वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ऐका चौवाचे विवरण ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076445 · अभंग क्र. ३५०

350.
ऐका चौवाचे विवरण ।
स्थान मान कळा जाण ।
देह अवस्था निदान ।
संकळित कथन ऐकावे ॥१॥
कोण स्वर कोण वाचा ।
अभिमानी ह्या देहाचा ।
शक्तिमात्र स्थान याचा ।
अभिप्राय गुणाचा बोलिजेल ॥२॥
प्रणवाचा कोण चरण ।
कोण वेद तेथीचा जाण ।
हे स्वानुभवे जयासी ज्ञान ।
स्वतः तो आपण परमात्मा ॥३॥
हे अनुष्ठान कथन ।
पंचीकरणामाजी विवरण ।
आशंका नुपजे ऐसियाने ।
करोनी जाण ठेविले ॥४॥
त्याचे नाम ज्ञानप्रकाश ।
जो का ब्रह्मविद्येचा सौरस ।
आत्मत्वाचा ज्ञानघोष ।
परमहंस दीक्षेचा मुगुटमणी ॥५॥
त्यामाजी कार्यकारण ।
काढिले वाचाविवरण ।
ते ऐकावी स्थानमाने ।
संकळित मार्गे ॥६॥
(१) जेथे महाकारणदेह ।
तेते तुर्यावस्था होय ।
अभिमानी प्रत्यगात्मा पाहे ।
भोग लाहे स्वानंदाचा ॥७॥
स्थान ते मूर्धनी जाण ।
ज्ञान शक्ति जाणिजे खूण ।
शुद्ध सात्विक तो गुण ।
मात्रा जाण ओंकाराची ॥८॥
चौथा चरण प्रणवाचा ।
उद्भव अथर्वण वेदाचा ।
प्रकाश षोडश कलेचा ।
बारा जनीचा रहिवासू ॥९॥
तेथेचि हे जाण परावाचा ।
जेथे उल्लेख उन्मेषाचा ।
वोघ चाले सत्रावीचा ।
ब्रह्मानंद सुखाचा रहिवासू ॥१०॥
स्थान ते नाभिकमळ ।
अंतःकरण ते निर्मळ ।
हे परेचे निजमंदिरस्थळ ।
जाणती कुशळ अनुभवी ॥११॥
(२) पश्यंतीचा जेथे रहिवास ।
तेते अष्टदळकमळाचा विकास ।
अंगुष्ठमात्रप्रमाण प्रकाश ।
दीपवत क्रीडतसे ॥१२॥
कारण देह सुषुप्ती अवस्था ।
प्राज्ञ अभिमानी आनंदभोग तत्त्वता ।
हृदयस्थान इच्छाशक्ति देखा ।
गुण तामस वर्तत ॥१३॥
मकार मातृका जाण ।
प्रणवाचा तिसरा चरण ।
वेद तो आपण ।
सामक जाणिजे ॥१४॥
तेथे उन्मेषाचा द्वनी ।
ऊष्म स्वर ये उमटोनी ।
पश्यंती नाम तियेलागुनी ।
जाणावी सज्जनी स्वानुभवे ॥१५॥
(३) आता मध्यमा वाचा जेथ ।
लिंगदेह जाणिजे तेथ ।
अवस्ता ते विशेष ।
स्वप्न जाणिजे ॥१६॥
अभिमानी तो तैजस ।
प्रत्युक्त भोग सावकाश ।
कंठस्थानी रहिवास ।
करी घोष महानाद ॥१७॥
तेथे जाणावी द्रवशक्ति ।
गुण तो रजोगुणस्थी ।
मात्रा ते उकाराची ।
प्रणवाचा दुसरा चरण ॥१८॥
तथे यजुर्वेद आपण ।
करी घोषाचे उच्चाटण ।
परी त्या वेखरीवाचून ।
न कळे काही ॥१९॥
(४) आता वैखरी नांदे जेथे ।
स्थूळ देह वर्ते तेथे ।
अवस्था जागृती वर्तते ।
अभिमानी जाणिजेसु विश्व पै ॥२०॥
युक्त भोग तेथीचा ।
रहिवास तो नेत्रींचा ।
गुण सात्त्विकाचा ।
मिश्रित साचा वर्तत ॥२१॥
मात्रा ती अक्षरांची ।
महिमा ते प्रथम चरणाची ।
जे का मूळ प्रणवाची ।
ऋग्वेदाची जाणिजे ॥२२॥
तेथे वैखरीचे स्थान ।
करी बत्तिसा अक्षरांचे उच्चारण ।
शब्दापशब्द आपन ।
कळती जाण उच्चारणी ॥२३॥
पुढे विस्तार सांगता ।
तरी विस्तारेल हे वार्ता ।
म्हणोनिया संकळित कथा ।
जाण तत्वता सांगितली ॥२४॥
या चौवाचेचे एकचि स्थान ।
व्यतिरेकान्वये केले आपण ।
अध्यात्मज्ञान त्यासी म्हणणे ।
स्वरूपज्ञान कळावया ॥२५॥
वरकड हो तितुके ज्ञाने ।
धातमात कवित्व बांधणे ।
पुसो जाता अभिमाने ।
प्रवर्ते जाण मुष्टिधाता ॥२६॥
परि या ज्ञानाचा सौरसु ।
नेघेचि तो मंदविलासु ।
भुलती सन्मान-दारेच्या सुरवासु ।
तैशा जनासी हे न मानत ॥२७॥
जयासी स्वहितचि करणे ।
तेणे शुद्ध भावार्थ धरणे ।
करावे आध्यात्मज्ञानाचे शोधन ।
जेणे लाधे निधान परब्रह्म ॥२८॥
बहेणि म्हणे गुरूकृपा जेथे ।
ज्ञानासी काय उणे तेथे ।
परी निष्ठाबळ पाहिजे यथार्थे ।
तेव्हा भगवंत प्राप्त होय ॥२९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग