न करी पठन घोष अक्षरा
3302.
न करी पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥
सर्वकाळ नामचिंतन मानसी । समाधान मनासी समाधि हे ॥धृपद॥
न करी भ्रमण न रिघे कपाटी । जाईन तेथे दाटी वैष्णवांची ॥२॥
आन नेणे काही न वजे तपासी । नाचे दिंडीपाशी जागरणी ॥३॥
उपवास व्रत न करी पारणे । रामकृष्ण म्हणे नारायण ॥४॥
आणिकाची सेवा स्तुती नेणे वाणू । तुका म्हणे आणु दुजे काही ॥५॥
अर्थ :
कोणत्याही प्रकारचे वेदपठण किंवा अक्षरांचा घोष आम्ही करत नाही कारण आमचा बीजमंत्र पाडूरंगच आहे. सर्वकाळ पाडूरंगाचे नामस्मरण मनामध्ये केले तर समाधान प्राप्त होते आणि मनाला समाधान प्राप्त झाले तर मनासाठी तीच समाधी असते. मी कोणत्याही तीर्थक्षेत्राला भ्रमण करत नाही किंवा ध्यान करण्यासाठी डोंगर रानामध्ये जाऊन पर्वताच्या कपारीमध्ये जाऊन बसत नाही केवळ जेथे वैष्णवांची दाटी आहे तेथेच मी जाईन. वैष्णव जेथे हरीजागरण करतील जेथे दिंडी काढतील तेथेच मी आनंदाने नाचेन यावाचून मी जपतप इतर काही जाणत नाही. मी उपवास व्रत कोणत्याही प्रकारचे पारणे करत नाही केवळ मुखाने रामकृष्ण नारायण असे म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, एका पाडूरंगावाचून मी दुसऱ्या कोणाचीही सेवा किंवा स्तुती थोडी देखील करणार नाही.
