पुंडलिकाचे निकटसेवे
3303.
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धावे बराडी ॥१॥
आपुले थोरपण । नारायण विसरला ॥धृपद॥
उभा कटी ठेवुनि कर । न म्हणे पर बैससे ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । करणे आशा भक्तांची ॥३॥
अर्थ :
पुंडलिकाची भक्ती व सेवा पाहून हा देव त्याच्याजवळ कसा भिकाऱ्यासारखा धावत आला आहे ते पाहा. पुंडलिकाच्या सेवा व भक्तीपुढे नारायण आपला थोरपणा विसरुन गेला आहे. पुंडलिकाच्या भक्ती व सेवेच्या पुढे हा नारायण आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे मी थोडे दुसरीकडे जाऊन येतो किंवा थोडया वेळ बसतो असे देखील तो म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा जगदीश नेहमी भक्तांची आशा अपेक्षा पूर्ण करत असतो.
