॥ श्रीएकनाथमहाराजकृत
66.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सहासष्टावा ॥
बिभीषणाला राज्याभिषेक
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
जो सकळलोकघातक । सकळधर्मावरोधक ।
सत्कर्मविच्छेदक । तो रामे दशमुख निवटिला ॥१॥
शेती केली वाफधांवणी । जेंवी कृषीवल सुखावे मनी ।
तेंवी निवटून दशाननी । रघुनंदनी उल्लास ॥२॥
दीक्षित याग आचरती । दुःसाध्य यज्ञ संपादिती ।
साधोनि केली पूर्णाहुती । पावती विश्रांती निजसुखें ॥३॥
तेंवी रामे करोनि ख्याती । सेतु बांधोनि अपांपती ।
राक्षसांची करोनि शांती । लंकापती निवटिला ॥४॥
श्रीराम याज्ञिक चोखत । रणभूमि तेचि यज्ञवाट ।
काळानळ अति श्रेष्ठ । हव्यवाट आव्हानिला ॥५॥
सुग्रीवादि हनुमंत । ऋत्विज सेनापति समस्त ।
बिभीषण साक्षी तेथ । कर्म सांगत चुकलें ते ॥६॥
परिसमूहन सडा होत । परिस्तरण शस्त्रे अद्भुत ।
पर्युक्षण अस्त्रांचे तेथ । अति आरक्त रुधिराचा ॥७॥
श्रीराम नेटाका यजमान । हविर्द्रव्य राक्षससैन्य ।
स्रुवा बाणाचा सुलक्षण । देत अवदान काळानळी ॥८॥
तेथे येंत्राचे मंत्रघोष । सारी मारी पाडी देख ।
न मम म्हणता रघुकुळटिळक । काळानळ देख स्वीकारी ॥९॥
हवीं होमिलें सकळिक । पूर्णाहतीसीं दशमुख ।
रामे घालोनि सकळिक । याग देख संपविला ॥१०॥
संपवोनि रणयज्ञ । हातींचें ठेविले चाप बाण ।
तेंची अवभृथ झाले पूर्ण । राम विचक्षण याज्ञिक ॥११॥
नंतर श्रीराम ब्राह्मणांना दक्षिणा देतात :
ऋत्विजांसी निजदक्षिणा । देता उल्लास रघुनंदना ।
एका सायुज्य दिधले जाणा । विदेहत्वदान एकांसी ॥१२॥
एका दिधले अनंत सुख । एका दिधले कीर्तन देख ।
नामे गर्जता हरिख । ब्रह्मांडलोक उद्धरती ॥१३॥
ऐसे करोनि दक्षिणादान । रामे संपविला रणयज्ञ ।
ऋत्विज करोनिया प्रसन्न । श्रेयः संपादन विजयश्री ॥१४॥
कोणी करिती अश्वमेध । एक करिती नरमेध ।
रामे केला राक्षसमेध । अति विशुद्ध याज्ञिक ॥१५॥
ततो विमुक्तं सशरं शरासनम्
महेंद्रदत्तं कवचं रथं च ।
विमुच्यं रोपं रिपुनिग्रहे कृतम्
शशीव सौम्यत्वमुपागमत्पुनः ॥१॥
परशुरामांकडून रावणवधासाठीं मिळालेला क्रोध रामांनी शांत केला :
निवटोनियां लंकापती । रणामाजी रणख्याती ।
करोनि हातींचे चाप रघुपती । ठेविले क्षिती बाणेंसी ॥१६॥
परशुरामदत्त क्रोध । करावया रावणवध ।
झाला होता उद्बुद्ध । तोही निजानंद पावला ॥१७॥
अग्नि पेटविल्या पाहे । हविर्द्रव्य निःशेष खाये ।
सवेंचि उपरत होवोनि राहे । लीन होये निजरुपीं ॥१८॥
तेंवी श्रीरामाचा क्रोध । करोनिया रावणाचा वध ।
कार्य साधिले अगाध । अति आल्हाद पावला ॥१९॥
पुढे कांही कार्य स्थिती । पुसावया स्वामीप्रती ।
विनवूं पाहे विनीतवृत्ती । तंव निजचित्ती आठवलें ॥२०॥
रामे पाहता कृपादृष्टी । ब्रह्मा स्रजी ब्रह्मांडकोटी ।
जयाची विक्षेपभृकुटी । सकळ सृष्टी संहारी ॥२१॥
त्या श्रीरामाचे कार्य जाण । म्या साधिले आपण ।
ऐसी श्लाघ्यता करील कोण । श्रीरघुनंदनकृतकार्या ॥२२॥
ऐसे विचारोनि चित्ती । लागिन्नला निजवृत्ती ।
सांडोनि देहाहंकृती । क्रोध निजशांती पावला ॥२३॥
इंद्रे पाठविला रथा । त्यास पूर्वीच रघुनाथ ।
आरुढला नाही तेथ । रावणघात पै करिता ॥२४॥
क्रोध नमूनि रघुपती । स्वये पावला निजशांती ।
तेणे काळे श्रीराममूर्ती । शोभा अतिदीप्तीं शोभत ॥२५॥
शोभा अति देदीप्यमान । प्रभा नव्हे ते अत्यंत उष्ण ।
अति शीतळ नव्हे जाण । विलक्षण प्रकाश ॥२६॥
त्या प्रकाशातें देखता । अति उल्लास वाटे चित्ता ।
देहाचे भान सर्वथा । आठवितां नाठवे ॥२७॥
प्रबोधचंद्र रघुपती । नित्यउदय त्रिजगती ।
उदय अस्त निश्चिती । अस्त पावती निजतेजें ॥२८॥
तं रावणवधं दृष्ट्वा देवगंधर्वदानवाः ।
जग्मुः स्वैस्वैर्विमानैस्तु कपयंतः शुभाः कथा ॥२॥
अनुरागं च वीर्य च लक्ष्मणस्य च धीमतः ।
पातिव्रत्यं च सीताया हनूमंतः पराक्रमम् ॥३॥
रावणस्य वधं घोरं रामस्य च पराक्रमम् ।
सुयुद्धं वानराणां तु सुग्रीवस्य च मंत्रितम् ॥४॥
ऐसिया रामाते देखून । भ्याला आतुर्बळी दशानन ।
ज्यसी कांपे त्रिभुवन । तो क्षणे रामे निवटिला ॥२९॥
श्रीरामांचा विमानस्थ देवांकडून जयजयकार व रामकथासंकीर्तन :
तेणे आनंदे सुरवर । विमानस्थ खेचर ।
अवघे करिती जयजयकार । हर्षे निर्भर आकाशी ॥३०॥
देव दानव गंधर्व । अप्सरादि गणसमुदाव ।
यक्षकिन्नरादि सर्व । महदाश्चर्य मानिती ॥३१॥
सकळमंगलदायक । सकळकलिमलविध्वंसक ।
श्रीरामकथा अलोकिक । वर्णिती देख अति प्रीती ॥३२॥
अतिघोरकर्मा रावण । त्रैलोक्या अजेय पुर्ण ।
तो वधिला न लागता क्षण । विंधोन बाण श्रीरामे ॥३३॥
तेथे वाळीची गोष्टी कायसी । कोण गणी हो कबंधासी ।
खर दूषण त्रिशिरा यांसी । वधितां त्यासी वेळु न लगे ॥३४॥
महाबाहु कुंभकर्ण । विशाळरुप अति दारुण ।
खातां न पुरे त्रिभुवन । वधिला तो बाण विंधोनी ॥३५॥
बंदी घातली सुरमांदी । बंधूसह वधिला दुर्बद्धी ।
देव सोडविले बंदी । किर्ति अगाध श्रीरामी ॥३६॥
तैसाचि सौमित्र निजसखा । श्रीराम सेवेलागीं देखा ।
तुच्छ केले शरीरसुखा । आहार तो निःशेख वर्जिला ॥३७॥
चौदा वर्षे निराहारी । चौदा वर्षे ब्रह्मचारी ।
अति नैष्ठिकव्रतधारी । प्रीति थोरी रामसेवे ॥३८॥
अनिवार प्रेमथिले । निमेष रामसेवे न टळे ।
तेणे भजनें सामर्थ्य आले । दुष्टा वधिले इंद्रजिता ॥३९॥
चौदा वेळा सुरपती । बांधोनि आणिला निमेषगतीं ।
त्याची क्षणार्धे केली शांती । श्रीरामभक्तिप्रतापें ॥४०॥
तैसाचि सुग्रीव कपिपती । लक्ष्मणे स्थापिला अति प्रीती ।
तेणे जीवित्व रघुपती । अर्पिता चित्ती संतोष ॥४१॥
जेणे वीर रावणासारिखा । खेदक्षीण केला देखा ।
खेदक्षीण केला देखा । आतुर्बळियाचा आवाकां । छेदी नाका कुंभकर्णाच्या ॥४२॥
तशीच हनुमंताची स्तुती :
सकळांहूनि विचित्र । हनुमंतांचें चरित्र ।
अमल कीर्ति अति सुंदर । जेणे पवित्र त्रिलोक ॥४३॥
जेणे गांजिलें दशवक्त्रा । लंकेमाजी केले क्षत्रा ।
आश्वासिली सीता सुंदरा । युक्ति कपींद्रा अनिवारा ॥४४॥
न लागता निमेषमात्र । एकलेनि वीरे सत्वर ।
शिळीं बुजोनियां सागर । सैन्य परपार पावविलें ॥४५॥
आणोनियां द्रोणाद्री । वांचविला सौमित्री ।
अहिरावणाची करोनि बोहरी । स्वामी झडकरी सोडविला ॥४६॥
अगाध हनुमंताची कीर्ती । जेणे पावन त्रिजगती ।
तैसेचि सकळ जुत्पती । अगाध कीर्ती श्रीरामी ॥४७॥
युद्ध करिता समरांगणीं । शिरें दुधड होती रणी ।
पुच्छे बांधितां वेंटाळूनी । सवेचि रणी मिसळती ॥४८॥
सीता माउली पतिव्रता । अवतार धरी सुरकार्यार्था ।
प्रबल छळितां लंकानाथा । नाही चित्ता विक्षेप ॥४९॥
श्रीरामवियोगें व्रतस्थ । फळ मूळ जळ समस्त ।
सर्वथा नातळे चित्त । सावचित्त रामभजनीं ॥५०॥
श्रवणीं नित्य रामकथा । एकरुप होता श्रोता वक्ता ।
सबाह्य स्वानंदसुखावस्था । श्रवण करिता रामाचे ॥५१॥
वाचेंसी नित्य रामगुण । वर्णितांचि आनंद पूर्ण ।
राक्षसीसी समाधान । देहाचे भान विसरल्या ॥५२॥
जानकीपासीं राखण असता । विसरल्या निजक्रूरता ।
श्रीरामप्रेमें सदा डुल्लतां । समाधिअवस्था राक्षसींसी ॥५३॥
जानकीचे निजसंगती । तृणादिसकळ वनस्पती ।
आदिकरोनि पाषाणजाती । राम जपती अनिमेष ॥५४॥
जानकीचेनि धर्मे तेथे । आन न दिसे सर्वार्थें ।
राम भासे जेथे तेथे । निजरुपें पाहतांचि ॥५५॥
ऐसी एकांएकांची ख्याती । नामे पावन त्रिजगती ।
एवढी रामभक्ताची कीर्ती । तो रघुपती केंवी वर्णवे ॥५६॥
ऐसी श्रीरामाची गुणकीर्ती । आणि रामसेवकांची ख्याती ।
स्वर्गी वर्णीत सुरपती । निजधामाप्रती स्वये गेले ॥५७॥
इंद्रसारथी मातलीकडून रामांस नमन व तो स्वर्गास जाण्याची आज्ञा विचारतो :
इंद्रसारथी विचक्षण । सुवर्णबंदी देदीप्यमान ।
रथाखालीं उतरोन । श्रीरघुनंदन नमियेला ॥५८॥
प्रांजळि होऊन विनवित । नमोनिया रघुनाथ ।
होवोनियां अति विनीत । आज्ञा पुसत स्वर्गगमना ॥५९॥
परिसोनिया रघुनंदन । अत्यादरें संतोषोन ।
गंभीर गिरा प्रसन्नवदन । मधुर वचन अनुवादे ॥६०॥
काय कृपेसीं आले कोंभ । की अमृता निघाली जीभ ।
लावण्याचें निजवालभ । तैसी शोभा शब्दांची ॥६१॥
राघवेणाभ्यनुज्ञाते मातलिः शक्रसारथिः ।
दिव्यं तु रथमास्थाय दिवमेवाभ्यपात ह ॥५॥
रामांकडून मातलीची पूजा व इंद्राला निरोप :
अत्यादरें रघुपती । पूजोनियां शक्रसारथी ।
इंद्राप्रति विनंती । अति प्रीती सांगत ॥६२॥
तू लोकपाळांचा राजा । तुझेनि सुखी विश्व प्रजा ।
निवटावया राक्षसराजा । संभाळा माझा तुंवा केला ॥६३॥
तुवा पाठविला रथ । शस्त्रास्त्रांसीं समवेत ।
तेणे बळे लंकानाथ । निमेषार्धांत निवटिला ॥६४॥
तुम्ही अनुग्रह कराल ज्यासी । तो रंकही राज्यपदासीं ।
सुखे चढे अनायासीं । सकळ भोगांसी भोगित ॥६५॥
अनुग्रहाचें बळ दारुण । तेणे निवटिला दशानन ।
काय तुमचे व्हावे उत्तीर्ण । म्हणोनि लोटांगण मौनेंचि ॥६६॥
ऐसे सांगता मातलीसी । येरु विस्मित मानसी ।
राम स्तवितो इंद्रासी । जो या विश्वासी जीवन ॥६७॥
ज्याची विक्षेपभ्रुकुटी । तळा आणि सकळ सृष्टी ।
तो इंद्राचा उपकार पोटी । कृपेसाठी वाहतसे ॥६८॥
अत्यादरे मातलीसी । वस्त्रे भूषणे देवोनि त्यासी ।
बोळविता अति प्रीतींसीं । येरें साष्टांगेंसीं नमियेला ॥६९॥
परिष्वज्य च सुग्रीवं लक्ष्मणेनाभिनंदितः ।
पूज्यमानो हरिगणैराजगाम सुरालयम् ॥६॥
मातली श्रीरामांचा व सर्व लहानथोर वानरगणांचा निरोप घेतो :
करोनिया प्रदक्षिणा । मातलि लागला रामचरणा ।
तैसेंचि नमिलें लक्ष्मणा । सुग्रीवही जाणा नमियेला ॥७०॥
रावणाचे मुखें जाण । सर्वगत रघुनंदन ।
जाणोनिया संपूर्ण । नमी वानरगण रामरुपें ॥७१॥
हनुमान आदि समग्र । जुत्पती जे का लहानथोर ।
नमूनियां वेगवत्तर । जयजयकार पै केला ॥७२॥
नमन करोनि सकळांसी । आरुढोनियां रथासी ।
हर्षे गर्जत नामेंसीं । स्वधामासी तो गेला ॥७३॥
इंद्र होवोनि शरणागत । श्रीरामा पाठविला रथ ।
ते देखोनि अत्यद्भुत । आश्चर्य मानित सकळिक ॥७४॥
निवटिलिया रावण । खवळोनि वानरगण ।
विध्वंसावें लंकाभुवन । तंव रामशासन दुर्धर ॥७५॥
शिष्टाईचे वेळी अंगदे येथे । मंडपातें आणिले होते ।
तो परतोनि मागुतें । श्रीरामे तेथे पाठविला ॥७६॥
येणेचि भयें वानरगण । न पाहती लंकाभुवन ।
तंव देखोनिया बिभीषण । रघुनंदन बोलत ॥७७॥
ते श्रीरामाज्ञा असता । वानरातें अनवाळी करिता ।
क्रोधे झालिया दंडिता । मग राकिता पै कैंचा ॥७८॥
श्रीराम लक्ष्मणाला बिभीषणास अभिषेक करण्याची आज्ञा देतात :
ऐके बापा लक्ष्मणा । दुष्टा निर्दाळिले रावणा ।
आता निजभक्ता बिभीषणा । लंकाभुवना अभिषेकीं ॥७९॥
जेणे त्रासिले महर्षी । बंदी घातले सुरवरांसी ।
त्या वधिले रावणासी । आता बिभीषणासी अभिषेकीं ॥८०॥
जेणे हरिले जानकीसी । आणि मारिले जटायूसी ।
त्या वधिले लंकेशासी । बिभीषणासी अभिषेकीं ॥८१॥
हित सांगता प्रीतीसी । लाता हाणितल्या बंधूसी ।
त्या निवटिले रावणासी । बिभीषणासी अभिषकीं ॥८२॥
सौमित्रिं सत्वसंपन्नं रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
बीभषिणममुं सौम्य लंकायामभिषेचय ॥७॥
अनुरक्तं च भक्तं च तथा पूर्वोपकारिणम् ।
एष मे परमः कामो यदहं रावणानुजम् ॥८॥
लंकायां सौम्य पश्येयमभिषिक्तं बिभीषणम् ॥९॥
बिभीषणाला राज्याभिषेक करणे हे आपले व्रताचरण असे राम सांगतात :
सौमित्रा बंधु लक्ष्मणा । सत्वसंपन्न बिभीषणा ।
करावोनियां मंगलस्नाना । सिंहासना अभिषेकीं ॥८३॥
आमचे मित्रत्वालागीं जाण । स्वकुळ निर्दाळिलें आपण ।
महामोहाचें आयतन । तो अहंरावण मारविला ॥८४॥
आमचे भक्तीलागीं वहिले । जेणे सर्वस्व अर्पिले आपुलें ।
तया बिभीषणा पहिलें । अभिषेकिले पाहिजे ॥८५॥
हेंचि आम्हा निजव्रत । हेचि परम आचरित ।
हेंचि अनुष्ठान समस्त । जे शरणागत स्थापावा ॥८६॥
हाचि आम्हा पुरुषार्थ । हाचि आम्हा इत्यर्थ ।
हाचि आम्हा सिद्ध्यर्थ । जे शरणागत स्थापावा ॥८७॥
हाचि आम्हा परमार्थ । हाचि आम्हा भावार्थ ।
येणेंचि आमचा सत्यार्थ । जे शरणागत स्थापावा ॥८८॥
हा काळवरी नवस । नवसिले होते बहुवस ।
ते उजवावे सावकाश । बिभीषणा स्थापनी ॥८९॥
माझ्या डोळियांची धणी । सौमित्रा पुरवीं झडकरोनी ।
बिभीषणा अभिषेचूनी । आरुढ सिंहासनी मज दावी ॥९०॥
सिंहासनी शरणागता । आरुढला न देखता ।
मज होतसे परमावस्था । बोली सर्वथा न बोलवे ॥९१॥
ऐसे बोलता रघुनाथ । अभिषेकालागीं त्वरित ।
सौमित्र सिद्ध झाला तेथ । हर्षयुक्त स्वानंदे ॥९२॥
श्रीराम स्वतः अभिषेकाला येणार नाहीत म्हणून बिभीषणाला दुःख :
ते देखोनि बिभीषण । झाला अत्यंत उद्विग्न ।
श्रीराम न येवोनि आपण । सांगे अभिषिंचन सौमित्रा ॥९३॥
या शब्दाचा कवण हेत । म्हणोनि झाला चिंताकांत ।
अभिषेका न ये श्रीरघुनाथ । म्हणोनि स्फुंदत अति दुःखी ॥९४॥
कोणासी पुसू हा विचार । कोण जाणेल अंतर ।
क्षोभावया रघुवीर । काय विचार पै झाला ॥९५॥
सांडूनियां रघुनंदन । सर्वथा राज्य न करी जाण ।
न पाहे मी लंकाभुवन । सुख कोण अभिषेका ॥९६॥
म्हणोनिया म्लानवदन । अत्यंत झाला बिभीषण ।
ते देखोनिया वायुनंदन । पुसे आपण अति प्रीती ॥९७॥
दुःखित बिभीषणाला मारुतीने त्याची चिंता विचारल्यावरुन बिभीषण कारण सांगतो :
बिभीषणा सर्वज्ञा । समय आला अभिषिंचना ।
आणि दिसतोसी म्लानवदना । ही विवंचना लक्षेना ॥९८॥
ऐकोनिया त्याचे वचन । येरें घातले लोटांगण ।
सद्गुरुवीण अंतरज्ञान । जाणता आन असेना ॥९९॥
ऐके स्वामी वायुनंदना । रामे आज्ञापिले लक्ष्मणा ।
जे अभिषेकावें बिभीषणा । तेणे मना अति चिंता ॥१००॥
जरी प्रीति होती चित्ती । तरी येवोनि रघुपती ।
अभिषेकीचना स्वहस्तीं । तेणे चित्ती अति चिंता ॥१॥
ऐसे ऐकोनि हनुमंता । अति विस्मय झाला चित्ता ।
पुसावया रघुनाथा । होय विचारिता मारुती ॥२॥
अभिषेकालागीं जाण । त्वरा करिता लक्ष्मण ।
म्लान देखोनि बिभीषण । श्रीरघुनंदन पूसत ॥३॥
सौमित्रा विलंब कायसा येथ । वेगी अभिषेकी शरणागत ।
ऐकोनिया हनुमंत । काय बोलत ते ऐका ॥४॥
बिभीषणाचे मनोगत मारुतीने अत्यंत परखड शब्दांत
रामांना सांगून स्वतः राज्याभिषेक करण्यास सांगितले :
जो वोळगणा सर्वांगाचा । जो लाडका श्रीरामाचा ।
राम आज्ञाधारक ज्याचा । ऐके त्याचा वचनार्थ ॥५॥
भजनाचेनि पडिभरें । सायुज्य जेथे न सरे ।
तो हनुमान अति निष्ठुरें । बोलत उत्तरें रामासीं ॥६॥
राज्याभिलाष तुझे पोटी । आणि सौमित्रासी उठाउठी ।
अभिषेकाची सांगसी गोष्टी । ते न मने सृष्टी श्रीरामा ॥७॥
अंतरी लोभाचें ठाणें । बाह्य विरक्ती मिरवणें ।
लौकिकासी जोगावणे । समर्थ करणे कळेना ॥८॥
राज्यभिलाष बिभीषणा । सर्वथा नाही रघुनंदना ।
तू आरुढोनि सिंहासना । लंकाभुवना अंगीकारीं ॥९॥
अनुसरोनि रामासी । जो राज्यातें अभिलाषीं ।
तेणे बुडविलें धर्मासी । अधःपातासी स्वये गेला ॥११०॥
यालागी गा रघुनाथा । लंका अंगीकारोनि आता ।
चरणी स्थापीं शरणागता । विचार अन्यथा न करावा ॥११॥
म्हणोनि घातले लोटांगण । अंगीकारीं सिंहासन ।
अंगीकारीं राजभुवन । विचार आन न करावा ॥१२॥
तू का रागावलास ? श्रीरामाचा प्रश्न :
ऐसे विनविता हनुमंता । आश्चर्य झाले रघुनाथा ।
सविस्तर वृत्तांत न कळतां । कोण्या अर्था कोपसी ॥१३॥
केंवी माझा लोभ कळला । कोण्या अर्थी कोप आला ।
बिभीषण अव्हेरिला । या बोला मज न साहवे ॥१४॥
प्राण जाईल जावो सुखे । परी बिभीषण असावा सुखे ।
म्हणोनि नवसियेलें अनेके । मी निजहरिखें नवसित ॥१५॥
बिभीषणा सिंहासनी । कैं देखेन राजधानीं ।
ऐसे नवसीं अनुदिनी । प्रतिक्षणीं चिंतित ॥१६॥
ते हनुमंता आजि समस्त । माझे पुरले मनोरथ ।
अभिषेकिता शरणागत । हर्षित चित्त पै माझे ॥१७॥
वाचादत्तं मनोदत्तं धारादत्तं न दीयते ।
अरण्ये निर्ज्ले देशे दाता भवति सूकरः ॥१०॥
वाग्दानाचे लक्षण, असत्यवाणीचे दुष्परिणाम श्रीराम मारुतीला सांगतात :
एक करिती धारादन । एक करिती मनोदान ।
एक करिती वाग्दान । ऐक लक्षण तयाचे ॥१८॥
मनें मर्मे आणि वचनें । दिधले दान नेदीं म्हणे ।
सुकर होवोनि वसवी वने । फळजळाविणे पै देखा ॥१९॥
आपण तरी प्रत्यक्षते । प्राप्त न होता लंकेतें ।
अभिषेकिले बिभीषणाते । त्या वचनास केंवी सांडो ॥१२०॥
ज्याची प्रतिज्ञा लटकी होये । धरा त्याचा भार न साहे ।
विजयश्री केंवी लाहे । निंद्य होय जगामाजी ॥२१॥
अनृतवादी जे जन । अपत्याचे जीवन ।
विजयश्री आपण । जाणे सांडून तेणे पापें ॥२२॥
अनृतवादियाचे देही । तेज सर्वथा नाही ।
कळाहीन सदा पाही । जग तेंही निंदित ॥२३॥
अनृतवादियाचा प्राण । भाररुप वाहे पवन ।
जीवे जीता प्रेतचिन्ह । भासे संपूर्ण जगासी ॥२४॥
त्याचे जे का हृदयाकाश । तमें वसविले सावकाश ।
परमार्थाचें घर ओस । झाले निःशेष सर्वथा ॥२५॥
सत्यप्रतिज्ञेचे ने नर । ते जै सांडिती उत्तर ।
तै स्वर्गस्थ त्यांचे पितर । ते सत्वर पै खचती ॥२६॥
पापाचें ते अधिष्ठान । नरकाचे ते निजभवन ।
तेथूनि त्यांसी नाही निर्गमन । स्वयेंचि जाण निजनरक ॥२७॥
स्वतः लंकेत न जाण्याचे कारण श्रीराम सांगतात :
यालागी वायुनंदन । सुर्यवंशी राजे जाण ।
एकनिष्ठ सत्यप्रतिज्ञ । धर्मभूषण वंशासीं ॥२८॥
ते वंशीचा दाशरथी । माझे नाम रघुपती ।
तो जै सांडी वचनोक्ती । तै अपकीर्ती जोडिली ॥२९॥
तुम्हासी संदेह निजचित्तीं । तोही कळला निश्चिती ।
अभिषेका न येचि रघुपती । ऊर्मिलापती पाठवितो ॥१३०॥
हाचि सकळांचा भावो । त्याचा ऐका अभिप्रावो ।
लंका दान दिधले पहा वो । सर्वथा जावों नये तयांत ॥३१॥
दाता निघे जै दानांत । त्याचे श्रेय गेले वाताहत ।
नव्हे स्वार्थ ना परमार्थ । वृथा जीवित लौकिकी ॥३२॥
यालागी श्रीरघुनंदन । लंकेमाजी न ये जाण ।
बिभीषणाचे अभिषिंचन । केले दर्शन होतांचि ॥३३॥
तरी अनमान न करिता सर्वांनी मिळून बिभीषणाला अभिषेक करावा :
आता यावे अभिषिंदना । तै बाध आला प्रथमवचना ।
आन सर्वथा न करा जाणा । लंकाभुवना न पाहे ॥३४॥
जीवाचा जीव तू कपिनायाका । सीताशुद्धि आणिल्या देखा ।
वाळूची करोनि दाविली लंका । वोल देखा गुंतली ते ॥३५॥
ज्यासी वोल गुंतली राहे । वृथा त्याचे जिणें काये ।
यश कोठेंचि न लाहे । निंद्य होहे लौकिकी ॥३६॥
नजिभक्ताचें क्रीडाभुवन । सर्वथा गुंतो नेदी जाण ।
वोल सोडवावयालागून । स्वये लक्ष्मण आज्ञापिला ॥३७॥
तंव विपरीत झाले तेथ । न कळतांहि हा इत्यर्थ ।
क्षोभलासी तू हनुमंत । शरणागतही क्षोभला ॥३८॥
सर्वांच्या गैरसमजामुळे त्यांची राम क्षमा मागतात :
सकळा माझे लोटांगण । क्षमा करावी आपण ।
सकळिकीं लंके जाऊन । बिभीषण अभिषेकावा ॥३९॥
अकोनियां ते वचन । तटस्थ झाले सकळ जन ।
अगाध श्रीरामाचे ज्ञान । अनवच्छिन्न निर्लोभ ॥१४०॥
तथेत्युक्त्वा सुसंहृष्टः सौवर्ण घटमाददे ।
कुंभेन तेन सौमित्रिभ्यषिंचद्विभीषणम् ॥११॥
रामाज्ञेने अभिषेकाची पूर्तता :
ऐकोनि श्रीरामाचे वचन । अति आल्हादे लक्ष्मण ।
मस्त्कांजलि करोनि नमन । अभीषिंचन आरभी ॥४१॥
आज्ञापितां हनुमंता । अति उल्लास झाला चित्ता ।
सामग्री अति आदरता । होय करिता स्वानंदे ॥४२॥
नगर शृंगारिलें कोडे । गुढिया मखरे कुंकुमसडे ।
मुक्ताफळांचे सुहाडे । चौक निवाडे शोभती ॥४३॥
सप्त मृत्तिका सत्वर । सप्त सागरींचें नीर ।
अष्ट पल्लव परिकर । अत्यादरें आणिले ॥४४॥
प्रेमाथिला सुवर्णकुंभ । उदकें भरुनी स्वयंभव ।
तेचि सहस्रधारा प्रेमवालभ । अति सुलभ अभिषेक ॥४५॥
सद्विवेक परिकर । तेंचि भद्रपीठ औंदुबर ।
साधूनिया विरक्तिव्याघ्र । चर्म सनखाग्र अनाहत पै ॥४६॥
गादी बोधाची सुलक्षण । दैल विरज शोभायमान ।
आरुढावया बिभीषण । सिंहासनसामग्री ॥४७॥
सौमित्र येवोनि आपण । श्रीरामकृपेचें सिंचन जाण ।
अभिषेकोनि बिभीषण । सिंहासनी पूर्ण बैसविला ॥४८॥
चिद्रत्नांचे अलंकार । ते लेवविले परिकर ।
चिदंबरे मनोहर । वस्त्रे परिकर शोभती ॥४९॥
अनन्यप्रीतीचीं सुमनें । गुफोनियां अनुसंधानें ।
शृगारिलें सुमित्रानंदनें । शरणागता शरण्य कृआळू ॥१५०॥
सोहंभावाचे नीराजन । कुरवंडी बिभीषण ।
अति प्रीती सुमित्रानंदन । ओंवळून सांडित ॥५१॥
तेणे काळे बिभीषण । भद्रीं अति विराजमान ।
देखोनिया वायुनंदन । करी निंबलोण सर्वस्वें ॥५२॥
दीपावळी नीराजने । ओंवाळिती जीवप्राणें ।
देती किराण रामनामे ॥५३॥
अनन्यगतीचे वाग्जल्प । वर्णिता श्रीरामप्रताप ।
नामे गर्जती अमूप । सत्यसंकल्प श्रीराम ॥५४॥
देहत्रिकूटनिवासी । वधूनि अहंरावणासी ।
मुक्त करोनि लंकेसी । शरणागतासी स्थापिले ॥५५॥
राक्षसमंडळीमाझारी । बिभीषण सहपरिवारी ।
शोभता झाला निजगजरीं । कृपेंकरी रामाचे ॥५६॥
कृपामूर्ती श्रीरामांमुळे शरणागत सिंहासनस्थ झाला :
राम कृपेचे जीवन । राम कृपेचे अधिष्ठान ।
रामकृपा सनातन । बिभीषण शोभत ॥५७॥
श्रीराम कृपेचा पुतळा । श्रीराम कृपेचा कोंवळा ।
श्रीराम कृपेचा वहिला । निजराज्य पावला बिभीषण ॥५८॥
अति प्रीती शरण आला । अति प्रीती आश्वासिला ।
स्वराज्य देखोनि वहिला । स्वपदीं स्थापिला निजभक्त ॥५९॥
नगरनागरिका समस्ता । अति प्रीती राक्षसवनितां ।
पुर्णकुंभ जळभरिता । दधि मधु अक्षता सुमन दुर्वा ॥१६०॥
लाजा घेवोनि अति प्रीती । राक्षसवनिता तेथे येती ।
श्रीरामाची अमल कीर्ती । ओंवाळिती बिभीषण ॥६१॥
एका जनार्दना शरण । शरणागत बिभीषण ।
स्वराज्यीं स्थापूनियां पूर्ण । कीर्ती पावन तिही लोकी ॥६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
बिभीषणराज्यभिषेचनं नाम षट्षष्टितमोऽध्यायः ॥६६॥
ओंव्या ॥१६२॥ श्लोक ॥११॥ एवं ॥१७३॥
