमयगोळा ।
उपानहांच्या माळा गळा । होईल सोहळा शिमग्याचा ॥९७॥
ऐसे अपमानें जिणें । त्याहून श्रेष्ठ रणी मरणे ।
निमाल्या निजमोक्ष पावणें । जिंतल्या जिणें जगद्वंद्व ॥९८॥
ऐसे विचारोनि जाण । महापार्श्व विचक्षण ।
वानरी करावया रण । स्वये आपण परतला ॥९९॥

चुकोप सुमहातेजा महापार्श्वो महाबल ।
जग्राह महतीं घोरां गदां सर्वायसीं तदा ॥३५॥
हेमपट्टपरिक्षिप्तां मांसशोणितफेनिलाम् ।
विरोचमानां विपुलां शत्रुशोणिततर्पिताम् ॥३६॥
गदामादाय संक्रुद्धो महापार्श्वो महायशाः ।
हरिन्समभिदुद्राव युगांताग्निरिव ज्वलन् ॥३७॥

महापर्श्व-ऋषभ यांचा संग्राम :

निमाले देखोनि स्वजन । वानरेंसी करावया रण ।
महापार्श्व स्वये आपण । गदा घेऊन धांविन्नला ॥१००॥
अवघी तिख्याची लखलखित । अग्निप्राय धगधगित ।
सुवर्णबंदी रत्‍नांकित । गदा शोभत अति शोभा ॥१॥
शत्रुशोणितें न्हाणिली । अरिशिरःकमळें पै पूजिली ।
रिपुमांसें तृप्त केली । गदा घेतली साटोपे ॥२॥
करावया भूतांची बोहरी । प्रळयाग्नि जैशापरी ।
तैसी गदा घेवोनि करी । वानरांवरी धाविन्नला ॥३॥
येता देखोनि वानरांत । ऋषभ वीर वरुणसुत ।
उडोनियां संमुख येत । करावया घात महापार्श्वा ॥४॥

ऋषभस्तु समुत्पत्य वानरो वरुणात्मजः ।
महापार्श्व समासाद्य तस्थौ तस्याग्रतो बली ॥३८॥
तं पुरस्तात्स्थितं दृष्ट्वा वानरं पर्वतोपमम् ।
आजघानोरसि क्रुद्धो गदया वज्रकल्पया ॥३९॥
स तथाभिहतस्तेन गद्या वानरर्षभः ।
भिन्नवक्षाः समाधूतः सुस्राव रुधिरं बहु ॥४०॥

महापार्श्वाचा वध :

येता देखोन महापार्श्वासी । ऋषभवीर अति वेगेंसीं ।
उडोनि आला तयापासी । संग्रामासी साटोपे ॥५॥
जैसा पर्वताचा कडा । तैसा वानर आला पुढा ।
महापार्श्व कोपला गाढा । उठावला गाढा गदेसीं ॥६॥
गदा घेवोनि कोपेंकरी । ऋषभ हाणितला उरावरी ।
घाये पडिला धरेवरी । उभाची रुधिरीं न्हाणिला ॥७॥
घायासरसा विसंज्ञ । ऋषभ पडला अचेतन ।
चिरकाळें स्वये आपण । संज्ञा संपूर्ण पावला ॥८॥

स संप्राप्य चिरात्संज्ञामृषभो वानरर्षभः ।
क्रुद्धो विस्फुरमाणौष्ठो महापार्श्वमवेक्षत ॥४१॥
गृहीत्वा तां गदां वीरो व्याविध्य च पुनः पुनः ।
मत्तानीकं महापार्श्वं जघान रणमूर्धनि ॥४२॥
स तया गदया भिन्नो विशीर्णदशनेक्षणः ।
निपपात महापार्श्वो वज्राहत इवाचलः ॥४३॥
तस्मिन्हते भ्नातरि रावणस्य तन्नैर्ऋतानां बलमर्णवाभम् ।
मुक्तायुधं केवलजीवितार्थी दुद्राव भिन्नार्णवसन्निकाशम् ॥४४॥

संज्ञा लाहोनि वानर । करावया रणप्रत्युपकार ।
दृढ करोनिया विचार । केला चमत्कार तो ऐका ॥९॥
ऋषभ वीर रणमर्गळा । पुच्छे कंठी लावोनि कळा ।
गदा हिरोनियां तत्काळा । गेला निराळा उडोनी ॥११०॥
वानर गदा हिरोनि नेतां । विस्मयो महापार्श्वचित्ता ।
आणिक शस्त्र घ्यावें हाता । तंव गदाघाता ठोकिलें ॥११॥
कोपे कपि कांपे थरथरां । दांत खावोनि करकरा ।
गदा भोवंडोनि गरगरा । निशाचरा ठोकिलें ॥१२॥
गदाघात वाजता शिरी । दांत खावोनि चकचूरी ।
नेत्र पडिले बाहेरी । धरेवरी पडियेला ॥१३॥
महापार्श्वे रणव्युत्पत्ती । गदा पडताळिली हाती ।
त्याची भोंवली त्याभोंवती । पडिला क्षिती घाये एके ॥१४॥
शंबराचे शिर छेदून । जैसे का करी प्रद्युम्न ।
तैसेंचि महापार्श्वा जाण । रणमर्दन केले ऋषभें ॥१५॥
रावणाचा बंधु जाण । महापार्श्व प्रिय प्रधान ।
त्याचा रणी घेतला प्राण । पलायमान राक्षस ॥१६॥
प्रळयीं खवळल्या सागर । त्याचे जेंवी नावरे नीर ।
तेंवी निमाल्या पांचही वीर । राक्षसभार भंगला ॥१७॥
देवांतक महोदर । नरांतक त्रिशिरा वीर ।
महापार्श्व मारिला शूर । राक्षस समग्र पळाले ॥१८॥
चौघीं मारिले पांचही जण । अतिकाय करील निर्वाण ।
एका जनार्दना शरण । तेंही निरुपण अवधारा ॥१९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
देवांतकत्रिशिरादिवधो नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥
ओंव्या ॥११९॥ श्लोक ॥४४॥ एवं ॥१६३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग